17 January 2019

News Flash

कुतूहल : बोरॉन

बोरॉन हे बोरॉन-१० आणि बोरॉन-११ या दोन समस्थानकाच्या स्वरूपात आढळते.

निसर्गात बोरॉन हे बोरेट, बोरॅक्स आणि केर्नायीट या खनिजांच्या स्वरूपात मिळते. आपल्याला बोरॉनची ओळख ही बोरिक अ‍ॅसिड या औषधी पदार्थामुळे झालेली असते. कधी कुठे खरचटले किंवा थोडी ओलसर जखम झाली की लावा बोरिक अ‍ॅसिड.

सन १८०८ मध्ये ‘सर हम्फ्री डेव्ही (ब्रिटिश)’ आणि त्याच वर्षी ‘जोसेफ लुईस गे-लुसेक’ व ‘लुईजॅक थिनर्ड (फ्रांस)’ यांना बोरॉनच्या संयुगापासून बोरॉन हे मूलद्रव्य वेगळे करण्यात यश आले.

बोरॉन हे बोरॉन-१० आणि बोरॉन-११ या दोन समस्थानकाच्या स्वरूपात आढळते. बोरॉनचे खडे काळसर चंदेरी असतात, पण त्यांची पूड केली कीमात्र त्याचा रंग तपकिरी दिसतो.

साधी काच जिला आपण सोडालाइम काच म्हणतो ती बराच वेळ तापवल्यावर तडकते, पण बोरॉनयुक्त बोरोसिलीकेट काच मात्र कितीही तापमानापर्यंत तापविल्यावरसुद्धा तडकत नाही. बरेचसे बोरॉन अशी काच बनविण्यात वापरले जाते, तर काही बोरॉन ग्लासफायबर आणि फायबर ग्लास बनविण्यात वापरले जाते.

असे म्हटले जाते की, बोरॉनच्या उपस्थितीमुळे मंगळ ग्रहावर सर्वप्रथम आर.एन.ए. बनले आणि ते नंतर एका लघुग्रहाच्या धडकीमुळे पृथ्वीवर येऊन पडले ज्यातून जीवनाचा उगम झाला.

आपल्या आरोग्यासाठी जी मूलद्रव्ये उपयुक्त म्हटली जातात त्यात बोरॉन हे तसे अपरिचितच नाव वाटते; पण शेतीसाठी जसे याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे तसेच आपल्या आरोग्यातही याचा वाटा विसरता येण्याजोगा नाही. मजबूत हाडे, स्नायूंचा समन्वय, पुरुषांमधील प्रजनन क्षमतेची कमतरता, एवढेच नाही तर विचारशक्ती वाढण्यासाठीही याची आत्यंतिक गरज पडते. संधिवात झाल्यास किंवा टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाल्यास बोरॉनयुक्त औषधे दिली जातात.

आजच्या युगात कॅन्सर हा रोग दुर्धर मानला जातो. केमोथेरपी केल्यास रोगी पेशींबरोबरच निरोगी पेशीही मारल्या जातात; पण बोरॉन न्यूट्रॉन कॅपचर थेरपी वापरल्यास फक्त रोगी पेशीच मारल्या जातात. या संशोधनाचे श्रेय जी. एल. लोच्रर यांनी १९३६ साली केलेल्या संशोधनाला दिले जाते.

अशा तऱ्हेने पृथ्वीवर सर्व मूलद्रव्यांमध्ये अवघे ०.००००८६ टक्के एवढाच वाटा असणारे बोरॉन एका दुर्धर रोगापासून मानवाला वाचवणारे वरदान ठरत आहे.

डॉ. विद्यागौरी लेले, मुंबई

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

First Published on January 31, 2018 2:06 am

Web Title: boron minerals