ट्रान्सयुरेनिअम मूलद्रव्यांची निर्मिती प्रयोगशाळेत वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या अणुसंमीलनाने केली जाते. अशा प्रकारे निर्माण झालेल्या अणूंचे अर्धायुष्यकाल सेकंदात किंवा त्यापेक्षाही कमी असल्याने त्यांच्या उपयोजनाबद्दल कधी प्रश्नच उद्भवला नाही. असे असताना सामान्य माणसाला प्रश्न पडतो की, अशा संशोधनाचा मग उपयोग काय? शास्त्रज्ञ मात्र याकडे वेगळ्या नजरेने पाहातात. अशा प्रयोगांचे महत्त्व वैज्ञानिक संशोधनाच्या दृष्टीने वादातीत असते, कारण यावरून सद्धांतिक अंदाजांची पडताळणी करता येते. या संदर्भात ‘बोहरिअम’ विशेष भूमिका बजावते.

सुपरहेवी मूलद्रव्यात अणुक्रमांक १०४ व १०५च्या शोधानंतर आवर्त-सारणीचा सिद्धांत सापेक्षवादी सिद्धांतामुळे उलटवला जाण्याची चिन्हे दिसत असताना, बोहरिअमवरील प्रयोगांनी १४० वर्षांपूर्वी मांडलेल्या आवर्त-सारणीच्या सिद्धांतावर शिक्कामोर्तब केले.

१९७६ मध्ये रशियातील जे.आय.एन.आर. प्रयोगशाळेत बिस्मथ-२०९वर क्रोमिअम-५४चा आणि शिसे-२०८ वर मँगेनीज-५५चा मारा केला गेला. या प्रयोगात त्यांना दोन प्रकारचे अणू मिळाले- एक बोहरिअम आणि दुसरा डबनिअम असावा असा कयास त्यांनी बांधला. यापैकी बोहरिअमची निर्मिती खात्रीशीर नव्हती. सहा वर्षांनी म्हणजे १९८१ मध्ये जर्मनीच्या जी.एस.आय. प्रयोगशाळेत पीटर आर्मबस्टर, गॉटफ्रिड मुंझनबर्ग आणि सहकाऱ्यांनी बोहरिअम मूलद्रव्य तयार केले. या शास्त्रज्ञांनी शीतसंमीलन पद्धतीने बिस्मथ-२६९ वर क्रोमिअम-५४ च्या वेगवान अणूंचा मारा करून बोहरिअमच्या काही अणूंची निर्मिती केली. जे.आय.एन.आर. आणि जी.एस.आय. या दोन्ही संस्थांनी बोहरिअमचा अणू निर्माण केल्याचा दावा केला होता; परंतु जी.एस.आय.च्या प्रयोगाच्या विश्वासार्हतेमुळे त्यांचा दावा ग्राह्य़ मानून त्यांना श्रेय दिले गेले. या मूलद्रव्याचे नामकरण प्रसिद्ध डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ नील बोहरच्या नावावरून झाले. १९९२ मध्ये जी.एस.आय.ने या मूलद्रव्याला नील्सबोहरिअम (Ns) हे नाव सुचविले होते. शास्त्रज्ञाचे पूर्ण नाव न देता आयुपॅकने बोहरिअम या नावाला संमती दिली. नामकरणाचा वाद संपून १९९७ साली या मूलद्रव्याची ओळख बोहरिअम या नावाने आंतरराष्ट्रीय पातळीवर जाहीर करण्यात आली.

बोहरिअमची १२ समस्थानिके ज्ञात आहेत. सर्वात स्थिर समस्थानिक 270Bh असून त्याचा अर्धायुष्यकाल केवळ ६१ सेकंद आहे.बोहरिअम सामान्य तापमानाला घन स्वरूपात असावा व त्याच्या अणूंची रचना ऱ्हेनिअमसारखी भरीव षटकोनी असावी. बोहरिअम सातव्या गणातील सर्वाधिक जड मूलद्रव्य आहे. उच्चतम घनता असणाऱ्या मूलद्रव्यांत ते तिसऱ्या क्रमांकावर असावे असा अंदाज आहे.

– मीनल टिपणीस

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org