गेल्या दोन हजार वर्षांपासून भारतीय प्रदेशात आलेल्या अनेक परकीय आक्रमक, रानटी टोळ्या, कलाकार, नोकरदार, धर्मप्रचारक यांना भारतीय सुबत्तेचे, संस्कृतीचे आकर्षण वाटत आले, ते इथे स्थायिक झाले आणि इथेच रमले. त्याचप्रमाणे काही परकियांना, विशेषत ख्रिस्ती धर्मप्रचारक, तसेच ब्रिटिश, पोर्तुगीज, फ्रेंच प्रशासकीय कर्मचाऱ्यांना इथल्या विविध स्थानिक भाषांनीही भुरळ घातली! त्यातील अनेकांनी मराठी, तमिळ, मल्याळम, बंगाली, कोंकणी वगरे स्थानिक भारतीय भाषांचा सखोल अभ्यास करून त्यात ग्रंथनिर्मितीही केली.

पोर्तुगालमधील फ्रान्सिस्कन, डोमिनिकन आणि जेसुइट इत्यादी पंथाचे मिशनरी भारतात येऊन गोवे आणि दक्षिण भारतातील विविध प्रदेशांत त्यांनी सोळाव्या शतकाच्या आरंभी जम बसवला. हे लोक भारतात येण्यापूर्वीही बरेच पाश्चात्त्य प्रवासी या प्रदेशात येऊन, येथील लोकांच्या चालीरीतींचा अभ्यास करून मायदेशी परतले. परंतु भारतात स्थायिक होऊन, येथील भाषांचा अभ्यास करणारे आणि या भाषांमध्ये ग्रंथनिर्मिती करणारे जेसुइट मिशनरी हेच पहिले परकीय लोक होत. केवळ ग्रांथिक भाषांचाच नव्हे, तर भारतीय प्रदेशातील कित्येक लहानसहान बोलींचा देखील ख्रिस्ती मिशनऱ्यांनी अभ्यास करून आपल्या धर्मप्रसाराच्या मदतीकरिता आवश्यक म्हणून या भाषांची व्याकरणे आणि त्यांचे कोश लिहिले. पुढे युरोपियन लोक ज्या ज्या भागात राज्यकत्रे बनले तेथे लोकभाषेचा त्यांनी अभ्यास चालू केला. पुढे भारतात येणाऱ्या त्यांच्या देशबांधवांसाठी उपयोगी पडावे म्हणून युरोपियनांनी भारतीय भाषांची व्याकरणे आणि कोश तयार केले. भारतातील बहुतेक स्थानिक भाषांची आरंभीची सुसूत्रीत व्याकरणे आणि कोश यांची निर्मिती या परकीय, विदेशी लोकांकडूनच झालेली दिसते. या लोकांनी केवळ धार्मिक ग्रंथ भारतीय भाषांमध्ये निर्माण केले असे नसून गणितासारख्या क्लिष्ट विषयांचे ग्रंथही मराठी आणि इतर स्थानिक भाषांमध्ये त्यांनीच निर्माण केले आहेत.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com