‘भावना’ म्हणजे अखेर, ‘विविध रसायनं निर्माण होणं’. मात्र त्या रसायनांवरही काही प्रमाणात नियंत्रण आणता येतं. मानसिक आजारांमध्ये हे नियंत्रण राहत नाही, केवळ अशांसाठी औषधांचा पर्याय असतो. मात्र इतर सर्व माणसांनी ठरवलं तर भावनांवर नियंत्रण आणता येतं.

जत्रेतल्या मोठय़ा चक्रात बसण्याची आपल्याला हौस असते. एकदा त्यात बसलं की बाहेर काय चाललंय याच्यावर आपलं कसलंही नियंत्रण राहत नाही. एखाद्या क्षणी आपल्याला जरी त्या चक्रातून बाहेर पडायचं असलं तरी पडता येत नाही अशी स्थिती होते.  कोणत्याही भावनिक प्रसंगानंतर अशी अवस्था होत असेल तर याचा अर्थ आपल्यावर भावनांवर नियंत्रण ठेवता येत नाही, असा असू शकतो. ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ असं म्हणतात. या म्हणीतून आपल्या मनाची श्रेष्ठता अधोरेखित केली आहे.  त्यासाठी आपलं मन मजबूत हवं, तसंच शांतही हवं.  भीती वाटू शकते, पण लगेच त्यालाच नराश्य समजायचं नसतं. खूप संताप आला म्हणून काय दुसऱ्याचा अजिबात विचार न करता या भावना दुसऱ्यांच्या अंगावर फेकायच्या नसतात. अतीव दु:खाच्या प्रसंगी भावनेच्या भरात वाहून जाऊन स्वत:चं आणि इतरांचं नुकसान करायचं नसतं. आणीबाणीचा प्रसंग हाताळताना नेमकं काय घडतं, परिस्थिती हातातून निसटून जात असेल तर अशा वेळेला भावनांवर नियंत्रण आवश्यक असतं.   विचार न करता प्रतिक्रिया दिल्या जात असतील तर, आपल्या भावभावनांकडे जाणीवपूर्वक बघायला हवं.

आपण स्वत:ला नीट ओळखलं तर घडणाऱ्या प्रसंगावर आपल्याला नियंत्रण ठेवता येतं. सोप्या शब्दात सांगायचं तर मनाशी ठरवलं तर कोणत्याही भावनांच्या आहारी जाण्यापासून आपण स्वत:ला निश्चितपणे रोखू शकतो. स्वत:ला काही अंशी तरी ओळखलंय असं वाटलं तर आपण इतरांच्या भावना जाणून घेऊ शकतो. निदान तशी शक्यता तरी वाढते.

समोर घडणारा प्रसंग कोणताही असो, योग्य आणि संयमित प्रतिक्रिया देता यायला हव्यात. निष्कर्षांवर येण्याची घाई, आततायीपणा नक्की टाळू शकतो. स्वत:च्या भावभावनांवर नियंत्रण ठेवण्याची किल्ली फक्त आपल्याच हातात असते.

– डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com