शाळा ही केवळ ‘काही’ मुलांसाठी नसते, तर सर्वासाठी असते. जी मुलं केवळ भाषा आणि तार्किकता यात पुढे आहेत, ती मुलं हुशार म्हणून गणली जातात. कारण संपूर्ण अभ्यासक्रम हा या दोन बुद्धिमत्तांभोवती फिरत असतो. यामुळे पटापट गणितं करणारा हुशार समजला जातो. ज्याला गणितं जमत नाहीत तो मात्र कमी हुशार ठरतो. अशा मुलांना अनेक वाईट विशेषणं लावली जातात. यामुळे ते मूल स्वत:ला कमी बुद्धिमान समजू लागतं. लहानपणापासून ‘आपण हुशार नाही’ याचा न्यूनगंड घेऊन मोठं होतं.

मात्र मेंदूवर सध्या जी मूलभूत संशोधनं चालू आहेत, त्यामुळे शिक्षण या विषयातल्या विविध बाजूंकडे बघण्याचा दृष्टिकोन विस्तारतो आहे. मूल, त्याचं शिकणं याकडे जास्त सजगपणे बघत आहेत. न्यूरॉलॉजी या विषयात जसजसे आधुनिक तांत्रिक बदल झाले तसतसे त्याचा उपयोग अनेक शाखांनी करून घेतला. त्यातच न्यूरो-एज्युकेशन व न्यूरो सायकोलॉजी यांचा समावेश होता. आपल्याकडील संपूर्ण शिक्षण व मानसशास्त्र हे वर्तनात्मक विचारसरणीवर (behaviorist approach) आधारित आहे. व्यक्तीच्या केवळ वर्तनावरून अंदाज बांधण्याचे काम मानसशास्त्र करते. नवीन मेंदू आधारित शिक्षण मात्र त्यापलीकडे गेले आहे. न्यूरो-एज्युकेशनमध्ये तंत्रज्ञानाच्या साहाय्याने व्यक्तीच्या प्रत्यक्ष मेंदूत बघता येते. तिथल्या हालचालींवरून शिक्षण व मानसशास्त्राशी संबंधित कित्येक गोष्टींवर आता प्रकाश पडत आहे.

ही मेंदूवरची संशोधने गेल्या काही वर्षांत पाश्चात्त्य देशात मोठय़ा संख्येने झाली आहेत आणि अजूनही चालू आहेत. प्रत्येकाला आपल्या बुद्धिमत्तांसाठी समान संधी मिळेल. एक जण हुशार, प्रगत आणि एक जण कमी हुशार किंवा अप्रगत, अशी वर्गवारी होण्यापेक्षा काही जण एका बुद्धिमत्तेत हुशार, तर काही जण दुसऱ्या बुद्धिमत्तेत हुशार अशा पद्धतीने ठरवलं जाईल. अशा प्रकारची वर्गवारी वर्गातल्या कोणावरच अप्रगत असा शिक्का मारणार नाही. आपल्याला शाळेच्या दृष्टिकोनात बदल करावा लागेल. यासाठी सर्व मुलामुलींना एकाच साच्यातला अभ्यासक्रम देऊन चालणार नाही.  विविध बुद्धिमत्तांनुसार अभ्यासक्रम ठरवावेत आणि ते सर्वाना द्यावेत. शाळेलाच आता आधुनिक काळानुसार जास्त प्रगत व्हावं लागेल. आपली क्षितिजं विस्तारावी लागतील. तरच वर्गातल्या सर्वच्या सर्व मुलामुलींना न्याय मिळेल.

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com