काही इंधने रंगाने काळसर असतात, म्हणून त्यास ‘काळी तेले’   (ब्लॅक ऑइल) असे म्हटले जाते. पेट्रोलियम खनिज तेलाचे उध्र्वपातन होताना न उकळणारा जो अवशिष्ट भाग उरतो, त्याचाही इंधन म्हणून वापर करता येतो. खनिज तेलाच्या काही उध्र्वपातित भागात या अवशिष्ट भागाचा अंश मिसळून जे इंधन तयार होते त्याला एलडीओ ( Light Diesel Oil) म्हणतात. शेती व्यवसायासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी काळी (एलडीओ) इंधने मोठय़ा प्रमाणात वापरात येतात, कारण ती तुलनात्मकदृष्टय़ा स्वस्त असतात.
जी यंत्रे प्रति मिनिटाला ७५० पेक्षा जास्त भ्रमणे (आरपीएम) करतात, त्यासाठी डिझेल तेल वापरतात, तर ७५०पेक्षा कमी आरपीएमची गती असणाऱ्या शेती व्यवसायातील यंत्रासाठी साधारणपणे एलडीओ इंधन वापरले जाते. अवशिष्ट भागाच्या अंशामुळे या इंधनाचा जाडसरपणा डिझेल तेलापेक्षा जास्त असतो.
खनिज तेलातील पातळ इंधन-द्रावणाचा अंश उध्र्वपातित करून बाहेर काढल्यानंतर जो अवशिष्ट भाग उरतो, त्यापासून ‘फरनेस ऑइल’ किंवा ‘फ्युएल ऑइल’ (एफओ) नावाचे उपयुक्त इंधन मिळते. त्यास ‘बंकर ऑइल’ असेही म्हणतात. या तेलात ‘एलडीओ’चा बराच अंश सामावलेला असतो. उद्योग क्षेत्रात उष्णताऊर्जा निर्माण करण्यासाठी या काळ्या तेलाचा वापर होतो.
फरनेस ऑइलचा वापर मुख्यत: प्रोसेस इंडस्ट्रीज व थर्मल पॉवर स्टेशनात वायूनिर्मितीसाठी करतात. तसेच वीट, सिमेंट, चुना, काच नि धातू हाताळणाऱ्या कारखान्यातील भट्टीतदेखील हे इंधन वापरले जाते. हळूगतीने चालणाऱ्या बोटीतील इंजिनाचे जनरेटर या इंधनावर कार्यरत करता येतात. गॅस टर्बाइनमध्ये ऊर्जानिर्मितीसाठी आणि खते तयार करण्यासाठी हे इंधन उपयोगी ठरते.
काळी इंधने जळताना हवा प्रदूषण होऊ नये म्हणून त्यातील गंधकाच्या प्रमाणावर मर्यादा ठेवावी लागते. तसेच जळाल्यानंतर जास्त राख निर्माण होऊन, बर्नरची भोके बुझू नयेत यावरही लक्ष ठेवावे लागते. ‘लो सल्फर हेवीस्टॉक’ (एलएसएचएस) नावाचे आणखी एक काळे जाडसर, घट्ट इंधन फरनेस ऑइलला पर्याय म्हणून वापरले जाते. त्यास ‘हेवी पेट्रोलियम स्टॉक’ असेही दुसरे नाव आहे. ‘रेसिडय़ुएल फ्युएल ऑइल’, ‘हॉट हेवी स्टॉक’, ‘फर्टलिायझर फीड स्टॉक’ अशीही या काळ्या इंधनांची नावे होत.
जोसेफ तुस्कानो (वसई)  मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२.  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – गूढवादी श्रीरामकृष्णांचे जीवन विश्लेषण
नॉर्मल माणसांचे विचार, आवडीनिवडी वृत्ती-प्रवृत्ती, सवयी आणि प्रत्यक्ष वर्तन यांचा अभ्यास मानसशास्त्रात अंतर्भूत होतो. ‘मनोविश्लेषण’ म्हणजे फ्रॉइडप्रणीत (फ्रॉइडनंतरचे इतर आणि समकालीन) मनाचा अभ्यास, इतकंच. फ्रॉइडनं रुग्ण व्यक्तींच्या मनोवृत्ती, गंड आणि स्वप्न यांची मीमांसा केली. मानवी वर्तन फक्त जाणिवेच्या मर्यादित कक्षेमध्ये बंदिस्त नसते तर नेणीव पातळीवरील (अनकॉन्शस) विचार, विलास (फॅण्टसी) प्रेरणा, बालपणातील स्मृती यांच्या स्वाधीन असू शकते, असं ठाम प्रतिपादन केलं. मुख्यत: शब्दांपलीकडे जाऊन मनातील प्रतीकं आणि प्रतिमा यांचा अर्थ लावला. त्यामुळे फ्रॉइडप्रणीत विश्लेषण त्या व्यक्तीचं लहानपण, आई-वडील यांचं मुळाशी असलेलं नातं, त्यातून निर्माण होणारी आसक्ती, भीती याभोवती गुंफलेलं असतं. अशा प्रकारे व्यक्तीच्या चरित्राचा अभ्यास करून, त्याच्या वागण्याबोलण्याचा, वृत्ती-प्रवृत्तींचा अर्थ लावता येतो, असा दावा केला.
फ्रॉइडपश्चात इतर मनोविश्लेषणतज्ज्ञांनी त्यापुढे जाऊन फ्रॉइडच्या मूळ सिद्धांताला विस्तारून, अव्हेरून आपापल्या पद्धतीने अनेकांचं मनोविश्लेषण केलं.
मनोविश्लेषण पद्धतीचा वापर करून भारतीय मनोवृत्ती, मानसिकता, कौटुंबिक रचना आणि त्यामधील तणाव, लोकप्रिय प्रतीकं यावर सखोल संशोधन आणि निरूपण करणाऱ्या विचारवंतांमध्ये सुधीर काकर अग्रगण्य आहेत. अत्यंत सूक्ष्म संदर्भ आणि मर्मग्राही जाण, तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि इंग्रजी भाषेवर उत्तम पकड ही काकर यांची वैशिष्टय़ं होत.
त्यांनी या संदर्भात अनेक व्याख्यानं दिलेली आहेत आणि स्वतंत्र पुस्तके लिहिली आहेत. त्यामधील अतिशय महत्त्वाचं आणि अभिजात मनोविश्लेषणाचा सांगोपांग उपयोजन करणारं एक पुस्तक त्या मानानं कमी प्रकाशात आलं. ‘द अ‍ॅनालिस्ट अँड द मिस्टिक’ या पुस्तकात श्रीरामकृष्ण यांचा मनोविश्लेषणात्मक अभ्यास मांडला आहे.
खरं म्हणजे या कामाला शिवधनुष्य उचललेलं आहे, असंच म्हटलं पाहिजे. श्रीरामकृष्ण परमहंसांचं संपूर्ण जीवन मनोविश्लेषकाला विलक्षण आवाहन करणारं आहे, यात शंकाच नाही. श्रीरामकृष्ण गूढवादी आणि संपूर्ण भक्तिभावातून आपोआप उद्भवणाऱ्या साक्षात्कारी अनुभवानं अंतरदृष्टी लाभलेले संतपुरुष. बालपणापासून त्यांना अत्युच्च (अनामिक) अनुभवानं मूच्र्छा येत असे. या आत्यंतिक उत्कट भावनिक अनुभवांचा विकास त्यांनी प्रौढ वयात चिंतन आणि मनन यांच्याद्वारे केला. ते प्रगाढ शास्त्रीय अथवा पोथीनिष्ठ पठडीचे विवेचक नव्हते, तर आत्मानुभवातूनच ‘दर्शन’ घडतं असं ते मानत. या आत्मानुभवामध्ये ईशभक्ती करीत असताना व्यक्तीचा लिंग भाव लोप पावतो (सेक्शुअ‍ॅलिटी) असा त्यांचा व्यक्तिगत अनुभव होता. श्रीरामकृष्णांचे अनुभव चिंतनात्मक आणि केवळ विलक्षण आहेत.
सुधीर काकर यांनी त्यांच्या मनस्वी स्त्री-पुरुष भावात्मक अनुभवांचं अतिशय विद्वत्तेनं निरूपण केलं आहे. श्रीरामकृष्णांचे प्रौढ वयात इतर स्त्रियांशी असलेलं पुत्रवत वर्तन, पत्नीशी पाळलेलं ब्रह्मचर्य इ. हळुवार भावनांचं मर्मज्ञ विवेचन केलं आहे. परमेश्वराशी भक्ताचं नातं अनेक ‘भाव’रूप असतं. शांत भाव म्हणजे पत्नीची पतीबद्दलची गंभीर स्वीकारात्मक भावना, दास्य म्हणजे दासवृत्तीने केलेली सेवा, सख्य म्हणजे मैत्री आणि माधुर्य म्हणजे शृंगारिक, या भावांपलीकडे जाणारा ‘महाभाव’ (प्रेमरूप) त्यांनी जपला.
काकर यांनी परमहंसांच्या गूढवादी, साक्षात्कारी अनुभवांची कार्यकारण परंपरा मांडली आहे. बालपणातील अनुभव, प्रकृतीमधील सर्जक आणि संवेदनशील वृत्ती आणि यांना परिपोषक ठरणारी सांस्कृतिक, सामाजिक संरचना या तीन गोष्टींच्या पायावर श्रीरामकृष्णांचं असामान्य नि अद्वितीय, श्रद्धेय साक्षात्कारी गूढवादी जीवन उभं आहे.  गांभीर्यानं जीवनाकडे पाहणाऱ्यांनी हे पुस्तक अजिबात सोडू नये.
 डॉ. राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – गीता स्वतंत्र दृष्टी नसून, एक सुंदर दृष्टीसमन्वय आहे !
‘‘तत्त्वज्ञानात आमच्या देशाचा दर्जा फारच उच्च, जवळजवळ पहिला म्हटला तरी चालेल. पण तो काळ मागचा. चालू कोणत्याही प्राकृत भाषांतून त्या मूळ तात्त्विक ग्रंथावर नुसती भाष्ये व रूपांतरे झाली आहेत. अद्यापि तोच प्रकार चालू आहे. स्वतंत्र भरती नाही. ह्य़ा भाष्याची प्रथा प्रत्यक्ष तत्त्वसिद्धान्ताचे मेरुमणी श्रीमदाद्यशंकराचार्य ह्य़ांनीच घालून दिली, ही त्यातल्या त्यात मोठी आश्चर्याची गोष्ट! स्वामी रामानंद तीर्थ या आधुनिक द्रष्टय़ाने ह्य़ा प्रथेबद्दल श्रीमदाद्यशंकराचार्याचा निषेध सौम्य भाषेत का होईना पण धैर्याने केला आहे. पहिल्या आचार्यानाच असे केल्यामुळे त्यानंतरच्या संस्कृत आचार्याना व चालू भाषेत ग्रंथ लिहिणाऱ्या ज्ञानेश्वर, एकनाथ इत्यादि तत्त्ववेत्त्यांना आपल्या लिखाणातून हाच गौण मार्ग पत्करावा लागला आहे. पुढे पुढे तर एका गीतेच्या घाण्याभोवती मराठीतील समग्र तात्त्विक विचारचक्र फिरू लागले.. मूळ गीताच आधी एक स्वतंत्र दृष्टी नसून, तो एक सुंदर दृष्टीसमन्वय आहे; आणि तिचा अर्थ सरळ व सोपा असूनही मागून झालेल्या पंडितांनी व आचार्यानी अर्थवादाचे भारूड मात्र माजविले नव्हे काय? ह्य़ा भारूडाचे महत्त्व फार आहे हे मी आदरपूर्वक कबूल करतो. पण ते वाङ्मयदृष्टीने आहे.. तत्त्वज्ञान म्हणजे, व्यक्तीला जे चालू व्यवहाराचे अनुभव आले असतात त्यांना तिच्या अध्यात्मिक भावना म्हणजे श्रद्धा, सहानुभूती, प्रेम, इत्यादिकांचे माप लावून केलेला हिशेब अथवा अनुमान.’’ असे महर्षि  वि. रा. शिंदे मराठीतल्या तत्त्वज्ञानाचा परामर्श घेत तरुणांना आवाहन करतात – ‘‘बाबांनो, तुम्ही आपले सर्व पूर्वग्रह पुन: सोडून द्या आणि तुमच्या स्वत:च्यासाठी आधीच मिळवून ठेविलेल्या माहितीला तुमच्या स्थानिक निर्विकार अनुभवांची जोड देऊन, अशी काही नवी दिशा दाखवा की जेणेकरून आमचे पूर्वग्रह नाहीसे होतील आणि नवीन आशा उत्पन्न होईल. परमेश्वर करो आणि हे मराठी वाङ्मयाचे पांग फिटोत!’’