डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

मेंदू आणि आहार यांचा फार जवळचा संबंध आहे. आहारामध्ये काही गंभीर चुका झाल्या तर माणसाच्या मेंदूमध्ये विविध आजार निर्माण होतात. सध्याच्या आपल्या आहारामध्ये आरोग्याला हानीकारक असलेल्या पदार्थाची ज्या पद्धतीनं वाढ होत आहे, ते बघता याचे मेंदूवर दूरगामी परिणाम होतील हे वेगळं सांगायला नको.

आपण पूर्वीच्या माणसांच्या आहाराबद्दल बोलत असतो. अशी तुलना करताना त्यांचा आहार आणि त्यांचे कष्ट विचारात घ्यायला हवेत. तेव्हा सर्वानाच शारीरिक कष्ट भरपूर होते. आजचा आहार शारीरिक कष्टाच्या तुलनेत व्यस्त असलेला दिसून येतो. हे लहान मुलांपासून मोठय़ा व्यक्तींच्या आहारापर्यंत दिसून येईल. माणसाचे शारीरिक कष्ट कमी झाले, याचा मेंदूला व एकूण आरोग्याला फायदा झाला की तोटा, याचा आपल्यालाच विचार करायचा आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत लोक जो आहार घेत होते, तो सध्याच्या आहारापेक्षा वेगळा होता. कदाचित त्या काळी ताटात चार-दोन पदार्थ कमी असतील, त्यात पोषणमूल्यंही कमी असू शकतील; परंतु हा आहार साधा होता. प्रदूषणविरहित होता. सोप्या घरगुती प्रक्रियांमधून शिजवलेलं ताजं अन्न आहारात असायचं. याचा शरीराला आणि मेंदूला फायदा होता. कोणत्याही प्रकारची ‘प्रिझव्‍‌र्हेटिव्ह’ घालून त्याचं आयुष्य वाढवलेलं नसायचं. मात्र, आज आपल्या खाण्यामध्ये येणारी अशी प्रिझव्‍‌र्हेटिव्हज्, विविध रंग वा कृत्रिम खतांवाटे पदार्थामध्ये शिरलेली विविध घातक रसायनं यांचा एकूण शारीरिक आणि मेंदूच्या आरोग्यावर परिणाम झाल्याशिवाय राहत नाही.

त्यामुळे आजच्या तरुणांच्या आहारात अन्न नाही, तर उत्पादनं असतात, असं म्हणावंसं वाटतं. विविध कंपन्यांची उत्पादनं तरुणाई स्वत:च्या पोटात रिचवत असते. हा आहार ताजा नाही, सकस नाही; त्यामुळे याचे परिणाम असा आहार घेणाऱ्याच्या शरीरावर-मेंदूवर तर होणारच, शिवाय भावी पिढय़ांवरही झाल्याशिवाय राहणार नाहीत.

उत्क्रांती ही नेहमी ऊध्र्व दिशेने होत असते, असं मानलं जातं. पण आहारातली ही अधोगती आहे. ही दिशा योग्य नाही, हे सहजच समजू शकतं.