– डॉ. यश वेलणकर

माणूस हा सामाजिक प्राणी म्हणून ओळखला जातो. याचमुळे एकांतवासाची शिक्षा- ज्यात दुसऱ्या माणसाचा प्रत्यक्षात वा आभासी संपर्क होत नाही- ही सर्वात त्रासदायक मानली जाते. माणसाचे सर्वागीण स्वास्थ्य हे इतर व्यक्तींशी असलेल्या नातेसंबंधांशी जोडलेले आहे असे शास्त्रज्ञांना वाटते. मला माझ्या परिचयातील व्यक्तीने ओळख न दाखवल्यास माझ्या शरीरातही त्रासदायक संवेदना निर्माण होतात. सामाजिक नाकारलेपण, दुसऱ्या माणसाने मला महत्त्व न देणे हे उदासी निर्माण करतेच; पण साक्षात सूक्ष्म शारीरिक वेदनाही निर्माण करते. स्वत:च्या शरीराकडे लक्ष नसल्याने आपण अमुक आपल्याशी असे का वागले याच विचारात राहतो व शरीरातील वेदना जागृत मनाला जाणवतच नाहीत.

मात्र, त्या निर्माण होत असतात हे आधुनिक मेंदूविज्ञान सांगू लागले आहे. भावनिक मेंदू या सूक्ष्म त्रासदायक वेदनांना प्रतिक्रिया करतो, त्यामुळे संबंधित प्रसंग स्मरणशक्तीमध्ये साठवला जातो. पूर्वी हे प्रत्यक्षात भेटणाऱ्या दोन व्यक्तींमध्येच होत असे. आता समाजमाध्यमांवरही होते. माझ्या ‘पोस्ट’ला ‘लाइक’चे किती अंगठे मिळत आहेत किंवा किती जण माझी ‘पोस्ट’ वाचत आहेत, यावर माझी नजर असते. ते अपेक्षेइतके मिळाले नाहीत, की प्रत्येक वेळी मेंदूतील वेदना निर्माण करणारे केंद्र काम करते. त्यामुळे शरीरात छातीवर भार, डोके जड होणे अशा संवेदना निर्माण होतात. त्यास नकळत केली जाणारी प्रतिक्रिया एकटेपणा आणि उदासी वाढवीत जाते.

अधिकाधिक ‘लाइक’च्या अपेक्षा ठेवायच्या नाहीत, हे मी स्वत:ला समजावले तरी ते केवळ बुद्धीच्या पातळीवर राहते. मेंदूतील वेदना निर्माण करणाऱ्या भागाला हा विचार समजत नाही. तो भाग प्रतिक्रिया करीत राहतोच. येथेच साक्षीध्यानाचा सराव उपयोगी ठरतो. कृती करत असताना मेंदूत काय घडते, हे आता पाहता येते. त्यामध्ये असे दिसते की, माणसाच्या मेंदूत दुसऱ्या व्यक्तीच्या भावना समजणारा ‘इन्सुला’ नावाचा भाग आहे. गंमत म्हणजे, याच भागामुळे स्वत:च्या शरीरातील संवेदनाही जागृत मनाला जाणवतात. शरीरावर लक्ष नेण्याच्या नियमित सरावाने हा भाग सक्रिय होऊन सूक्ष्म संवेदना समजू लागतात. त्यांना प्रतिक्रिया केली नाही, की त्यांचा ठसा आणि अप्रिय आठवणी मेंदूत राहत नाहीत. त्यामुळे अस्वीकाराची उदासी टाळता येतेच, पण समानुभूतीही विकसित होते.

yashwel@gmail.com