डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

मुलांनी त्यांचा अभ्यास त्यांनीच करावा असं आपल्याला अपेक्षित आहे – तेही इतरांच्या कमीत कमी मदतीशिवाय. मात्र त्यासाठी सध्याची ‘घोका-ओका’ पद्धत बदलायलाच लागेल.

मुलांना एकदा स्वयंअध्ययनाची तंत्रं शिकवली, की पुढचा अभ्यास मुलांनी त्यांचा त्यांनी करायला हवा. असे प्रयत्न शाळांमधून व्हायला हवेत. मात्र आपल्याकडं शिक्षककेंद्री दृष्टिकोनातून शिकवलं जातं. शिक्षकाला सोपी जाईल, अशी पद्धती वापरलेली असते. गेली अनेक वर्ष हीच पद्धत आपल्याकडं आणि जगभरात रूढ झालेली आहे. पाठय़पुस्तक घेऊन त्यातली माहिती सांगणं, माहितीवर आधारित तयार प्रश्नांची उत्तरं लिहायला देणं ही त्या मानानं सोपी पद्धत आहे.  नियमितपणे याच पद्धतीनं शिकवलं, तर शिक्षक त्यात कुशल होतात. मात्र जे शिक्षक पुस्तकापलीकडं जातात, मुलांना नवी माहिती देतात किंवा त्यांना माहिती शोधायला प्रवृत्त करतात असे शिक्षक मुलांच्या सर्वागीण वाढीसाठी अतिशय चांगले. जे स्वत: मनानं आणि मेंदूनं उत्साही असतील, तेच मुलांना विचारप्रवृत्त आणि कृतिप्रवृत्त बनवू शकतात.

‘विनोबाप्रणीत राष्ट्रीय शिक्षणाची नवी वाट’ या पुस्तकात ‘तु.तु.शि.’ या प्रकल्पाबद्दल सविस्तर लिहिलं आहे. याचा अर्थ आहे- ‘तुमचे तुम्हीच शिका’! यात असं म्हटलं आहे की, ‘विद्यार्थ्यांने जे शिकावे अशी अपेक्षा असते, त्या विषयाचे घटक व उपघटक पाडून त्या सर्वाचा असा क्रम रचायचा, की तो विषय शिकवण्यासाठी आवश्यक ते किमान पूर्वज्ञान व किमान पात्रता असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांला दुसऱ्या कोणाच्याही मदतीशिवाय रचलेला विषय समजेल आणि त्यातच गुंफलेल्या परीक्षांच्या साहाय्याने विद्यार्थी आपले मूल्यमापन स्वत:च करून त्यानुसार पुढे जाऊन स्वत:च्या वेगाने तो विषय शिकवू शकेल.’

स्वयंअध्ययन केल्यामुळे  मुलामुलींना स्वत:च्या वेगानुसार शिकता येईल.  मुलांना स्वयंमूल्यमापन करता येईल. मिळवलेलं ज्ञान वापरून पाहायच्या संधी सध्याच्या परीक्षा पद्धतीत मिळू शकत नाहीत. कारण परीक्षा शाळेच्या सोयीनुसार ठेवल्या जातात. त्यामुळे घोकंपट्टी वाढते. शिकणं- शिकवणं निर्जीव होतं. परीक्षा आणि निकाल याविषयी भीती निर्माण होते. स्वयंअध्ययनामुळे शिक्षकांच्या शिकवण्यातला एकसुरीपणा कमी होईल. त्यांनाही  शिकवण्यात आव्हान मिळेल!