आपल्या शरीरातलं रक्त ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे, की ती आपल्याला शिकण्यासाठी आणि स्मरणशक्तीसाठी अतिशय उपयोगाची आहे. ज्या वेळेस आपल्याला नवीन एखादी गोष्ट शिकायची असते, त्या वेळेला आपलं पूर्ण लक्ष त्याच गोष्टीकडे असतं. उदाहरणार्थ, आपण जेव्हा सायकल शिकत असतो तेव्हा पाय कसे ठेवायचे, हात कसे ठेवायचे, स्वत:ला तोलून कसं धरायचं, या गोष्टींकडे आपलं अतिशय लक्ष असतं. आपण एखादं नवीन वाद्य शिकत असतो, तेव्हा बोटांच्या हालचाली कशा करायच्या, आपलं काही चुकणार नाही ना, याकडे खूप लक्ष देत असतो.

जेव्हा आपण त्या गोष्टींकडे पूर्ण लक्ष देतो, त्या वेळेला मेंदूतला रक्तप्रवाह त्या विशिष्ट क्षेत्रांकडे विशेषत्वाने वळवला जातो. यामुळेच शंभर टक्के लक्ष देणं आपल्याला जमतं. ती गोष्ट आत्मसात होईपर्यंत हे चालू राहतं. जसजसं आपल्याला ते विशिष्ट कौशल्य प्राप्त होतं, तसतसं शिकण्याकडे, योग्य हालचालींकडे पूर्ण लक्ष देण्याची गरज उरत नाही. मेंदूलाही हे कळतं की, आता पूर्वीसारखा रक्तप्रवाह तिथं वळवण्याची गरज नाही, त्यामुळे हळूहळू तिथला रक्तप्रवाहाचा वेग काहीसा कमी व्हायला लागतो.

याशिवाय आणखी एक गंमत म्हणजे, जेव्हा आपण अतिशय सराईतपणे सायकल शिकल्यानंतर अगदी सहजपणे गाणं गुणगुणत, गप्पा मारत किंवा मनात वेगळेच विचार आणत व्यवस्थित सायकल चालवू लागतो. कारण सायकल कशी चालवायची, याकडे आता आपल्याला लक्ष द्यायचं नसतं. सायकल चालवणं, गणित शिकणं, एखादा प्रयोग करून बघणं, चित्र काढणं, एखादं मशीन चालवायला शिकणं.. या शिकण्यात रक्तप्रवाह आपल्याला मदत करत असतो.

याचा थोडक्यात अर्थ असा की, जेव्हा कोणतीही नवीन गोष्ट शिकायची असते तेव्हा आपलं लक्ष असायला पाहिजे. मन भटकता कामा नये. पूर्ण लक्ष देऊन जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतो, पुन्हा पुन्हा सराव करतो, पूर्णपणे ते नवं शिकणं आत्मसात झालं की त्याची इतकी सवय होऊन जाते, की पुन्हा इतकं लक्ष देण्याची गरज उरत नाही.

– श्रुती पानसे contact@shrutipanse.com