आपला मेंदू केवळ आपल्या ताब्यात असतो, दुसऱ्या कोणाच्याही नाही, असं म्हटलं तरी त्याचा शोध मात्र लागत नाही. आपण एखाद्या ओळखीच्या व्यक्तीबाबत म्हणतो की, ‘ते असे वागतील असं वाटलं नव्हतं.’ आपण इतरांबद्दल अशी सहजपणे विधानं करतो, पण आपला मेंदू कुठल्या प्रसंगात कसा वागतो, कसा वागेल हे स्वत:च्या मेंदूबद्दल तरी सांगता येतं का?

मेंदुसंशोधानातून मनोव्यापाराच्या जवळ जायचा प्रयत्न चालू आहे. मेंदूत खेळत असलेल्या रक्तप्रवाहावरून विचारप्रक्रिया आणि भावना यांचा शोध लावला तर ‘मी’ चा संपूर्ण शोध लागू शकेल. तोपर्यंत आपल्यालाच स्वत:चा शोध चालू ठेवावा लागेल.

या शोधातूनच जे प्रसंग आपल्या संदर्भात नेहमी घडतात, घडण्याची शक्यता असते, त्याला आपला मेंदू कसा प्रतिसाद देतो-देणार आहे, हे बऱ्यापैकी माहीत असतं. पण अनपेक्षित प्रसंगात आपला मेंदू कसा वागणार आहे याबाबत अनभिज्ञ असण्याची शक्यता बरीच असते. एखादी आपत्ती ओढवली आणि त्यात योग्य निर्णय घेऊन ती परिस्थिती अचूक हाताळली असंही होऊ  शकतं. तसंच एखाद्या प्रसंगात ‘मला असं करायचं नव्हतं, तरीही मी का केलं? हे माझ्या हातून झालंच कसं?’ असे टोकाचे प्रश्नही पडतात. या दोन्ही प्रसंगी कार्यरत असणारा, निर्णय घेणारा तो एकच मेंदू आहे, याची गंमत वाटते.

अनेकदा स्वत:चं मन कसोशीने जपणारी माणसं, दुसऱ्याचं मन मात्र नकळत किंवा अगदी कळतही दुखावतात. अशा प्रकारे वागल्याबद्दल पश्चात्ताप असेलच असं नाही. उलट यातून ‘विकृत आनंद’ मिळतो. कधी कधी आपण दुसऱ्याच्या चुकांवर छानसं पांघरूण घालण्यात यशस्वी होतो. पण स्वत:ला मात्र तशाच प्रकारच्या वागण्यासाठी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतो. स्वत:ची भरपूर निंदा करतो. अपराधी वाटून घेतो.

हे सर्व एकाच माणसाच्या मेंदूतले मनोव्यापार असू शकतात. माझा स्वभाव नक्की कसा, हा प्रश्न प्रत्येकाला केव्हा ना केव्हा तरी पडतोच. हे प्रश्न पडायला हवे. गोतावळ्यात राहून या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न चालू असतो. अर्थात हे काही फार जाणीवपूर्वक चालू असतं असं नाही. पण मनात-अंतर्मनात-सुप्तमनात कुठे तरी ‘मी’ ला शोधणं, ओळखणं,  हे असतंच. असायला हवं.

– डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com