सुनीत पोतनीस

बेंगळूरु येथील हायकोर्टाच्या प्रवेशद्वारापुढे असलेला पुतळा हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे म्हैसूर संस्थानचे माजी कमिशनर मार्क कब्बन यांचा आहे. म्हैसूरचे कमिशनर म्हणून सन १८३४ ते १८६० अशी कब्बन यांची झालेली कारकीर्द उल्लेखनीय आहे. कब्बन यांनी त्यांच्या कार्यकाळात म्हैसूरची ढासळत चाललेली आर्थिक परिस्थिती सुधारून ते एक संपन्न संस्थान बनवतानाच नागरी प्रशासकीय बदल केले. मार्क कब्बन एक कार्यक्षम प्रशासक म्हणून कंपनी सरकारात जसे आदरणीय होते तसेच एक प्रजाहितकारी प्रशासक म्हणून जनतेतही आदरणीय होते.

मार्क कब्बन यांचा जन्म १७७५ सालचा, ब्रिटिश वसाहत मान या बेटावर मॉघोल्ड कसब्यातला. वडील थॉमस कब्बन हे पॅरिशचे विकर म्हणजे गावच्या छोटय़ा चर्चमधील धर्मोपदेशक. मार्क हे त्यांच्या दहापैकी सातवे अपत्य. मार्कचे बालपण परिसरातल्या डोंगरदऱ्यांत गेले तर शिक्षण गावातल्या पॅरिश स्कूलमध्ये झाले. वडिलांची आर्थिक परिस्थिती जेमतेमच असल्याने जुजबी शिक्षण घेतल्यावर मार्कचे मावसे कर्नल मार्क विल्क्स, यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सन्यदलात कॅडेटच्या जागेसाठी त्याचे नाव नोंदवून, प्रशिक्षणासाठी तिथे भरती केले.

सनिकी प्रशिक्षण पूर्ण केल्यावर १८०१ साली कलकत्त्याला आलेल्या मार्कची नियुक्ती सेकंड मद्रास बटालियनमध्ये झाली. पुढे त्यांची नियुक्ती त्रावणकोरमधील पायदळात, मध्य प्रदेशातील पेंढाऱ्यांच्या बंडात, आंध्र प्रदेशातील कर्नूलमध्ये आणि लष्करातील असिस्टंट कॉमिसरी जनरल या पदांवर झाली. आपल्या कार्यक्षमतेच्या आणि मेहनतीच्या जोरावर मार्क कब्बन पुढे १८२३ साली मेजर, १८२६ साली लेफ्टनंट कर्नल आणि १८२७ मध्ये त्रावणकोरचे कॉमिसरी जनरल या उच्चपदावर पदोन्नत झाले. १७९९ साली टिपू सुलतानाच्या मृत्यूनंतर ब्रिटिशांनी म्हैसूर संस्थानचे मूळचे राजघराणे वोडियार यांचा तत्कालीन वारस कृष्णराजा वोडियार तृतीय (अल्पवयीन) याला गादीवर बसवले आणि राज्याचा कारभार त्यांच्या दिवाणाकडे सोपवला. परंतु राज्यातली डबघाईला आलेली आर्थिक परिस्थिती, लाचखोरी आणि अनागोंदी दिवाणाच्या नियंत्रणाखाली न आल्याने ब्रिटिश गव्हर्नर जनरलने मार्क कब्बन यांना म्हैसूरचे कमिशनर म्हणून १८३४ साली म्हैसुरात पाठवले.

sunitpotnis@rediffmail.com