News Flash

कुतूहल : कोऱ्या कापडाची धुलाई

दुसरी प्रक्रिया असते ती स्वच्छतेची म्हणजे धुलाईची.

एकदा मागावर कापड तयार झाले की त्यानंतर त्याची कपडा खात्याच्या घडी विभागात (फोल्डिंग) दोषाकरिता तपासणी होते. तिथे कापडात असलेल्या मामुली दोषांचे निराकारण केले जाते. मोठे दोष असलेले कापड कापून बाजूला काढले जाते. त्याच वेळी कापडाबाहेर लोंबकाळणारे सर्व धागे कापून टाकले जातात. पुढच्या सर्व प्रक्रियांसाठी कापड जोडून मोठे रोल तयार केले जातात. त्यानंतर हे कापड पुढील रासायनिक प्रक्रियांसाठी रवाना केले जाते.
दुसरी प्रक्रिया असते ती स्वच्छतेची म्हणजे धुलाईची. मागावर तयार झालेल्या कापडातील तेल, चरबी तसेच नसíगकरीत्या आलेले किंवा कापड तयार होताना मुद्दाम घातलेले अनावश्यक पदार्थ काढण्यासाठी धुलाई केली जाते. तेल आणि चरबी यांची उपस्थिती कापसाच्या उत्पादनापासून काही प्रमाणात असते. सरकीच्या तेलाचा अंश सरकी काढण्याच्या (जिनिंग) टप्प्यावर येऊ शकतो. तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोहाची मात्रा काही प्रमाणात कापसाच्या पिकात असते. काही प्रमाणात जिनिंगच्या वेळी त्याची भर पडते. सुती कापड पुढच्या ब्लीचिंग, मर्सरायिझग, डाइंग (रंगाई) आणि फिनििशग या प्रक्रिया करण्यासाठी पाठवण्यापूर्वी हे अनावश्यक पदार्थ कापडातून काढून टाकणे गरजेचे असते. ते कोऱ्या कापडाच्या धुलाई प्रक्रियेत केले जाते.
धुलाईची ही पद्धत सोडय़ाच्या द्रावणात कपडा उकळणे या नावानेही परिचित आहे. त्याचे कारण तीव्र स्वरूपाचे आम्लारीचे (अल्कली) द्रावण या प्रक्रियेत वापरले जाते. नेहमी कॉस्टिक सोडय़ाचा वापर यासाठी केला जातो. तीव्र स्वरूपाच्या कॉस्टिक सोडय़ाच्या द्रावणात कापड दोन ते चार तास उकळले जाते. त्या वेळी त्या द्रावणात पाणी शोषून घ्यायला आणि कापड स्वच्छ व्हायला मदत करणारे इतर काही घटक घातले जातात. त्यानंतर गरम पाण्यातून हा कपडा व्यवस्थित धुवून घेतला जातो. मग पुन्हा थंड पाण्यात हा कपडा धुतात. त्याशिवाय आम्लारीचा कोणताही अंश पाण्यात राहणार नाही याची पण काळजी घेतली जाते. कॉस्टिक सोडय़ाच्या क्रियेमुळे तेल, चरबी आणि अन्य अनावश्यक पदार्थ निघून जातात. तसेच कापसाच्या नसíगक रंगछटेत काही प्रमाणात फरक पडतो. ही प्रक्रिया दाबासहित अवस्थेत तसेच दाबविरहित अवस्थेत अशी दोन्ही प्रकारे केली जाते. त्या प्रक्रियेनुसार तापमान आणि प्रक्रियेचा कालावधी यात फरक केला जातो. पण अंतिमत: कापड स्वच्छ होणे साध्य केले जाते.
सतीश दिंडे (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – फलटण संस्थान
साताऱ्यापासून साठ कि.मी. वर ईशान्येला असलेले फलटण हे शहर ब्रिटिशराजमधील फलटण संस्थानाचे प्रमुख शहर होते. बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या डेक्कन स्टेट एजन्सीत वर्ग असलेले हे संस्थान मूळचे सातारा जहागिऱ्यांपकी एक होते.
शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी सईबाईंचे माहेर फलटणचे. फलटण संस्थानाचे राज्यकत्रे  निंबाळकर हे धारच्या परमार घराण्याचे वंशज; पण त्यातले काही फलटण तालुक्यातील निंबळक या गावी स्थायिक झाले आणि ते निंबाळकर झाले. पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात मोगलांकडे नोकरीस असलेल्या निंबाजी निंबाळकर याला फलटण आणि आसपासची काही गावे जहागिरी आणि नाईक हा किताब मिळाला. त्यांच्या पुढील वंशजांपकी काहींनी आदिलशाहकडे तर काहींनी हैदराबादच्या निजामाकडे सेनाधिकाऱ्याच्या हुद्दय़ावर नोकरी आणि सरदारकी केली. फलटणच्या निंबाजी नाईक-निंबाळकर यांच्या वारसांपकी मालोजीराव यांनी आणखी काही गावे घेऊन आपल्या जहागिरीला छोटय़ा राज्याचे स्वरूप आणले.
अठराव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात मोगल सत्ता दुबळी झाल्यावर फलटण जहागिरी सातारा छत्रपतींच्या नियंत्रणाखाली आली. ईस्ट इंडिया कंपनी सरकारने १८४८ साली सातार्याचे राज्य खालसा केल्यावर फलटणची जहागीर कंपनी सरकारचे अंकित संस्थान बनले ते पुढे १९४७ साली स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंत.
निंबाळकर घराण्याचे सोळावे शासक बजाजीराव नाईक निंबाळकर (इ.स. १६४४ ते १६७६) यांनी आदिलशाहाच्या वतीने अनेक लढायांमध्ये भाग घेतला. अदिलशाहाच्या दबावाने त्यांनी मुस्लीम धर्म स्विकारला. परंतु शिवाजी महाराजांनी निरानरसिंगपूर येथे त्यांना परत हिंदू धर्म स्वीकारावयास लावला.
फलटणचे राजे मुधोजीराव चतुर्थ यांची राजकीय कारकीर्द इ.स.१८४१ ते १९१६ अशी प्रदीर्घ (७५ वर्षे) झाली. भारतीय राज्यकर्त्यांपकी सर्वाधिक काळ राज्य करणारे अशी त्यांची ओळख. श्रीमंत मालोजीराव निंबाळकर चतुर्थ हे फलटण संस्थानाचे शेवटचे शासक.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2015 6:47 am

Web Title: blank cloth washing
टॅग : Navneet
Next Stories
1 मिरज संस्थान
2 कोऱ्या कपडय़ातील कांजी काढणे
3 संस्थान कुरुंदवाड
Just Now!
X