डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com

ऑस्ट्रियात सिग्मंड फ्रॉइड मनोविश्लेषण करीत होते व अमेरिकेत विल्यम जेम्स भावनांचा सिद्धांत लिहीत होते, त्याच वेळी रशियात पावलोव प्राण्यांवर प्रयोग करून शारीरक्रिया समजून घेत होते. अन्न पाहिले की कुत्र्याला लालास्राव होतो. त्यांनी असे दाखवून दिले की अन्न दाखवले आणि त्याच वेळी घंटा वाजवली असे बऱ्याच वेळा केले की काही काळाने केवळ घंटा वाजवली आणि अन्न दाखवले नाही तरीही कुत्र्याला लालास्राव होतो. याला त्यांनी ‘क्लासिकल कंडिशिनग’ म्हटले. या संशोधनासाठी त्यांना १९०४ मध्ये नोबेल प्राइझ मिळाले.

कुणाचेही वर्तन हे त्याला मिळालेल्या वातावरणानुसार असते आणि त्यामध्ये प्रयत्नपूर्वक बदल करता येतो हे मांडणाऱ्या वर्तन चिकित्सेचा (बिहेविअर थेरपीचा) पाया या संशोधनात आहे. डॉ. वॉटसन यांनी या चिकित्सेच्या भिंती उभ्या केल्या आणि डॉ. स्कीनर यांनी त्यावर कळस चढवला. ही थेरपी मानसोपचार म्हणून वापरली जाऊ लागली तसेच शिक्षणपद्धतीमध्ये तिला महत्त्वाचे स्थान मिळाले. जे केल्यावर बक्षीस मिळते ते वर्तन केले जाते, जे केल्यावर शिक्षा होत ते टाळले जाते या तत्त्वावर आधारित या चिकित्सेची शिथिलीकरण, डीसेन्सिटायझेशन, एक्स्पोझर आणि रिस्पॉन्स प्रिव्हेन्शन अशी अनेक तंत्रे आहेत, त्यातील काही तंत्रे चिकित्सेमध्ये अजूनदेखील वापरली जातात.

डीसेन्सिटायझेशन हे तंत्र विशिष्ट भीती म्हणजे फोबिया दूर करण्यासाठी परिणामकारक आहे. लिफ्टची भीती असलेल्या व्यक्तीला ती आठवण आली तरी छातीत धडधडू लागते. त्यामुळे ती व्यक्ती लिफ्ट टाळत असते. मात्र ही भीती घालवायची तिला इच्छा असेल तर डीसेन्सिटायझेशन हे तंत्र उपयोगी ठरते. त्यासाठी प्रथम लिफ्टची केवळ कल्पना करायची, आणि त्याच वेळी दीर्घ श्वसन करायचे. असे केल्याने धडधड कमी होते. त्याच वेळी आवडते चॉकलेट खायचे. नंतर लिफ्ट दुरून पाहायची व भीती वाटली तर दीर्घ श्वसन करायचे. हळूहळू लिफ्टच्या दरवाजापर्यंत जायचे, नंतर प्रत्यक्ष लिफ्टमध्ये जायचे आणि असे करीत असताना प्रत्येक वेळी स्वत:ला बक्षीस घ्यायचे. फोबिया असतो त्या वेळी त्याबद्दल मेंदू अधिक संवेदनशील असतो, त्याची ही अतिसंवेदनशीलता वर्तन चिकित्सेतील या तंत्राने कमी होते. माइंडफुलनेसनेही भावनिक मेंदूची अतिसंवेदनशीलता कमी होते, असे आधुनिक संशोधनातून आढळत आहे.