17 February 2019

News Flash

जे आले ते रमले..: लँबटनचे कष्टसाध्य सर्वेक्षण (२)

विल्यमने या कामासाठी प्रथम इंग्लंडहून थिओडोलाइट हे अत्याधुनिक अर्धा टन वजनाचे यंत्र मागवले.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ब्रिटिश नोकरवर्गापैकी अनेकांनी त्यांना नेमून दिलेले काम केवळ त्यांच्या नोकरीचा भाग म्हणून न करता ते काम पुरे करण्याचा त्यांनी जसा ध्यास घेतला होता.  त्यापैकी एक विल्यम लँबटन. भारतीय प्रदेशाचे सर्वेक्षण करणारा पहिला सव्‍‌र्हेअर.

मागील लेखात नमूद केल्याप्रमाणे विल्यमच्या खगोलशास्त्र आणि त्रिकोणमितीच्या ज्ञानामुळे ब्रिटिशांना टिपू सुलतानावर विजय मिळवण्यात मदत झाली. या मोहिमेदरम्यान लँबटनने त्रिकोणमितीच्या सहाय्याने संपूर्ण भारतीय प्रदेशाचे सर्वेक्षण करण्याची आपली कल्पना ऑर्थर वेलस्लीला सांगितली. सर्वेक्षण करून भारताचा बिनचूक नकाशा बनविण्याशिवाय पृथ्वीचा वास्तविक आकार आणि तिच्या गोलाईचे माप यांची मोजणी करण्याचीही विल्यमकडे योजना होती.  ऑर्थर वेलस्लीने ही गोष्ट गव्हर्नर जनरल वेलस्लीला सांगितल्यावर त्याने विल्यमची भेट घेऊन संपूर्ण भारतीय प्रदेशाचे सर्वेक्षण आणि नकाशा रेखाटनाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली.

विल्यमने या कामासाठी प्रथम इंग्लंडहून थिओडोलाइट हे अत्याधुनिक अर्धा टन वजनाचे यंत्र मागवले. १८०२ मध्ये चेन्नईच्या मरीना बीचवर एक ध्वजस्तंभ उभारून एक मूळ रेषा निश्चित करून आपले सर्वेक्षणाचे काम सुरू केले. अत्यंत अवजड असा तो थिओडोलाइट ओढत जंगले, पर्वत, शेती पार करत, तंगडतोड करत सर्वेक्षणाचे काम करताना लुटारू टोळ्या, प्रतिकूल स्थानिक जनता यांना तोंड देत देत विल्यम आणि त्याचे सहकारी हे काम करीत राहिले. बऱ्याच वेळा टेकडय़ा वा उंचवटय़ावर थिओडोलाइट चढवून त्यांनी हे काम चालू ठेवले.  कंपनी सरकारने विल्यमला ‘ग्रेट ट्रिगनामेट्रिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’च्या अधीक्षकपदी नियुक्त केले. १८२३ मध्ये साधारणत निम्म्या भारतीय प्रदेशाचे सर्वेक्षण झालेले असताना नागपूरजवळ हिंगणघाट येथे क्षयरोगाची लागण होऊन विल्यमचा मृत्यू झाला. त्यांचे उरलेले कार्य त्यांचा सहकारी जॉर्ज एव्हरेस्ट याने पुढच्या आणखी वीस वर्षांत पुरे केले.

सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com

First Published on September 7, 2018 3:32 am

Web Title: british east india company william lambton article 2