लिखित किंवा मुद्रित पृष्ठांचा बांधलेला संग्रह ज्यात मानवाचे विचार, कल्पना, ज्ञान आदी ग्रथित करुन ठेवले जातात त्याला स्थूल मानाने ग्रंथ किंवा पुस्तक म्हटले जाते. कागदाचा शोध इ. स. १०५  च्या सुमारास चीनमध्ये लागेपर्यंत ताडपत्रे, भूर्जपत्रे, पपायरसचे पापुद्रे अशा झाडांच्या पानांवर बहुतेक साहित्य हस्तलिखितात नोंदवले जात होते. पुढे कागदावर लेखन सर्रासपणे होऊ लागले. तरीही ग्रंथनिर्मिती मर्यादित होती कारण मूळ लेखन आणि त्याच्या प्रती हाताने लिहिणे भाग होते. १४३९  सालच्या योहान गुटेनबर्गच्या मुद्रणयंत्राच्या शोधानंतर मात्र त्या प्रक्रियेला प्रचंड वेग मिळाला. दस्तऐवजांचे वेगवेगळे प्रकारही निर्माण होऊ लागले – पुस्तक, पुस्तिका, पत्रक, नियतकालिक इत्यादी.

पुस्तक : संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनेस्को विभागाने पुस्तक म्हणजे मजकुराची ४९  हून अधिक पाने असलेला दस्तऐवज अशी व्याख्या दिली आहे. (त्याची ओळख सांगणारा किमान एक घटक जसा की लेखक किंवा प्रकाशक असावा, असे काहीवेळा अपेक्षित असते). पुस्तक वर्षांत केव्हाही प्रसिध्द होऊ शकते. त्याच्या पानांच्या आकारावर कुठलेही बंधन नाही. मात्र त्याचे संबोधन कागदाच्या आकारांप्रमाणे (क्वाटरे, ऑक्टेवो आणि ड्यूओडेसिमो) किंवा बांधणीप्रमाणे (हातबांधणी, कागदी बांधणी आणि मऊ किंवा कठीण पुठ्ठ्याची बांधणी) होऊ शकते. भारत सरकारने दिलेलाआय.एस.बी.एन. (इंटर नॅशनल स्टॅन्डर्ड बुक) हा प्रत्येक पुस्तकाची एकमेव अशी ओळख सांगणारा क्रमांक असतो.

मोनोग्राफ : एकाच विषयाबाबत विद्वत्तापूर्ण सखोल अभ्यास मांडणारेपुस्तक.

ट्रीटिझ् : लिखित किंवा छापील प्रबंध किंवा पुस्तक.

ई-पुस्तक : पुस्तकच, पण इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाने प्रसिध्द केले गेलेले. ते केवळ अंकीय उपकरणाने वाचता येते उदा. संगणक, किंडल, सोनी रीडर वगरे. त्यामधील अंकीय जोडण्यांमुळे अंतर्गत मजकूर विविधप्रकारे शोधणे सुलभ असते.

पुस्तिका : ४९ हून कमी पाने असलेला केव्हाही प्रसिद्ध होऊ शकणारा दस्तऐवज. लहान पुस्तिका (ब्रोशुअर), पत्रक, हस्तपत्रक असे तिचे प्रकार असतात.

नियतकालिक : हे म्हणजे ठराविक कालांतराने प्रसिध्द होणारे दस्तऐवज, जसे की साप्ताहिक, पाक्षिक, त्रमासिक इत्यादी. वृत्तपत्रिका (न्यूजलेटर) ही त्याचाच एक प्रकार आहे.  नियतकालिकाच्या आकारावर आणि पृष्ठांच्या संख्येवर कुठलेही बंधन नाही. त्याचे एका वर्षांचे सर्व अंक मिळून सहसा एक खंड बनतो.भारत सरकारने दिलेला  आय.एस.एस.एन. (इंटर नॅशनल सिरिअल नंबर,)  हा प्रत्येक नियतकालिकाची ओळख सांगणारा क्रमांक असतो.

दैनिक : हा दस्तऐवज म्हणजे वर्तमानपत्र, रोज प्रसिध्द होणारा असा नियतकालिकाचा एक विशिष्ट प्रकार आहे. त्याच्या पृष्ठांची संख्या बहुधा ठराविक राहाते. त्याला शासकीय नोंदणी क्रमांक दिलेला असतो.

– डॉ. विवेक पाटकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

गिरीश कर्नाडांचे ‘ययाती’

कन्नड भाषेतील अतिशय उच्च दर्जाचे आधुनिक नाटककार म्हणून गिरीश कर्नाड यांची ओळख आहे. खऱ्या अर्थाने ते हाडाचे नाटककार आहेत. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक अशा विविध विषयांवरील त्यांची नाटके खूप गाजली. १९६०-७०च्या काळात नाटक परंपरेत एक नवी परंपरा निर्माण करण्याचे श्रेय कर्नाडांना जाते. कर्नाड आपल्या नाटकात भारतीय इतिहास, लोककथा, लोकसंगीत यांचा वापर अतिशय तरलपणे आणि परिणामकारकरीत्या करतात.

ययाति (१९६१), तुघलक (१९६४), हयवदन (१९७१), अंजू मल्लिगे (१९७७), नागमंडल (१९८८), तलेदण्ड (१९९०), अग्रि मत्ते माले (१९९५) इ. त्यांची तेरा नाटके प्रसिद्ध झाली आहेत. प्रयोगही झाले आहेत. मराठीसह इतर अनेक भाषांत या नाटकांचे अनुवाद प्रकाशित झाले आहेत. ‘अंजू मल्लिगे’ नाटकाचा मराठी अनुवाद ‘काटेसावरी’ नावाने सरोज देशपांडे यांनी केला आहे. विषय, आषय आणि वेगळी हाताळणी हे त्यांच्या नाटकाचे विशेष आहेत.

‘ययाति’ (१९६१) हे पहिले नाटक लिहून झाले तेव्हाच ‘नाटक’ हे आपले क्षेत्र आहे याची त्यांना खात्री पटली. १९६१ मध्येच या नाटकाला कर्नाटक राज्य शासनाचे पारितोषिकही मिळाले.  हे नाटक कर्नाडांनी एकटाकी लिहून काढले आहे. ययाति आणि देवयानी यांच्या लग्नानंतरची ही कथा असून, पुरूच्या पात्रकल्पनेत त्यांनी मूळ कथेत बदल केला आहे. विषयाची हाताळणी, तंत्र, दोन्हींची सांगड घालून, विलक्षण यशस्वीपणे हे नाटय़लेखन केले आहे.

ऱ्होड्स स्कॉलरशिप मिळाल्यावर इंग्लंडला जाण्याअगोदर एकदा आपण इतिहास, रामायण, महाभारत समजून घ्यायला हवे म्हणून त्यांनी सी. राजगोपालाचारी (राजाजी) यांचे ‘संक्षिप्त रामायण’ आणि ‘संक्षिप्त महाभारत’ वाचून काढले. त्या वेळेस ‘ययाति’ची कथा वाचून विचारचक्र सुरू झाले. वडिलांपेक्षा मुलगा वृद्ध होतो हा प्रसंग नाटय़मय होता, पण ते वाचून कर्नाडांच्या मनात आले, या मुलाला पुरूला- बायको असती तर तिने या परिस्थितीत काय केले असते? तिने ही अनैसर्गिक परिस्थिती मान्य केली असती का? सगळी पात्रे जिवंत होऊन नजरेसमोर वावरू लागली आणि झपाटल्यासारखे संवाद कन्नड भाषेत त्यांनी कागदावर लिहून काढले. त्या वेळी आपण नाटक लिहितोय असेही त्यांना वाटले नाही.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com