News Flash

नवदेशांचा उदयास्त : बेल्जियन काँगो

दुसऱ्या महायुद्धानंतर बेल्जियमची सामान्य मध्यमवर्गातील हजारो कुटुंबे काँगोमध्ये उज्ज्वल भवितव्यासाठी स्थलांतरित झाली.

बेल्जियन काँगोमधील गुलाम

विविध खनिजे आणि संसाधने यांनी समृद्ध असलेल्या अविकसित आफ्रिकन देशांमधून व्यापारी लाभ उठवून तिथे आपली वसाहत स्थापन करण्याच्या चढाओढीत बहुतेक सर्व युरोपियन साम्राज्ये होती. या राष्ट्रांची बर्लिन येथे परिषद होऊन बेल्जियमच्या साम्राज्याला सध्याच्या डी. आर. काँगोच्या प्रदेशात व्यापार व वसाहत स्थापण्यास अनुमती दिली गेली. ही अनुमती मिळाल्यावर बेल्जियमचा राजा लिओपोल्ड द्वितीय याने १८८५ मध्ये काँगोच्या संपूर्ण प्रदेशाचा ताबा घेतला. पण त्याची मालकी बेल्जियम राजवटीकडे न देता स्वत:ची खाजगी मालमत्ता असल्याचे त्याने जाहीर केले आणि काँगोचे नाव बदलून ‘फ्री स्टेट’ केले. या फ्री स्टेटमधील लष्कराला नाव होते- फोर्स पब्लिक. या फोर्स पब्लिकने काँगोच्या जनतेला सक्तीने व दडपशाहीने रबराच्या मळ्यांमध्ये मजुरी करायला लावली. त्यामुळे कुपोषण, रोगराईमुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले. अखेरीस त्रासून १९०८ मध्ये राजा लिओपोल्डने फ्री स्टेट हा प्रदेश बेल्जियमच्या मालकीचा करून या वसाहतीला ‘बेल्जियन काँगो’ असे नाव दिले.
बेल्जियन काँगोचा कारभार संसदेने वसाहत मंत्रालयाकडे सोपविला. दुसऱ्या महायुद्धानंतर बेल्जियमची सामान्य मध्यमवर्गातील हजारो कुटुंबे काँगोमध्ये उज्ज्वल भवितव्यासाठी स्थलांतरित झाली. या गोऱ्या बेल्जियनांना स्थानिक काँगोलीज लोकांपेक्षा उच्च दर्जा देऊन कृष्णवर्णीयांना अनेक सोयीसुविधा नाकारल्या गेल्या. बेल्जियन राजाच्या सल्ल्याने एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस अनेक ख्रिस्ती मिशनरी काँगोमध्ये येऊन त्यांनी धर्मांतरे करवून धर्मविस्ताराचे कार्य सुरू केले. बेल्जियन काँगोमध्ये शहरांच्या विकासाने कामगारवर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला, तसाच युरोपियनीकरण झालेला सुशिक्षित, बुद्धिजीवी मध्यमवर्गही तयार झाला.
अनेक खनिजांनी समृद्ध असलेल्या काँगोच्या भूमीत युरेनियमही मोठ्या प्रमाणात दडलेले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेने आपल्या अणुशक्ती संशोधन आणि अण्वस्त्रनिर्मितीसाठी लागलेले युरेनियम काँगोमधूनच घेतले होते. पुढे अमेरिका व सोव्हिएत युनियन यांच्यात सुरू झालेल्या शीतयुद्धाच्या काळात या बड्या सत्तांना युरेनियम मिळविण्यासाठी तोवर दुर्लक्षित राहिलेल्या काँगोमध्ये नव्याने स्वारस्य निर्माण झाले. – सुनीत पोतनीस
sunitpotnis94@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2021 12:11 am

Web Title: belgian congo trade and settlement in the congo region akp 94 2
Next Stories
1 कुतूहल : गणकचक्रचूडामणी ब्रह्मगुप्त
2 कुतूहल : खगोलज्ञ गणिती आर्यभट
3 नवदेशांचा उदयास्त ; डी. आर. काँगो
Just Now!
X