20 April 2019

News Flash

जैवरासायनिक ऑक्सिजन मागणी

पर्यावरणातील अन्नसाखळीत या सर्वाची महत्त्वाची भूमिका आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

BOD(Biochemical Oxygen Demand) जैवरासायनिक ऑक्सिजन मागणी (BOD) हे पाणीसाठय़ातील प्रदूषण ओळखण्याचे एक परिमाण आहे. समुद्र, नदी, तलाव इत्यादी पाणीसाठय़ांमध्ये ऑक्सिजनची पातळी योग्य प्रमाणात असायलाच हवी. कारण त्यावर जलचर प्राणी, वनस्पती व हरित शैवाल यांचे जीवन अवलंबून आहे. पर्यावरणातील अन्नसाखळीत या सर्वाची महत्त्वाची भूमिका आहे.

हायड्रोजन सल्फाईड, विविध अमाईने, मरकॅप्टन्ससारखी विषारी रसायने ही जिवाणूंमार्फत उत्पन्न होतात व त्यांचा पाण्यात साठा होऊ लागतो. विविध रासायनिक प्रक्रियांमध्ये पाण्यातील ऑक्सिजन वापरला जातो. पर्यायाने पाण्यातील ऑक्सिजनची पातळी तात्पुरती कमी होते. त्यामुळे सर्वच जलचर जीवन धोक्यात येऊ शकते.

जैवरासायनिक ऑक्सिजनची पातळी मापन करण्यासाठी त्या पाणीसाठय़ातील पाणी नमुन्यादाखल गोळा केले जाते. या पाण्यात भरपूर हवा खेळवली जाते. हे  पाण्याचे नमुने विशिष्ट प्रकारच्या सीलबंद बाटल्यांमध्ये ठेवून सामान्यत: ५ दिवस, २० अंश सेल्सियस या प्रकारे त्याचे उष्मायन (incubation) केले जाते. उष्मायन अवधीच्या शेवटी त्या पाण्याच्या नमुन्यातील शिल्लक ऑक्सिजनची पातळी मोजली जाते.

बीओडी मोजमापन करण्यासाठी जो ५ दिवस, २० अंश सेल्सियसचा उष्मायन अवधी निश्चित केलेला आहे; त्यामागे एक ऐतिहासिक संदर्भ आहे. पूर्वी युनायटेड किंगडममधील रॉयल कमिशनने तेथील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी जो अहवाल सादर केला होता, त्यात नमूद केले होते की इंग्लंडमधील नद्या (मुख्यत: थेम्स नदी) खुल्या समुद्राला जाऊन मिळण्यासाठी ५ दिवसांचा कालावधी लागतो व त्या पाण्याचे तापमान १८.३ अंश सेल्सियस असते. तेव्हापासून शास्त्रीय व कायदेशीर रीतीने हा उष्मायन अवधी ठरविण्यात आला.

प्रथम दिवशीच्या पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन आणि पाच दिवसांनंतर त्या पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनची पातळी मोजून गणिती सूत्रांच्या साहाय्याने जैवरासायनिक ऑक्सिजनची पातळी शोधली जाते आणि त्यावरून पाण्याचा दर्जा ठरवला जातो.

एखादी नदी किंवा कोणताही पाणीसाठा दूषित झाला तर त्याची जैवरासायनिक ऑक्सिजनची मागणी वाढते. जसजसे सेंद्रिय प्रदूषण कमी होते, तशी ही ऑक्सिजनची मागणी कमी होते आणि विघटनकारक ऑक्सिजनमध्ये अनुक्रमे वाढ होते.

– डॉ. कृ पा आशीष पुरंदरे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

श्रीलाल शुक्ल – हिन्दी (२००९  विभागून)

भारतीय साहित्यातील उत्कृष्ट योगदानासाठी हिन्दीतील यशस्वी साहित्यिक  श्रीलाल शुक्ल यांना २००९ चा ज्ञानपीठ पुरस्कार अमरकान्त यांच्यासह विभागून प्रदान करण्यात आला. कथा, व्यंगकथासंग्रह, कादंबरी, समीक्षा अशा विविध साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केले आहे. आतापर्यंत २८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

उत्तर प्रदेशातील लखनौ जिल्ह्य़ातील अत्रौली गावी ३१ डिसेंबर १९२५ रोजी शुक्लाजींचा जन्म झाला. परिस्थिती गरिबीची. त्यांचे आजोबा संस्कृत, उर्दू आणि फारसी भाषेचे विद्वान होते आणि जवळच्याच शाळेत शिक्षक होते. पण थोडय़ाच दिवसांत नोकरी सोडून, त्यांनी शेती करायला सुरुवात केली. शुक्लांच्या वडिलांना संगीताची खूप आवड होती. पण आजोबांमुळे ते त्यांच्याबरोबर शेती करू लागले.  लालजी  हे प्रयागमध्ये बी.ए. करीत होते तेव्हा वडिलांचे निधन झाले. मग ते लखनौला आले आणि १९४८ मध्ये एम.ए.ची परीक्षा दिल्यावर पुढे वकिली शिक्षणासाठी प्रवेश घेतला. पण ती सोडून १९४९ मध्ये पत्नीच्या प्रेरणेने ते नागरी सेवेत दाखल झाले.

लहानपणापासूनच त्यांना वाचनाची आवड होती. इंग्रजी, हिन्दी,उर्दू आणि संस्कृत भाषेचे ते विद्वान होते. शास्त्रीय आणि सुगम संगीताचीही आवड होती. स्वभाव विनोदी पण शिस्तप्रिय. हसतमुखाने ते स्वागत करायचे, पण आपल्याला जे म्हणायचे आहे ते स्पष्टपणे सांगायचे. या स्वभावामुळेच सरकारी सेवेत असूनही अगदी सहजपणे सरकारी कारभारावर भाष्य करायचे. नव्या पिढीला समजून घेणारे, त्यांचे साहित्य जाणून घेणारे ते ज्येष्ठ लेखक होते.

१९५७ मध्ये ‘सुनी घाटिका सूरज’ ही त्यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. १९५८ मध्ये ‘अंगद का पाँव’ हा पहिला व्यंगकथासंग्रह प्रसिद्ध झाला. शुक्लाजींनी ‘आदमी का जहर’ ही रहस्यमय कादंबरी लिहिली असून, ‘हिन्दुस्तान’ या साप्ताहिकात ती क्रमश: प्रसिद्ध झाली होती.

‘राग दरबारी’ ही उपहासात्मक कादंबरी खूप गाजली. इंग्रजीसह १५ भारतीय भाषांत या कादंबरीचे अनुवाद झाले असून, १९८० मध्ये या कादंबरीवर आधारित दूरदर्शन मालिकाही प्रसिद्ध झाली आहे.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

First Published on November 27, 2017 2:40 am

Web Title: biochemical oxygen demand