18 November 2019

News Flash

मेंदूशी मैत्री : नियंत्रणाचं काम

लैंगिक कृती ही मानवी शरीराची गरज असली तरी त्या कायम चालू राहणं शरीरासाठी योग्य नसतं.

डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

मेंदू काही गोष्टींना प्रोत्साहित करतो. तर काही गोष्टींना नियंत्रित करतो. आपण नेहमी म्हणतो की मेंदूला चालना द्यायला हवी म्हणजे मेंदू तरतरीत राहील. चालना देणं हे महत्त्वाचं आहेच. पण त्याबरोबर मेंदूला शांत करणं आणि काही गोष्टी करण्यापासून चक्क रोखणं हे शरीर स्वास्थ्यासाठी अतिशय आवश्यक असतं. काही गोष्टी करण्यापासून रोखण्याची मेंदूमध्ये स्वतची क्षमता असते. उदाहरणार्थ, प्रत्येक माणसाला वेळच्या वेळेला भूक आणि तहान लागायला हवी हे खरं. पण त्याचबरोबर योग्य खाणं-पिणं झाल्यावर आता भूक-तहान शमली आहे हा संदेश जाणं ही अत्यंत आवश्यक असतं. हे काम हायपोथॅलॅमस या लहानशा अवयवाकडे असतं.

अनेकदा माणसांमध्ये विविध भावनांचे अतिरेक होत असतात. हर्षवायू होण्याइतका आनंदही चांगला नव्हे आणि दु:खात बुडून जाणं, अपमानाच्या, सूडाच्या धगीत जळून जाणं हे अजिबातच योग्य नाही. म्हणून कोणत्याही भावना प्रमाणात हव्यात. या भावनांना नियंत्रित करण्याचं कामदेखील हायपोथॅलॅमसकडे सोपवलेलं आहे.

लैंगिक कृती ही मानवी शरीराची गरज असली तरी त्या कायम चालू राहणं शरीरासाठी योग्य नसतं. या कृतींचं नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे. हे काम हायपोथॅलामस कडे सोपवलेलं आहे. या सर्वच जीवनावश्यक कृती असल्या तरीसुद्धा ‘कुठे थांबायचं’ हे कळलं पाहिजे, असे शब्द आपण बोलीभाषेत नेहमी वापरतो. ‘कुठं थांबायचं’ याच्या किल्ल्या हायपोथॅलॅमसकडे असतात.

थंड, उष्ण, अतिथंड, अतिउष्ण या वातावरणात शरीरात आपोआप काही बदल होतात. आपल्याला कधी घाम येतो तर कधी हुडहुडी भरते हे सर्व संदेश देण्याचं काम हायपोथॅलॅमस करत असतो.

काही प्रयोग असेही झालेले आहेत की हायपोथॅलॅमसला गुंगवून, फसवून बघितलं. एका प्रयोगामध्ये उंदराला समाधान वाटेल अशा एका कळीपाशी तो पुन्हा पुन्हा गेला. छान वाटतं म्हणून, त्याने ती कळ इतक्या वेळेला दाबली की शेवटी तो दमून अक्षरश: कोसळला. पण आता हे पुन्हा करायला नको हे त्याच्या लक्षात आलं नाही. कारण हायपोथॅलॅमसला फसवलं होतं. हा छोटासा अवयव म्हणूनच फार महत्त्वाचा आहे, तो आपल्याला थांबायची योग्य सूचना करतो.

 

First Published on June 20, 2019 4:47 am

Web Title: brain controls the functioning of the body
Just Now!
X