05 December 2020

News Flash

जे आले ते रमले.. : अ‍ॅनी बेझंट यांचे कार्य (२)

१८८९ साली अ‍ॅनी या सोसायटीच्या सदस्य बनल्या. यापुढे अ‍ॅनी बेझंटच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली.

अ‍ॅनी बेझंट

सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

मूळच्या ब्रिटिश नागरिक असूनही अ‍ॅनी बेझंट त्यांचे भारतप्रेम, ब्रिटिश भारतीय सत्तेला आणि वसाहतवादाला विरोध आणि त्यांचे पुढे भारतात राहून स्वातंत्र्य चळवळींमध्ये सहभाग, भारतीय राजकारणातली महत्त्वाची भूमिका साकारणे यामुळे ओळखल्या जातात.

अ‍ॅनी या मूळच्या स्वतंत्र वृत्तीच्या. फ्रँक बेझंटशी त्यांचा विवाह, ही पुढे येऊ घातलेल्या वादळाची नांदी ठरली. फ्रँक हे टोरी पक्षाचे कार्यकत्रे आणि उमराव, मोठे जमीनदार यांच्या बाजूचे ख्रिश्चन कट्टरवादी; तर अ‍ॅनी या गरीब शेतमजुरांसाठी कार्य करणाऱ्या आणि ख्रिस्ती धर्मावर विशेष श्रद्धा नसलेल्या होत्या. विवाहबंधनातून मुक्त झाल्यावर काही दिवसांनी अ‍ॅनींची भेट नास्तिक विचारांचे चार्ल्स ब्रॅडलॉ यांच्याशी झाल्यावर प्रभावित होऊन अ‍ॅनी, ‘राष्ट्रीय असंप्रदायिक संस्थे’च्या सदस्य आणि ‘नॅशनल रिफॉर्मर’ या वर्तमानपत्राच्या संपादिका झाल्या. याच काळात ‘थिऑसॉफिकल सोसायटी’ या सर्व धर्माचे समर्थन करणाऱ्या समाजाची स्थापना झाली होती. १८८९ साली अ‍ॅनी या सोसायटीच्या सदस्य बनल्या. यापुढे अ‍ॅनी बेझंटच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली.

१८९३ साली अ‍ॅनी बेझंट शिकागो येथील सर्व धर्म परिषदेसाठी गेल्या होत्या. त्याच वर्षी भारतीय संस्कृतीची महती ऐकून त्या भारतात आल्या. त्यांनी प्रथम संस्कृत आणि हिंदी भाषा आत्मसात करून वेद, उपनिषदे, भगवद्गीता, महाभारत वगैरे हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास केला. जन्माने आपण ख्रिस्ती असलो तरी मनाने आणि संस्कारांनी आपण हिंदू झालो आहोत असा बदल अ‍ॅनींना जाणवू लागला. १८९८ मध्ये बनारस येथे ‘सेंट्रल हिंदु स्कूल’ची त्यांनी स्थापना केली आणि १९०७ मध्ये अ‍ॅनी बेझंट जागतिक थिऑसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा बनल्या. पुढे १९१६ साली अ‍ॅनींनी मद्रास येथे ऑल इंडिया होमरुल लीगची स्थापना केली. ब्रिटिश सरकारकडे स्वयंशासनाची मागणी करणाऱ्या होमरुल लीगच्या या कृतिशील कार्यकर्त्यां राहिल्या. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि अ‍ॅनी बेझंट यांनी या होमरुल आंदोलनाला चांगली गती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2018 1:12 am

Web Title: british social reformer annie besant
Next Stories
1 अ‍ॅनी बेझंट (१)
2 घिओर्सो आणि बारा मूलद्रव्ये
3 सीबोर्जिअम : हयात शास्त्रज्ञाचा सन्मान
Just Now!
X