23 February 2019

News Flash

वनस्पतींच्या वाढीसाठी – बोरॉन

कृषी क्षेत्रात बोरॉनचे महत्त्व आता अधोरेखित झाले आहे.

वनस्पतींच्या सुदृढ वाढीसाठी आवश्यक अठरा मूलद्रव्यांच्या प्रभावळीमध्ये ज्या सूक्ष्म मूलद्रव्यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामध्ये बोरॉनचा समावेश होतो. कॅल्शियम आणि नायट्रोजनचे वनस्पतींच्या चयापचय क्रियेमध्ये योग्य नियोजन करणे हे याचे मुख्य कार्य.

कृषी क्षेत्रात बोरॉनचे महत्त्व आता अधोरेखित झाले आहे. हे मूलद्रव्य जमिनीमध्ये बोरॅक्सच्या रूपात पाण्यामध्ये विद्राव्य असते. पेशीभित्तिकांना मजबूत आधार देण्याचे काम याच मूलद्रव्याचे, म्हणूनच वनस्पतीच्या अवयवांमध्ये ताकद आणि रोगप्रतिकारशक्ती तयार होते. कमकुवत पेशी रोगांना सहज बळी पडतात. हरित वनस्पतीने तयार केलेल्या तयार शर्कराचे वहन फळ, बीज आणि विविध प्रकारच्या कंदांकडे होऊन तिथे ती विविध प्रकारांत साठवली जाते. या शर्करा वहनामध्ये बोरॉनचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. अनेक फळे चवीला मधुर असतात. त्यामधील शर्करा बोरॉनच्या साहाय्यानेच तेथे आलेली असते.

वनस्पतीतील फुलनिर्मिती, परागीभवन, फलधारणा, फळांची संख्या, बीजनिर्मिती हे सर्व बोरॉन आणि संप्रेरके यांच्या जादूई मत्रीमुळेच घडत असते. डाळवर्गीय पिकांच्या मुळावर हवेमधील नायट्रोजन स्थिर करणाऱ्या गाठी असतात. या गाठींची संख्या, नायट्रोजनचे प्रथिनात रूपांतर, त्यांची डाळीमध्ये साठवण हे सर्व या जादूगाराच्या वैज्ञानिक कार्यक्षमतेमुळेच शक्य असते. पिकांना बोरॉन उपलब्धतेसाठी जमिनीमध्ये सेन्द्रिय घटक असणे गरजेचे आहे. बोरॉनच्या कमतरतेमुळे फुले, फळे यांचे अकाली गळून पडणे, पिकांची वाढ खुंटणे, परागीभवनात अडथळा, फळे आणि बियांची संख्या कमी होणे हे पाहावयास मिळते. शेतीमध्ये नत्र (नायट्रोजन), स्फुरद (फॉस्फरस) आणि पालाश (पोटॅशियम) या मूलद्रव्यांना महत्त्व आहे, मात्र त्यांच्या योग्य कार्यक्षमतेसाठी बोरॉनची गरज असते आणि शेतकरी याबद्दल आजही अनभिज्ञ आहेत.

लिंबूवर्गीय फळे, कडधान्ये, कंदमुळे, द्राक्ष, आंबा, केळी यांसारख्या पिकांच्या भरघोस उत्पन्नासाठी शेतकऱ्यांना बोरॉनच्या उपयुक्ततेबद्दल जागृत करणे आवश्यक आहे. आकर्षक रक्तवर्णीय स्ट्रॉबेरी फळामध्ये आढळणाऱ्या काही ओबडधोबड आकारांच्या स्ट्रॉबेरी या बोरॉनच्या कमतरतेच्या शिकार झालेल्या असतात. आपल्या शरीरामधील अस्थी आणि स्नायूंच्या मजबुतीसाठी बोरॉनची सूक्ष्म प्रमाणात गरज असते. ही गरज आहारामधील कडधान्ये, कंदभाज्या आणि विविध फळे सहजपणे पूर्ण करतात म्हणूनच आपला आहार हा चौरस असणे  गरजेचे असते.

-डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

First Published on February 1, 2018 1:51 am

Web Title: boron chemical element