‘बोरबॉन’ (फ्रेंच उच्चार ‘बू:र्बाँ’सारखा) या फ्रान्सच्या राजघराण्याच्या अनेक पिढय़ा गेल्या अडीचशे वर्षांपासून भोपाळमध्ये नांदत आहेत ही गोष्ट अनेकांना माहीत नसावी. ‘भोपाळ बोरबॉन’ या नावाने ओळखले जाणारे हे फ्रेंच आता भारतीय जीवनशैली स्वीकारून स्थानिक जनतेशी पूर्णपणे समरस झालेत. इ.स. १५८९ पासून ते १७८९ च्या राज्यक्रांतीपर्यंत फ्रान्सची राजसत्ता या बोरबॉन घराण्याकडे होती.

फ्रान्सचा राजा हेन्री चतुर्थ याचा चुलतभाऊ ज्याँ फिलीप डि बोरबॉन याला खुनाच्या आरोपावरून हद्दपारीची शिक्षा सुनावण्यात आली होती. जहाजातून फ्रान्सबाहेर जाणारा ज्याँ फिलीप चाच्यांच्या हातात सापडला. त्यांच्या तावडीतून सुटून तो गोव्याच्या किनाऱ्यावर आला आणि पुढे १५६० मध्ये मोगल बादशाह अकबराच्या लष्करात नोकरीला लागला. ज्याँ फिलीपला फारसी भाषा अवगत होती, औषधोपचारांची माहिती होती. त्याचे दिलखुलास व्यक्तिमत्त्व, बहुश्रुतपणा आणि सनिकी प्रशासनाचे ज्ञान यामुळे प्रभावीत झालेल्या अकबराने त्याच्याकडून आपल्या तोफदलात अनेक सुधारणा केल्या. अकबराच्या ख्रिस्ती बेगमची बहीण जुलिना हिच्याशी ज्याँचे लग्न लावून अकबराने ज्याँशी साडूचे नातेसंबंध जोडले! अकबराने ज्याँला राजा हा खिताब देऊन शेरगढ येथील जहागिरी दिली. ज्याँच्या पुढच्या पिढय़ाही मोगल दरबारात विविध पदांवर काम करीत होत्या.

१७३९ साली दुबळ्या झालेल्या मोगलशाहीवर आक्रमण करून नादिरशहाने दिल्ली लुटली; त्यावेळी झालेल्या हिंसाचारातून शिताफीने निसटून तत्कालीन बोरबॉन कुटुंबप्रमुख साल्वादोर हा प्रथम आपली जहागीर शेरगढ येथे व पुढे भोपाळमध्ये नवाबाकडे लष्करी तज्ज्ञ म्हणून नोकरीस लागला. साल्वादोरच्या लष्करी प्रशासनामुळे भोपाळची रियासत अनेक लढायांमधून सुरक्षित राहिली. भोपाळवर त्याकाळात बेगम नवाबांचे शासन होते. साल्वादोर हा निपुण राजकीय मुत्सद्दी होता, त्याला वैद्यकाची माहिती होती आणि भोपाळ नवाबांना तो पूर्णपणे स्वामीनिष्ठ होता. नवाबांनी त्याला व त्याच्या मुलांना, नातवंडांना जहागिरी आणि वजिरपद दिले. संस्थानांच्या विलीनीकरणानंतर हे बोरबॉन वकिली, व्यापार, नोकऱ्या करून सध्याही भोपाळमध्ये स्थायिक झालेले आहेत. सध्याचे त्यांचे कुटुंबप्रमुख बाल्तझार नेपोलियन बोरबॉन हे पेशाने वकील असून शेती करतात.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com