सिझिअमचा वापर १९२०पर्यंत फारसं कोणी करत नव्हतं. १९२० नंतर रेडिओ निर्वात नलिकांत कॅथोडवर सिझिअमचं लेपण देऊन अतिरिक्त ऑक्सिजन काढून टाकण्यासाठी कारखान्यांत वापर होऊ  लागला. १९५०नंतर प्रकाशविद्युत घट, इलेक्ट्रॉन नलिका यांच्या निर्मितीमध्ये सिझिअमचा उपयोग करू लागले. पण त्याचं महत्त्व अधोरेखित झालं ते १९६७मध्ये.

आतापर्यंत ‘बी’ ग्रेड चित्रपटात काम करणारा हिरो एका चित्रपटानंतर अचानक ‘सुपरस्टार’ व्हावा, तसं काहीसं घडलं. १९६७ मध्ये सिझिअमला मोठी प्रसिद्धी मिळाली ती आंतरराष्ट्रीय मापन संस्थेने (कइढट) एका सेकंदाची व्याख्या केली तेव्हा!

एसआय प्रणालीत सेकंदाचं मूल्य ठरवताना गतिशून्य अवस्थेत असलेल्या सिझिअमच्या १३३ वस्तुमानांक असणाऱ्या अणूचा विचार केला गेला. या अणुकेंद्रात घडणाऱ्या एका विशिष्ट क्रियेत (हायपरफाईन ट्रान्झिशन) निर्माण होणाऱ्या प्रकाशलहरींची वारंवारता अतिशय स्थिर असते. ‘सिझिअम-१३३’ अणूतून उत्सर्जित होणाऱ्या प्रकाशलहरींच्या ९,१९,२६,३१,७७० आंदोलनांना लागणारा, पृथ्वीवरील समुद्रसपाटीवरचा कालावधी, अशी एका सेकंदाची व्याख्या केली आहे. सिझिअम असलेल्या आण्विक घडय़ाळांमध्ये १००० वर्षांनी जेमतेम एका सेकंदाचा फरक पडेल; इतकी त्याची अचूकता आहे. आताही आपले मोबाइल, इंटरनेट यांची वेळ सिझिअम घडय़ाळ्यांद्वारेच मोजली जाते. काही दिवसांतच सिझिअम आण्विक घडय़ाळं आपल्या हातावर दिसू लागतील.

सिझिअमचे ११२ ते १५१ अणूवस्तुमान असलेले एकूण ३९ समस्थानिकं  आपल्याला माहीत आहेत. त्यापैकी फक्त सिझिअम-१३३ स्थिर आहे. सिझिअम-१३७ या समस्थानिकाचा उपयोग क्ष-किरण चित्रणासाठी आणि क्षयरोगावरील संशोधन-उपचारांसाठी केला जातो.

ऑप्टिकल काच बनवताना, काही कार्बनी संयुगांचं हायड्रोजनीकरण करण्यासाठी उत्प्रेरक म्हणून सिझिअम वापरतात. चुंबकीय क्षेत्रमापकांमध्ये सिझिअम बाष्प वापरलं जातं. सिझिअममध्ये इतर अल्कली धातू, सोने, पारा अशा धातूंना मिसळून त्याची संमिश्रं केली जातात. ४१% सिझिअम, ४७% पोटॅशिअम आणि १२% सोडिअम असलेल्या संमिश्राचा वितलनांक (उणे ७८ अंश सेल्सिअस) हा इतर कोणत्याही संमिश्राच्या वितलनांकापेक्षा कमी आहे.

अजून एका उपयोगामुळे सिझिअमचं महत्त्व वाढलं. जमिनीतून तेल काढण्याच्या कामी ड्रिलिंग द्रवपदार्थ म्हणून त्याचं संयुग सिझिअम फोरमेट उपयोगास येतं. जमिनीत ड्रिलिंग करताना बिट (भोक पाडण्यासाठी जमिनीत घुसवण्यात येणारा कठीण भाग) घुसवताना सिझिअम फोरमेट त्यास लावलं जातं. ते वंगणासारखं काम करतंच शिवाय आत फोडलेले दगड वर आणण्याचं आणि त्याचवेळी दाब कायम राखण्याचंही काम सिझिअम फोरमेट करतं.

 चारुशीला जुईकर मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org