News Flash

नवदेशांचा उदयास्त : भारतीय ‘गिरमिटियां’चे त्रिनिदाद

त्रिनिदाद बेट ब्रिटिश वसाहत बनले परंतु तेथील जनता मात्र फ्रेंच आणि आफ्रिकन वंशाची होती.

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात त्रिनिदादच्या स्पॅनिश वसाहतीतील लोकवस्तीपैकी आफ्रिकन गुलाम आणि मुक्त गुलाम यांची संख्या ८० टक्क्यांच्या जवळपास. बाकी वीस टक्क्यांत बहुतांश फ्रेंच लोक होते. त्रिनिदादमध्ये चाललेल्या सर्व घडामोडींवर ब्रिटिश लक्ष ठेवून होते. या बेटावर कब्जा करण्यासाठी ब्रिटिश आरमार १७९७ मध्ये पश्चिम त्रिनिदाद बेटावर धडकले. स्पॅनिश सरकारचे आरमार आणि लष्कर अगदीच तुटपुंजे असल्यामुळे हे बेट विशेष काही विरोध न होता, विनासायास ब्रिटिशांच्या हातात पडले. त्रिनिदाद बेट ब्रिटिश वसाहत बनले परंतु तेथील जनता मात्र फ्रेंच आणि आफ्रिकन वंशाची होती. त्रिनिदादमध्ये ब्रिटिश अंमल आल्यावर कॅरिबियन मधील इतर ब्रिटिश वसाहतींमधून इंग्लिश, आयरिश, इटालियन कुटुंबे त्रिनिदादमध्ये भराभर स्थलांतर करू लागली.

ब्रिटिश राजवटीने १८३४ मध्ये त्यांच्या वसाहतींमधून आणि साम्राज्यातून गुलामगिरी कायद्याने बंद केली. त्या वेळी मुक्त झालेल्या गुलामांपैकी बहुतेकजण, त्रिनिदादच्या ऊसमळ्यांवर मजुरी करायला नकार देऊन इतर व्यवसायांच्या मागे लागले. मजूर टंचाईवर तोडगा म्हणून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय, चिनी आणि थोडय़ा प्रमाणात पोर्तुगीज लोकांना विशिष्ट पद्धतीच्या करारावर आणून त्यांच्याकडून शेतमजुरीची कामे करून घेण्यास सरुवात केली. ‘इन्डेंचर’असे या कराराचे नाव. हिंदी भाषक मजूर या कराराला ‘गिरमिट’ म्हणत. इंग्रजांच्या ‘अ‍ॅग्रीमेंट’ या शब्दावरून हे ‘गिरमिट’ आले असे म्हणतात! या ‘गिरमिटिया’ मजुरांना बहुधा पाच वर्षांच्या कराराने ब्रिटिश गयाना, त्रिनिदाद इत्यादी ब्रिटिश वसाहतींत आणले जाई. त्यांना ठरावीक वेतन न देता त्यांच्या अन्न-वस्त्रसारख्या मूलभूत गरजा भागविल्या जात. गुलामी आणि गिरमिट यांत फरक केवळ इतकाच की, हे गिरमिट पाच वर्षांच्या करार समाप्तीनंतर हे काम बंद करून हवे तर मायदेशी परत जाऊ शकत. परंतु पाच वर्षे रोजची बारा बारा तास अतिकष्टाची कामे केलेल्या या कामगारांकडे मायदेशी परत जाण्यासाठी पैसेच नसत. पर्याय नाही म्हणून हे कामगार पुन्हा त्याच चक्रात अडकत असत. हलाखीच्या कष्टकरी जीवनामुळे शेकडो गिरमिटिया दरवर्षी अकाली मृत्युमुखी पडत.

सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 12:56 am

Web Title: british colony in trinidad independence in trinidad zws 70
Next Stories
1  कुतूहल :  ब्रह्मगुप्तांचा चौकोन
2 नवदेशांचा उदयास्त : ‘न्यू स्पेन’मधील त्रिनिदाद
3 कुतूहल – वैशिष्टय़पूर्ण हेरॉन त्रिकोण
Just Now!
X