डॉ. श्रुती पानसे  contact@shrutipanse.com

माणूस दु:खी असतो तो कशा कशामुळे? याची कारणं शोधून एक यादी करायला घेतली, तर केवढी मोठी यादी होईल! त्या यादीमध्ये अनेक प्रकार आणि उपप्रकार असतील.

‘सेंटर फॉर डिसीज् प्रिव्हेन्शन अ‍ॅण्ड कंट्रोल’ या अमेरिकेतल्या संस्थेमार्फत एक व्यापक सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात, ज्या व्यक्तींना वेगवेगळ्या आजारांमुळे कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या शारीरिक वेदना सहन कराव्या लागत होत्या, अशा व्यक्तींची सखोल माहिती घेण्यात आली.

विशिष्ट प्रकारच्या वेदना एखाद्या व्यक्तीला का सहन कराव्या लागतात, याचं कारण काही वेळेला पटकन समजत नाही. याचं मूळ त्या व्यक्तीच्या शरीरात होणाऱ्या बदलांमध्ये आहे, की चुकीच्या सवयींमध्ये आहे, की अयोग्य आहार, अयोग्य औषधं यांमध्ये आहे, की इतरत्र कुठं आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला गेला. त्या वेळी संशोधकांना आढळून आलं, की ज्या व्यक्तीला आयुष्यात खूप दु:ख सहन करावं लागतं, त्या व्यक्तीच्या मानसिकतेचा परिणाम तिच्या शरीरावर होत असतो. आयुर्वेदानंही हे सिद्ध करून दाखवलेलं आहे.

नक्की कोणत्या प्रकारच्या व्यक्तींना याचा जास्त त्रास होतो आहे, हे जेव्हा शोधून काढलं तेव्हा माणसांच्या वेदनांची मुळं केवळ शरीरात नाही, मनात नाहीत, तर समाजात असल्याचं आढळून आलं. तिथले सामाजिक प्रश्न वेगळे आहेत. परंतु अस्थिर समाज, माणसांचं हिंसायुक्त वर्तन, निम्न सामाजिक दर्जा, बेभरवशाचे आर्थिक स्रोत,  मानसिक-बौद्धिक ताणयुक्त कामं.. अशा ढासळलेल्या सामाजिक परिस्थितीमुळे मानसिक परिणाम व मानसिक परिणामांमुळे शरीरामध्ये वेदना निर्माण होतात, असा हा संबंध आहे हे लक्षात येतं.

माणसाला असलेल्या शारीरिक वेदनांचं मूळ शोधण्यासाठी समाजशास्त्र, मानसशास्त्र आणि मेंदूशास्त्र या सर्वाचा एकमेकांशी असलेला संबंध या संशोधनात शोधला गेला.

आर्थिक स्थिती आणि मानसिक स्थिती यांचा आरोग्याशी असलेला संबंध लक्षात येणं ही नव्यानं लक्षात आलेली गोष्ट नाही. परंतु या संस्थेच्या अभ्यासानुसार, माणसाच्या मेंदूवरदेखील याचा थेट परिणाम झालेला असतो. या परिणामामुळे शरीराच्या विविध भागांमध्ये प्रत्यक्ष वेदना दिसून येतात, हे तंत्रज्ञानामध्ये झालेल्या नवीन बदलांमुळे अधोरेखित झालं आहे.