१७८२ साली अमेरिकन स्वातंत्र्य फौजांनी ब्रिटिशांच्या बहामा बेटावर हल्ला करून त्यावर कब्जा केला. पुढे वर्षभराने अमेरिकी स्वातंत्र्यवादी फौजा व ब्रिटिश राजवटीचे प्रतिनिधी यांच्यात पॅरिस येथे १७८३ मध्ये तह झाला. या तहान्वये ब्रिटिशांनी त्यांची फ्लोरिडाची पूर्वेकडची वसाहत अमेरिकेला (यूएसए) दिली आणि त्या बदल्यात अमेरिकेच्या ताब्यात असलेली बहामाज बेटे परत आपल्या अमलाखाली आणली. १७८४ साली पुन्हा एकदा बहामाज ही आपल्या साम्राज्याची वसाहत म्हणजे क्राऊन कॉलनी झाली असल्याचे जाहीर केले. अमेरिकेकडून बहामाज बेटांचा ताबा मिळवल्यावर अमेरिकेमधून लोकांनी या बेटांवर स्थलांतर करावे म्हणून ब्रिटिशांनी त्यांना उत्तेजन दिले आणि तिथली वस्ती भराभर वाढली. स्थलांतरे झाली ती प्रामुख्याने न्यूयार्क आणि फ्लोरिडामधून. यामध्ये ‘लॉयलिस्ट’ म्हणजे ब्रिटिशांशी निष्ठावंत असे ७५०० युरोपीय स्थलांतरित प्रथम आले. या लोकांसह त्यांचे २५०० आफ्रिकन गुलामही आले. त्याशिवाय हजाराहून अधिक इतर युरोपीय आणि आणखी २५०० मुक्त गुलामही बहामात स्थायिक झाले. निष्ठावंत युरोपीयांनी बहामात येऊन उसाची मोठी लागवड केली. त्यांनी बरोबर आणलेले आफ्रिकन गुलाम मळ्यांमध्ये कमी पडू लागल्यामुळे आणखी गुलाम आयात केले. पुढे या आफ्रिकन गुलामांची संख्या युरोपीय-अमेरिकी लोकांपेक्षा वाढली. काही निष्ठावंत मळेवाल्यांनी बहामाच्या अनेक बेटांवर उसाची लागवड केली. १८०७ साली ब्रिटिश  साम्राज्याने त्यांच्या सर्व वसाहतींमध्ये गुलामांच्या खरेदी-विक्रीला बंदी घातली. त्यानंतर विक्री झालेल्या गुलामांच्या जहाजांवर ब्रिटिश शाही नौदलाने छापे घालून, जहाजांतील गुलामांना मुक्त करून त्यांचे पुनर्वसन बहामा बेटांवर केले.

ब्रिटिश राजवटीने त्यांच्या वसाहतींत गुलामांची खरेदी-विक्री जरी बंद केली तरी गुलामगिरी बंद केली नव्हती. याचा अर्थ यापूर्वी गुलाम म्हणून ऊसमळ्यांवर काम करणारे गुलाम अजून गुलामगिरीत जखडलेलेच होते. १ ऑगस्ट १८३४ रोजी ब्रिटिश साम्राज्यात गुलामगिरी कायद्याने बंद करण्यात आली, अनेक गुलाम मुक्त करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील इतर अनेक वसाहतींप्रमाणे बहामातही राजकीय व सामाजिक जागृतीचे वारे वाहू लागले.

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com