03 March 2021

News Flash

कुतूहल : ‘बायोचार’ असा बनवता येईल..

ज्वलनक्रिया होत असताना धूर बाहेर वाहून नेण्यासाठी हे नळकांडे चिमणीचे कार्य करेल.

‘बायोमास’ हे ऊर्जेचे अतिशय उत्तम संसाधन आहे. या तथाकथित ‘टाकाऊ’ पालापाचोळा व तत्सम ‘कचऱ्या’पासून ‘बायोचार’ तयार करण्यासाठी साधारण २००-३०० लिटर्स क्षमतेचे, धरण्यासाठी कडय़ा असलेले लोखंडी पिंप वापरावे. या पिंपाची ‘भट्टी’ तयार करण्यासाठी ड्रिल मशीनने पिंपाच्या तळाकडील पत्र्याला हवा आत येण्यासाठी अंदाजे अर्धा इंच व्यासाची ४०-५० बारीक छिद्रे पाडून घ्या. त्याचप्रमाणे पिंपाच्या तोंडावरील झाकणाला मध्यभागी अंदाजे १२ इंच व्यासाचे एक मोठे भोक पाडून पातळ पत्र्याचे एक गोल नळकांडे करून त्यात घट्ट बसवा. वेल्डिंग करून घट्ट केल्यास उत्तम. ज्वलनक्रिया होत असताना धूर बाहेर वाहून नेण्यासाठी हे नळकांडे चिमणीचे कार्य करेल.

आता ही भट्टी तीन किंवा चार विटांवर, डगमगणार नाही अशा बेताने व्यवस्थित ठेवा आणि गोळा केलेला ‘जैविक कचरा’ म्हणजे ‘बायोमास’- जसे की, गळून पडलेला पालापाचोळा आदी या भट्टीत वपर्यंत भरून तो पेटवा आणि वरून ‘चिमणी-झाकण’ लावा. मात्र हे लावताना झाकण आणि पिंपाचे तोंड यांमध्ये बारीक फट राहील अशा बेताने लावावे. ‘बायोमास’ वरच्या थरापासून खालच्या थरापर्यंत जळत येते. काही वेळाने बायोमास पूर्णपणे जळून त्याचे काळ्या, भुकटीसदृश कोळशात म्हणजेच ‘बायोचार’मध्ये रूपांतर होते. आपल्याला करडय़ा रंगाची राख नको आहे हे ध्यानात ठेवावे.

या ज्वलनप्रक्रियेत तळाकडील छिद्रांमधून येणाऱ्या हवेतील ऑक्सिजन खालच्या थरामध्येच पूर्णपणे वापरला जातो. ‘बायोमास’ जेव्हा उघडय़ावर मोकळ्या हवेत जाळला जातो तेव्हा या ज्वलनासाठी १०० टक्के ऑक्सिजन उपलब्ध असतो आणि म्हणून ‘बायोमास’मधील कार्बन आणि त्यातील पोषक तत्त्वे पूर्णपणे जळून त्याची राख होतेच. शिवाय खूप मोठय़ा प्रमाणात हवेचे प्रदूषणदेखील होते. परंतु अशा प्रकारच्या भट्टीच्या विशिष्ट रचनेमुळे  ‘बायोमास’ जळत असताना उपलब्ध ऑक्सिजनचे प्रमाण नियंत्रित राहते आणि ज्वलनक्रिया पूर्ण झाल्यावर कार्बनयुक्त कोळसा म्हणजेच ‘बायोचार’ मिळतो.

यादरम्यान बायोमास जळत असताना निर्माण झालेले कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन व इतर प्रदूषक वायू तसेच हवेत तरंगत राहणारे सूक्ष्म रासायनिक धूलिकण ही विविध प्रदूषके भट्टीच्या तोंडावर असलेल्या चिमणी व झाकण यांच्या विशिष्ट रचनेमुळे जवळपास नष्ट होतात आणि चिमणीतून बाहेर येणारा धूर हा ‘स्वच्छ’ असतो. यासाठी या रचनेत चिमणीची उंची (लांबी) महत्त्वाची असते.

– डॉ. संजय जोशी  

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 2:40 am

Web Title: biochar from biomass and waste zws 70
Next Stories
1 मनोवेध : करुणा ध्यान
2 मनोवेध : कल्पनादर्शन ध्यान
3 कुतूहल : राष्ट्रीय अक्षय ऊर्जा दिवस
Just Now!
X