बंदुकीच्या गोळीपासून संरक्षण होण्यासाठी वापरली जाणारी जाकिटे ही हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन अशा साध्यासुध्या मूलद्रव्यांच्या अणूंपासूनच बनलेली असतात. या हलक्या अणूंपासून बनल्यामुळे ही जाकिटे वजनालाही हलकी असतात. ही ज्या मजबूत बहुवारिकापासून बनली आहेत, त्या बहुवारिकाचे नाव आहे – पॉलिपॅराफेनिलिन टेरेफ्थॅलामाइड! त्याच्या निर्मितीचे श्रेय जाते ते डय़ु पॉण्ट या अमेरिकी कंपनीतील स्टेफनी क्वोलेक हिच्याकडे. स्टेफनी क्वोलेकने हे बहुवारिक १९६५ साली शोधले. या काळात पेट्रोलचा अपुरा पुरवठा होत होता. त्यामुळे तितक्याच पेट्रोलमध्ये अधिक अंतर कापण्याच्या दृष्टीने गाडय़ांचे वजन कमी करण्याचे प्रयत्न चालू होते. याचाच भाग म्हणून डय़ु पॉण्ट ही कंपनी गाडय़ांच्या टायरसाठी पोलादी तारांऐवजी कमी वजनाचे, परंतु अधिक मजबूत तंतू बनवण्याच्या प्रयत्नात होती. यासाठी पॉलिअमाइडपासून बनवलेल्या नायलॉनसारख्या इतर बहुवारिकांच्या निर्मितीवर संशोधन चालू होते. या प्रक्रियेत बहुवारिकांचे द्रावण छिद्रांतून पाठवून त्यांचे धागे बनवले जातात. (वस्त्रोद्योगात या क्रियेला ‘स्पिनिंग’ म्हटले जाते.)

क्वोलेक हिने स्पिनिंगसाठी द्रावण तयार करताना वेगळी प्रक्रिया वापरली. वरील बहुवारिकाच्या द्रावणात कॅल्शियमचा वापर करून तिने बहुवारिकांच्या रेणूंचे स्फटिकसदृश समूह निर्माण होऊ दिले. त्यानंतर हे द्रावण अगदी छोटी छिद्रे असणाऱ्या गाळणीतून जाऊ दिले. खाली गोळा झालेल्या द्रावणात या स्फटिकसदृश समूहांनी एकमेकांशी सरळ रेषांत जुळवून घेतले असल्याचे दिसून आले. स्पिनिंगसाठी पाठवण्याचे द्रावण हे साधारणपणे जाड आणि पारदर्शक असणे अपेक्षित असते. मात्र वरील बहुवारिकाचे द्रावण पातळ तर होतेच, परंतु त्याला पांढरा रंगही होता. साधारणपणे असे द्रावण स्पिनिंगला पाठवले जात नाही. स्पिनिंग करणारा कर्मचारीसुद्धा या द्रावणावर स्पिनिंग करण्यास तयार नव्हता. स्पिनिंगच्या यंत्रातील छिद्रे बुजली जाण्याचीही शक्यता त्याला वाटत होती. परंतु अखेर जेव्हा या द्रावणापासून स्पिनिंगद्वारे धागे तयार केले गेले, तेव्हा ते अत्यंत मजबूत स्वरूपाचे असल्याचे दिसून आले. त्यानंतर या प्रक्रियेला योग्य स्वरूप देण्यात काही काळ गेला. पोलादापेक्षाही पाचपट मजबूत असलेल्या धाग्यांच्या स्वरूपातील हे बहुवारिक अखेर १९७१ साली ‘केवलार’ या नावे बाजारात आणले गेले. आज या केवलारचा संरक्षक जाकिटापासून वाहन उद्योगापर्यंत असंख्य ठिकाणी उपयोग केला जात आहे.

– डॉ. राजीव चिटणीस

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org