सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com

समाजवादी विचारसरणीच्या, बंडखोर प्रवृत्तीच्या ब्रिटिश महिला अ‍ॅनी बेझंट १८९३ मध्ये भारतात आल्या. अखेपर्यंत भारतात राहून त्यांनी हिंदू, बौद्ध तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला. ब्रिटिश सत्तेला विरोध करून भारतामध्ये लोकशाही राज्य स्थापन व्हावे यासाठी झालेल्या आंदोलनाच्या त्या त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९३३ पर्यंत कृतिशील कार्यकर्त्यां राहिल्या. थिऑसॉफिकल सोसायटीच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी भारतात आलेल्या अ‍ॅनी बनारसमध्ये राहात. तेथे त्यांनी स्थापन केलेल्या सेंट्रल हिंदू स्कूलचे पुढे कॉलेज झाले आणि नंतर पंडित मदन मोहन मालवीय यांच्या प्रयत्नातून बनारस हिंदू विश्वविद्यालय या नावाने एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेत विकसित झाले. जे. कृष्णमूर्ती हे अ‍ॅनी बेझंट यांचे मानसपुत्र होते. अ‍ॅनी त्यांना बुद्धाचा अवतार मानत, परंतु कृष्णमूर्तीना ते अमान्य होते.

पुढे बेझंटबाई भारतीय स्वातंत्र्य चळवळीत कृतिशील झाल्या. लोकांमध्ये स्वातंत्र्याविषयी जागृती उत्पन्न करण्यासाठी त्यांनी ‘कॉमनव्हील’ आणि ‘न्यू इंडिया’ ही नियतकालिके सुरू करून आपल्या प्रखर व्याख्यानांनी ब्रिटिशांविरुद्ध वातावरण पेटवून दिले. १९१४ साली त्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या प्रतिनिधी बनल्या. बेझंटबाईंनी टिळकांच्या मदतीने होमरूल लीग स्थापन केली, हासुद्धा स्वातंत्र्य आंदोलनाचाच एक भाग होता. त्यांच्या ब्रिटिश सरकारच्या विरोधात चाललेल्या कृत्यांमुळे मद्रासच्या तत्कालीन गव्हर्नरने अ‍ॅनी यांना तात्काळ भारत सोडण्याचा आदेश दिला. परंतु या गोष्टीला नकार दिल्यावर अ‍ॅनी आणि त्यांच्या काँग्रेस सहकाऱ्यांना गव्हर्नरने मद्रासमध्ये नजरकैदेची शिक्षा दिली. परंतु याला देश-विदेशातून झालेल्या विरोधामुळे त्यांना मुक्त केले गेले. १९१७ साली कलकत्ता येथे झालेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात अ‍ॅनी बेझंट या राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्त झाल्या परंतु पुढे महात्मा गांधींकडे आंदोलनाची सूत्रे गेल्यावर अ‍ॅनी काँग्रेस आणि स्वातंत्र्य चळवळीतून बाहेर पडल्या. त्यांनी आपले उर्वरित जीवन मद्रासच्या अडियार या भागात थिऑसाफी आणि शिक्षण प्रसारात व्यतीत केले. वयाच्या ८५ व्या वर्षी मद्रास येथे (१९३३ साली) अ‍ॅनींचं निधन झालं. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये ‘इंडियन आयडिअल्स’, ‘इंडिया, ए नेशन’ ही पुस्तके आणि भगवद्गीतेचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध आहेत.