आपल्याला अधूनमधून कंटाळा येत असतो. हा कंटाळा मेंदूत नेमका कुठे असतो, हे शोधण्याचा प्रयत्न मेंदू शास्त्रज्ञांनी केला तेव्हा त्यांना असं आढळलं की कंटाळ्याचं मूळ हे नकारात्मक भावनेमध्ये आहे.

कंटाळा ही एक नकारात्मक भावना आहे हे खरं. मुळात आपल्याला कंटाळा का येतो? याचं उत्तर सतत एकसुरी गोष्टी करत राहिल्यामुळे. वातावरणात कोणतीही नवीन आव्हानात्मक गोष्ट नसते त्या वेळेला कंटाळा येतो.

कंटाळा दिवसातून किती वेळा येतो, कोणाकोणाला येतो, कोणामुळे येतो, कोणामुळे जातो, तो जावा म्हणून आपण कोणकोणते उपाय करतो, अनेक उपाय केल्यानंतर नक्की कशामुळे कंटाळा जातो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाने आपापल्या मनात दिली तरीसुद्धा एका प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल की कंटाळा ही नकारात्मक भावना असली तरीसुद्धा त्यातून काहीतरी सकारात्मक सापडून जातं.

उदाहरणार्थ, कंटाळा कोणकोणत्या कारणांमुळे जातो, या प्रश्नाचं उत्तर सोडवायला गेलं तर त्यातूनच अनेक सर्जनशील गोष्टी जन्म घेताना दिसतात. लहान मुलांना कंटाळा येतो त्या वेळेला मुलं अनेक खेळ शोधून काढतात. खूप कंटाळलेली मुलं जास्त काळ या भावनेत राहत नाहीत. पळापळी करून, ते जमत नसेल तर वहीच्या कागदाचे बाण करून, तेही जमलं नाही तर एकमेकांच्या खोडय़ा काढून, ते स्वत:चा कंटाळा घालवतात. असं केल्यामुळे मोठय़ा माणसांना त्रास होत असला तरी त्यांच्या बुद्धीला मात्र त्यावेळेला गमतीदार चालना मिळालेली असते. मुलांचे अनेक खेळ हे कंटाळा घालवण्यासाठीचे उपाय आहेत.

मोठी माणसं कंटाळा घालवण्यासाठी काय करतात? तर तेदेखील अनेक सर्जनशील गोष्टी करतात. नवे छंद, नव्या ओळखी, नवे छंद, पुस्तक वाचणं, पर्यटन.. यांतूनच माणसं कंटाळा घालवत असतात. आपल्या घरांतले ज्येष्ठ नागरिक एकमेकांशी उगाचच वादविवाद करताना दिसतात. खरं तर त्यातून काहीही फारसं निष्पन्न होणार नसतं. पण हाताशी वेळ भरपूर असतो. कंटाळा घालवायचा असतो आणि त्यायोगे मेंदू कार्यप्रवृत्त होतो.

सध्याच्या परिस्थितीत मात्र, आला कंटाळा की जा सोशल मीडियावर किंवा मोबाइल गेम्स खेळ, असं सुरू झाल्यामुळे नव्या, सर्जनशील कृती मुलं शोधणार नाहीत की काय, असं वाटून जातं. – डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com