व्हाइस अ‍ॅडमिरल बेंजामिन अब्राहम सॅमसन हे भारतीय नौदलाचे वरिष्ठ अधिकारी बेने इस्रायली समाजाचे ज्यू होते. १९१६ साली पुण्यात जन्मलेले बेंजामिन यांना एकूण दहा भावंडे, घरची परिस्थिती साधारण, त्यामुळे शालेय शिक्षण कसेबसे पूर्ण करून ते तत्कालीन रॉयल नेव्हीत खलाशी म्हणून काम करू लागले. ‘डफरीन’ या इंडियन र्मकटाइल मरिन ट्रेिनग जहाजावर शिक्षण घेतल्यावर पुढे मॅकेनान मॅकेन्सी र्मचट नेव्हीत शिक्षण घेऊन ते रॉयल इंडियन नेव्हीमध्ये दुसऱ्या महायुद्धकाळात पाणबुडीतज्ज्ञ म्हणून नोकरीस होते. १९३९ साली त्यांना रॉयल नेव्हीत कमिशन मिळाले. दुसऱ्या महायुद्धात रॉयल इंडियन नेव्हीत एक महत्त्वाचे नौदल अधिकारी म्हणून त्यांनी भूमध्य समुद्र, रेड सी, बंगालच्या उपसागरातील समुद्री लढायांत भाग घेतला. युद्धाच्या अखेरीस रंगूनहून निघालेले त्यांचे जहाज जपान्यांच्या हातात पडले. असाधारण कार्यक्षमतेमुळे बेंजामिन यांची रॉयल नेव्हीत भराभर पदोन्नती होत गेली. भारतीय स्वातंत्र्यानंतर नवजात भारतीय नौदलाची प्रशासकीय जबाबदारी आणि एक समर्थ भारतीय नौदल उभे करण्याचे काम बेंजामिन यांनी केले.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर २६ जानेवारी १९५० रोजी नावातला रॉयल हा शब्द काढून फक्त ‘इंडियन नेव्ही’ असे करण्यात आले. त्या वेळी इंडियन नेव्हीत जुनाट झालेली ३२ लढाऊ जहाजे आणि खलाशी, अधिकारी मिळून ११ हजार कर्मचारी होते. १९५९ ते ६२ या काळात बेंजामिन सॅमसन खडकवासल्याच्या नॅशनल डिफेन्स अकादमीचे कमांडंट होते. १९६४ साली त्यांची नियुक्ती इंडियन फ्लीटचे कमांडिंग फ्लॅग ऑफिसर या पदावर झाली. १९६५ मध्ये बेंजामिनना भारत सरकारचे प्रतिष्ठेचे समजले जाणारे पी.व्ही.एस.एम. पदक मिळाले. १९६६ साली बेंजामिननी निवृत्ती स्वीकारल्यावर माझगाव डॉकचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले.  चेन्नई येथे २००८ साली ९१व्या वर्षी बेंजामिन सॅमसन यांचे निधन झाले.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com