आग्रा येथून ५७ कि.मी.वर पश्चिमेस, सध्या राजस्थानात जिल्ह्याचे ठिकाण असलेले भरतपूर हे ब्रिटिशराजमध्ये एक महत्त्वाचे संस्थान होते. ५१०० चौ.कि.मी. राज्यक्षेत्र असलेल्या भरतपूर संस्थानास ब्रिटिशांनी १७ तोफांच्या सलामीचा मान दिला.
सतराव्या शतकात राजाराम, चुडामण व बदनसिंह यांनी या प्रदेशातल्या जाटांची एकी, समन्वय साधून छोटे राज्य स्थापन केले. चुडामण याच्या कारकीर्दीत १७१५ साली मोगल बादशाहने त्याला मनसबदार हा खिताब देऊन मालाह, रूपवास, आघापूर, भरतपूर ही गावे इनाम दिली. १७२४ साली चुडामणने डीग येथे राजधानी केली. पुढे १७५६ मध्ये राजेपदावर आलेल्या सूरजमल जाट याने भरतपूर येथे आपली राजधानी हलवून गावाभोवती भला भक्कम कोट बांधला. सूरजमलने राज्याच्या सीमा आग्रा, धोलपूर, मनपुरी, अलीगढ, मेरठ, इटावा, मथुरा घेऊन विस्तीर्ण केल्या, लोहगड हा मजबूत किल्ला बांधला. १७५४ साली मराठय़ांनी सूरजमलच्या कुम्हेर किल्ल्याला सहा महिने वेढा घातला. त्यांना किल्ला घेता आला नाही पण चकमकीत खंडेराव होळकर मारला गेला.
मथुरेच्या नबी मशिदीवरून सदाशिवराव भाऊ आणि सूरजमल यांच्यात वाद होता. पुढे दिल्लीतील लाल किल्ल्याच्या दिवाण-ए-खासच्या छतातील सोने विकून मराठा फौजेचे वेतन देण्यालाही सूरजमलने हरकत घेतली. १७६१ साली झालेल्या पानिपतयुद्धानंतर त्यातून वाचलेले ३० ते ४० हजार जखमी सनिक आणि बुणगे महाराष्ट्रात परत येत असताना त्यांच्याकडे अन्न, पाणी, कपडे नव्हते, थंडीचे दिवस होते. वाटेवरील भरतपूरमध्ये सूरजमलने त्यांना अन्नपाणी, औषधोपचार, पांघरुणे देऊन त्यांची सोय केली आणि परतणाऱ्या प्रत्येकाला एक रुपया व एक शेर धान्य दिले. १७६३ साली नवाब नजीउद्दौलाशी झालेल्या लढाईत सूरजमलचा मृत्यू झाला. अत्यंत दूरदर्शी, बुद्धिवान आणि स्थिर विचारांचा राजा म्हणून सूरजमलची ओळख होती. महाराजा ब्रिजेंद्रसिंह या शेवटच्या शासकाने भरतपूर संस्थान १९४७ साली स्वतंत्र भारतात विलीन केले.

सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

 

कुतूहल
टर्किश टॉवेल- २

टर्किश कापडामध्येही वेगवेगळे प्रकार आहेत. हे कापड तयार करताना त्याच्या एकाच पृष्ठभागावर टाके किंवा तुरे तयार करतात. त्या वेळी त्याला एकेरी तुरा कापड म्हणून ओळखले जाते; तर दोन्ही पृष्ठभागावर टाके असलेल्या कापडाला दुहेरी तुरा कापड म्हणून संबोधतात. एकेरी तुरा कापड चटई, पडदे, स्त्रियांचे कोट व गाऊन तयार करण्यासाठी वापरतात. तर दुहेरी तुरा कापड हे टॉवेलसाठी वापरले जाते. दोन्ही बाजूला टाके/तुरे असतील तर त्यामध्ये विविधता आणता येते. मुंबईतील बॉम्बे डाइंग मिलमध्ये टर्किश टॉवेलचे उत्पादन होत असे. आता सोलापूरला मोठय़ा प्रमाणात टíकश टॉवेलचे उत्पादन होते. तिथून टíकश टॉवेलची निर्यातही होते. विम्बल्डन स्पध्रेसाठीचे टर्किश टॉवेल भारतातून पुरवले जात होते.
टíकश टॉवेलमध्ये रंगीत पट्टे असतील तर त्याकरिता फक्तताण्यामध्ये रंगीत सूताची त्यानुसार रचना करून पट्टे निर्माण करणे साधता येते. पण भौमितिक आकृत्या, मोठय़ा आकाराच्या नक्षी याचा वापर केला असेल तर त्या वेळी त्या यंत्रमागावर डॉबी किंवा जकार्ड यंत्रणेची व्यवस्था करावी लागते. चाळीसपेक्षा जास्त धाग्यानंतर नक्षीची पुनरावृत्ती होत असेल तर जकार्डच वापरणे अनिवार्य ठरते. शिवाय हॉस्पिटलचे किंवा हॉटेलचे नाव विणलेले टíकश टॉवेल आपण पाहिले असतील, त्याकरिताही अशी व्यवस्था असावी लागते. जकार्ड बसविलेले यंत्रमाग सोलापुरी चादरी विणण्याकरिता वापरले जातात. त्यामुळे तसे यंत्रमाग चालवणारे विणकर सोलापुरात पूर्वीपासून उपलब्ध आहेत. तिथेच आता टíकश टॉवेलचा उद्योग पुढे आला आहे. या उत्पादनाला मागणीही चांगली आहे. देशातच नव्हे तर परदेशातही इथून टर्किश टॉवेल पाठवले जातात. निर्यात केल्या जाणाऱ्या टॉवेलकरिता अधिक काळजी घ्यावी लागते. त्यामुळे टॉवेलचा दर्जा चांगला राखून शिवाय रंगाची हमीसुद्धा द्यावी लागते. त्यामुळे एकाच छताखाली व्यवस्थित रंगाई करून ते सूत वापरून टॉवेल विणणारे काही उद्योग सोलापुरात आहेत. सूती धागे असले तरी रिअ‍ॅक्टिव्ह डाइज (रंग) वापरून सूत रंगाई केली जाते. त्यामुळे किंमत वाढली तरी रंगाची हमी देता येते. अनेक आकर्षक फिक्या आणि गडद दोन्ही प्रकारच्या रंगांचा वापर करता येतो. अर्थात धुलाईकरिताच्या सूचना रंगीत टॉवेलसाठी ग्राहकांनी पाळल्या पाहिजेत.

दिलीप हेर्लेकर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org