सिझिअम धातू आवर्त सारणीतल्या पहिल्या गणातला. या गणातल्या मूलद्रव्यांना अल्कली धातू म्हणतात. अल्कली धातूंचा (लिथिअम, सोडिअम, पोटॅशिअम, रुबिडिअम, सिझिअम आणि फ्रांसीअम) नाही म्हटलं तरी दबदबा आहेच. त्यातही अणुआकार सर्वात मोठय़ा असलेल्या सिझिअमचा जास्तच! या गणातल्या धातूंच्या बाह्य़कक्षेत असलेला एकच इलेक्ट्रॉन या मूलद्रव्यांना जास्त क्रियाशील बनवतो.

सोनं, तांबं आणि सिझिअम सोडलं तर बहुतेक धातू हे राखाडी-पांढऱ्या रंगाचे चमकदार आहेत. सिझिअम धातूही चमकदार आहे; पण तो अतिक्रियाशील असल्याने ऑक्सिजनशी लगेच संयोग पावतो आणि त्यामुळे त्याचा मूळ सोन्यासारखा पिवळा रंग काळवंडल्यासारखा दिसतो.

कक्ष तापमानापेक्षा जरासाच जास्त वितलनांक असलेला हा धातू आपल्या हातात विरघळेल आणि पाऱ्याशी जसं आपण खेळतो तसं पिवळ्या सोनेरी सिझिअम द्रवाशी खेळू, असा विचारही करू नका, कारण हा धातू हातात घेतलात तर विस्तवाशी खेळण्यासारखं आहे! हा धातू हवेमध्ये पटकन पेट घेतो आणि लाल-जांभळ्या रंगाने जळू लागतो.

या गणातल्या धातूंचं पाण्याशी पक्कं वैर! पाणी आग विझवतं; पण हे धातू पाण्यात पडताच पेटून उठतात. सिझिअमचं तर जास्तच वैर! पाणी बर्फस्थितीत असेल, म्हणजे तापमान अगदी उणे ११६ अंश सेल्सिअस असलं; तरीही जणू कट्टर शत्रुत्व असल्याप्रमाणे पाण्याशी संपर्क होताच सिझिअमची आणि पाण्याची झटापट होते, स्फोट होतो. प्रचंड प्रमाणात उष्णता बाहेर पडते. या स्फोटक अभिक्रियेत हायड्रोजन वायू मुक्त होऊन सिझिअम हायड्रॉक्साइड हे तीव्र अल्कली तयार होतं.

सिझिअम धातू अत्यंत क्रियाशील असल्याने त्यास जास्त काळजीपूर्वक हाताळावं लागतं. साठवतानाही हवेशी आणि पाण्याशी संपर्क येऊ न देता, तो ठेवावा लागतो. सिझिअमला अरगॉनसारख्या निष्क्रिय वायूमध्ये सीलबंद-बोरोसिल काचेच्या कुपीत ठेवतात. सुमारे १०० ग्रॅमपेक्षा अधिक प्रमाणात सिझिअम असेल तर ते हवाबंद, स्टेनलेस स्टील कंटेनरमध्ये ठेवलं जातं. अर्थात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सिझिअम पाठवायचं असेल तर या ‘भडकू’साठी विशेष तनात ठेवावी लागते.

इतर मूलद्रव्यांशीही सिझिअम सहज संयोग पावतं आणि त्याची संयुगं तयार होतात. सिझिअमचे बहुतेक क्षार रंगहीन आहेत आणि ते आद्र्रताशोषकही असतात.

चारुशीला जुईकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org