डॉ. यश वेलणकर

माणसाच्या मनात विचार वेगवेगळ्या प्रकारे येतात. बरेचसे विचार शब्द किंवा भाषेच्या स्वरूपात येतात. लहानपणी मातृभाषेतील शब्दांच्या माध्यमातून मनात विचार येतात. नवीन भाषा शिकताना आपण मनात आलेल्या विचाराचे त्या भाषेत भाषांतर करतो आणि ते बोलतो किंवा लिहितो. पण त्या नवीन भाषेची सहजता वाढवायची असेल, तर त्याच भाषेत विचार करायला सुरुवात करणे आवश्यक असते. सरावाने ते जमू लागते. म्हणजेच मनात विचार एकापेक्षा अधिक भाषांमध्ये येऊ शकतात. या विचारांना ‘सेल्फ टॉक’ म्हटले जाते. कारण जसे आपण बोलतो तसेच ते बोलणे असते, फक्त ते मनातल्या मनात, स्वत:शीच असते. मात्र, विचार केवळ भाषेच्या रूपातच येत नाहीत. ते ध्वनी आणि चित्रे यांच्याही रूपात असतात. एखादे गाणे आपण सकाळीच ऐकले असेल तर त्याचे सूर मनात दिवसभर रुंजी घालतात. त्या गाण्याचे शब्द आठवतातच असे नाही, पण सूर आणि ताल आठवतो. म्हणजेच विचार ध्वनीच्या स्वरूपातही येतात. तसेच ते दृश्य- म्हणजे चित्रे आणि चलत्चित्रे यांच्या स्वरूपातदेखील असतात.

काही जणांना डोळे बंद केल्यानंतर काही प्रतिमा दिसतात, रंग दिसतात. मेंदुविज्ञानानुसार हेही विचारांचेच रूप आहे. काही माणसांना अशा प्रतिमा दिसतात आणि त्यांचीच त्यांना भीती वाटू लागते. विशेषत: एखादा आघात होऊन गेल्यानंतर ती दृश्ये स्मृतीत राहतात आणि पुन:पुन्हा दिसू लागतात. आघातोत्तर तणाव या आजाराचे हे एक लक्षण आहे. अशी दृश्ये दिसतात तेव्हा, ते भास आहेत याचे भान असेल तर मानसोपचार उपयोगी असतात. मात्र, हे भास नसून ‘कुणी तरी आहे तेथे’ असे खरेच वाटू लागते तेव्हा ते ‘स्किझोफ्रेनिया’ या आजाराचे लक्षण असू शकते. या आजाराची तीव्र अवस्था असते, त्या वेळी त्या रुग्णाला इनसाइट नसते- म्हणजे आपल्याला हा त्रास आहे याचे भान नसते. अशा वेळी त्याला मनोरोगतज्ज्ञांकडून औषधे देणे आवश्यक असते. ‘मी देवाशी बोलतो’ ही प्रार्थना; पण ‘माझ्याशी देव बोलतो’ असे वाटणे म्हणजे मानसिक आजार आहे, असे आधुनिक मानसोपचार विज्ञानाचे मत आहे. माझ्याशी देव किंवा मृतात्मा बोलतो, त्याचे शब्द मला ऐकू येतात, तो दिसतो हे सारे मनातील विचारच असतात. कारण आपले विचार ‘मल्टिमीडिया’ स्वरूपात असतात!

yashwel@gmail.com