इसवी सन १८४६! शास्त्रज्ञ कार्ल प्लॅटनर हे पोल्युसाइट या खनिजाचं विश्लेषण करत होते. अनेक प्रक्रिया केल्यावर त्यांना जे द्रावण मिळालं, त्यात ९३ टक्के इतक्या मोठय़ा प्रमाणात सिझिअम होतं. पण ते नवीन मूलद्रव्य असेल, याची कल्पना प्लॅटनरना आली नाही. त्यांना ते सोडिअम, पोटॅशिअम असावं, असं वाटलं. नंतर विश्लेषण करावयाची ती सामग्रीच संपली आणि प्लॅटनरना प्रयोग थांबवावा लागला.

जर्मनीच्या हायडल्बर्ग येथे सन १८६० मध्ये, गुस्ताव किर्शॉफ आणि रॉबर्ट बनसन हे डुर्खेममधील पाण्याची तपासणी करत होते. तेव्हा नुकताच वर्णपट विश्लेषण तंत्राचा (अ‍ॅमटॉमिक स्पेक्ट्रोमीटर) शोध लागला होता. किर्शॉफ आणि बनसन यांनी पाण्यातील लिथिअम, पोटॅशिअम, सोडिअम हे घटक वेगळे केले. नंतर स्पेक्ट्रोमीटरने पाण्याची तपासणी करताना त्यांना अनोळखी अशा चमकदार निळ्या रेषा दिसल्या. त्याचं त्यांनी नामकरण ‘सिझिअम’ म्हणजे आकाशी-निळा असं केलं. स्पेक्ट्रोमीटरने शोधलेलं सिझिअम हे पहिलं-वहिलं मूलद्रव्य.

अर्थात नंतर सिझिअम धातू शुद्ध रूपात मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. किर्शॉफ आणि बनसन यांनी जेमतेम ७ ग्रॅम सिझिअम क्लोराइड तयार केले. पण त्यासाठी त्यांना थोडेथोडके नव्हे तर ४४,००० लिटर पाण्यावर प्रक्रिया करायला लागली. तरीही शुद्ध धातू त्यांना मिळवता आला नाही. नंतर बॉन विद्यापीठातल्या कार्ल थिओडोर सेटरबर्ग यांनी सिझिअम क्लोराइडऐवजी सीझिअम सायनाइडचे विद्युत अपघटन करून हा धातू मिळवण्यात यश मिळवले.

सिझिअम पृथ्वीवर अगदी कमी प्रमाणात आहे. मुख्यत पोल्युसाइट (सिझिअम अ‍ॅल्युमिनिअम सिलिकेट) या खनिजापासून सिझिअम मिळवलं जातं. या खनिजात ६ ते ३४ टक्केपर्यंत सिझिअम ऑक्साइड (Cs2O) सापडतं. हे खनिज मॅनिटोबामधील बेíनक जलाशयात पुष्कळ प्रमाणात सापडतं. लेपिडोलाइट व कार्नालाइट या खनिजांमध्येही सिझिअम आढळतं.

सिझिअम धातू तसा हटके आहे. धातू म्हटलं की कठीणपणा आला; पण हा धातू असूनही सगळ्यात मऊ, म्हणजे त्याचा कठीणपणा फक्त ०.२ मोह इतकाच. त्याचा वितलनांकही फक्त २८.५ अंश सेल्सिअस (८३.३ अंश फॅरनहीट) इतका-  म्हणजे जवळपास कक्ष तापमानाइतकाच! त्यामुळं तापमान जरा वाढलं की त्याचा द्रव तयार होतो. धातूंमध्ये सिझिअमपेक्षा फक्त पाऱ्याचा वितलनांक कमी आहे. इतर अल्कली धातूंच्या तुलनेत सिझिअमच्या अणूचा आकार सर्वात मोठा आहे आणि घनताही सर्वात जास्त आहे; पण उत्कलनिबदू सर्वात कमी आहे.