22 April 2019

News Flash

मेंदूशी मैत्री.. : मेंदू आणि हृदय

इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, मेंदू हा विचार करणारा एकमेव अवयव आहे.

श्रुती पानसे contact@shrutipanse.com

‘माझा मेंदू आणि माझं हृदय यामध्ये संघर्ष चालू आहे’, ‘हृदयाचं म्हणणं मेंदू मान्य करत नाही’, ‘दिमागसे सोचो, दिलसे नही’ अशा प्रकारची वाक्यं अनेक जण करत असतात. हृदयाने विचार करणं म्हणजे भावनांना झुकतं माप देणं आणि मेंदूने विचार करणं म्हणजे तर्काने विचार करणं, असं काहीसं या वाक्यांमधून ध्वनित होतं. हृदय आणि मेंदू यातलं नातं नक्की काय आहे? दिल और दिमाग हे वेगळे आहेत का?

इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, मेंदू हा विचार करणारा एकमेव अवयव आहे. कारण न्यूरॉन्स या ‘शिकणाऱ्या पेशी’ फक्त मेंदूत असतात. इतर कोणत्याही अवयवात नाही. प्रत्येक विचार हा मेंदूत तयार होतो. हा विचार संदेशरूपाने विविध, संबंधित अवयवांपर्यंत पोहोचवला जातो. यावर संबंधित अवयव योग्य ती अंमलबजावणी करतो.

आजवरच्या संशोधनातून असं लक्षात आलं आहे की, तर्कशुद्ध विचार, विश्लेषण करणारी क्षेत्रं मेंदूच्या डाव्या गोलार्धामध्ये आहेत. तर भावनांशी संबंधित केंद्रं ही उजव्या गोलार्धामध्ये आहेत. एखाद्याने भावनांच्या बाजूने निर्णय घेतला तर नक्की विचार केला आहेस ना? असं विचारलं जातं. (कदाचित डाव्या गोलार्धातल्या क्षेत्रांमधली तर्कशुद्धता वापरली गेली नसेल तर?) याउलट भावनांचा जराही विचार न करता केवळ तर्कशुद्ध निर्णय घेतला असेल तर, ‘किती हा कोरडेपणा?’ असं म्हटलं जातं.

आयुष्यातले काही निर्णय प्राधान्याने केवळ डाव्या गोलार्धातल्या क्षेत्रांनुसार विचार करून (बोलीभाषेत सांगायचं तर – काळजावर दगड ठेवून) आणि काही निर्णय उजव्या गोलार्धानुसार (भावनांच्या आहारी जाऊन) घेतले जाऊ शकतात. मात्र ज्यामध्ये दोन्हीचा सारासार विचार करून निर्णय घेतलेले असतील तर ते जास्त योग्य ठरतात.

उदा. झालेल्या घटनेचा अभ्यास आणि विश्लेषण करून डाव्या गोलार्धाचा वापर करून न्यायाधीश निर्णय घेतात, शिक्षा सुनावतात. त्या वेळी उजव्या गोलार्धातून आरोपीच्या भावनांचा विचार करत नाहीत. मात्र याच आरोपीने पुढे दयेचा अर्ज केला तर हा निर्णय राष्ट्रपतींनी उजव्या गोलार्धाचा विचार करून घ्यावा, अशी आरोपीची अपेक्षा असते. यावर राष्ट्रपती दोन्ही गोलार्धाचा वापर करून म्हणजेच सारासार विचार करून निर्णय घेतात. सर्व  निर्णय मेंदूच घेतो, हृदय नाही!

First Published on February 12, 2019 1:02 am

Web Title: brain and heart