26 October 2020

News Flash

कुतूहल – कार्बन मोनॉक्साईड (CO)

वातावरणातील कार्बन डायॉक्साईड (CO2)चा दबदबा वाढल्यामुळे की काय, आपण त्याच्या धाकटय़ा भावंडाकडे म्हणजे कार्बन मोनॉक्साईड (CO)कडे कानाडोळा केलेला आढळतो. पण हा एक अल्प प्रमाणात वावरणारा

| June 19, 2014 12:29 pm

वातावरणातील कार्बन डायॉक्साईड (CO2)चा दबदबा वाढल्यामुळे की काय, आपण त्याच्या धाकटय़ा भावंडाकडे म्हणजे कार्बन मोनॉक्साईड (CO)कडे कानाडोळा केलेला आढळतो. पण हा एक अल्प प्रमाणात वावरणारा घातक वायू आहे.
एका गॅरेजमधल्या मेकॅनिकला एकदा दुपारची वामकुक्षी घ्यायची होती म्हणून गिऱ्हाईकाच्या गाडीतील वातानुकूलित यंत्रणा सुरू करून आरामात आत पहुडला. त्याला मस्त झोप लागली खरी, पण त्याच्या गाडीतल्या आतल्या वातावरणात जमा झालेला कार्बन-मोनॉक्साईड वायू वातानुकूलित यंत्रणेच्या हवेत फिरत राहिला. तो त्या मेकॅनिकच्या शरीरात गेला. तो बिचारा मेकॅनिक झोपेतून उठलाच नाही. आपल्या बेडरूममध्ये वातानुकूलित यंत्रणा (ए.सी.) सुरू असेल तर मेणबत्ती मुळीच लावू नये. मेणबत्ती अर्धवट जळत असताना आजूबाजूला कार्बन मोनॉक्साईड उत्सर्जति होतो.
कार्बन मोनॉक्साईड जेव्हा फुप्फुसात घुसतो तेव्हा तो रक्तातील हिमोग्लोबिनशी संयोग पावतो. त्यामुळे शरीरभर एरवी ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या हिमोग्लोबिनसोबत हा घातक वायू शरीरपेशीत पोहोचतो. शरीरपेशी ऑक्सिजनला वंचित होतात व माणसाला ‘हायपोक्सिया’ ही व्याधी जडते.
शरीरात कार्बन मोनोक्साईड असेल तर डोकेदुखी, मळमळ, थकवा ही फ्ल्यू तापासारखी लक्षणे आढळतात. जसे त्याचे प्रमाण वाढत जाते तसतशी मन:स्थितीचा गोंधळ, अशक्तपणा, चक्कर येणे, सुस्ती येणे ही लक्षणे उठून दिसतात. मेंदूला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा झाला नाही म्हणजे माणूस बेशुद्ध पडतो, मेंदूला इजा होते, माणूस कोमात जातो आणि मृत्युमुखी पडतो. हा वायू सतत शरीरात गेला तर काही मिनिटांतच हे सारे घडते आणि आपण बळी जाऊ शकतो. हळूहळू आणि कमी प्रमाणात हा वायू शरीरात जातो तेव्हा इंद्रियांना इजा होते, विविध व्याधी माणसाचा जीव घेतात. मुले आणि पाळीव प्राण्यांना विशेषकरून या वायूची त्वरित बाधा होते.
हा वायू वाहतूक करणाऱ्या गाडय़ांतून बाहेर पडणारा धूर, आग, धूम्रपान, खराब धुरांडी, लाकडाचे जळण, नादुरुस्त गॅसवर चालणारी उपकरणे यांद्वारे आपल्या नाकातून शरीरात घुसतो. या वायूचा आजूबाजूच्या परिसरातील थांगपत्ता लागावा म्हणून ‘इलेक्ट्रॉनिक अलार्म’ उपलब्ध असतात. हे तपासक आपणास त्यासंबंधी सावध करतात.  
जोसेफ तुस्कानो (वसई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – माझी गुईयाँ
माझी आणि गुईयाँची भेट झाली ‘झनक झनक पायल बाजे’मधल्या
लता : नैनमे नैन नाही मिलाओ
देखत सूरत आवत लाज, सैंया
हेमंतकुमार : प्यारसे प्यार आके सजाओ
मधुर मिलन गावत आज गुईयाँ..
या गाण्याच्या धृवपदात, पुढे हेमंतदा ‘गुईयाँ’ अशी हाक त्यांच्या नशिल्या आवाजात पुन:पुन्हा देतात. तेव्हा गुईयाँ या शब्दाला अडखळलो नव्हतो. सुरुवातीला सैंया आणि गुईयाँ यांची नादमधुर यमकात्मक रचना असावी, असंही वाटलं असावं.
मग अधूनमधून एखाद्या सुगमशास्त्रीय ठुमरी, दादरा आणि होरीमधल्या गाण्यात गुईयाँ भेटत राहिली. तरीही आणखी एक शब्द या पलीकडे फार लक्ष गेलं नाही. अचानक बेगम अख्तर यांच्या ‘ऐ मोहाब्बत तेरे अंजामपे रोना आया’मध्ये गुईयाँ समोर आली.
कभी तकदीर का मातम, कभी गुईयोंका गिला,
मंझिले इष्कमें हर मकामपे रोना आया.
यातल्या मकाम आणि गुईयाँ शब्दांऐवजी अन्य शब्द वापरलेले आहेत. पण बेगम अख्तीर यांच्या गायकीत गुईयाँ हाच लब्ज आहे.
इथे मात्र ‘गुईयाँ’ मनाला भिडली, कारण नायिकेच्या विरहात तिला साथ करणाऱ्या सख्या तिला हैराण करताहेत असा एकूण सूर आहे आणि ‘गुईयाँ’बद्दल कुतूहल वाटलं.
गुईयाँ म्हणजे मैत्रीण, सवंगडी, खेळातली साथीदार. नायिकेबरोबर ती वावरते. तिच्या मनातला दर्द समजून त्यावर दोस्तीची फुंकर घालते.
ही गुईयाँ मग अधिक अर्थपूर्ण वाटली. कधी नायिका आपल्या बेवफा सनम केलेल्या जख्मबद्दल कळवळून सांगते, ‘नाही गं सहन होत, हे प्रेम आणि त्यातलं विव्हळणं.’
गुईयाँ आणि नायिका या दोघींचा संवाद होतोय आणि आपण या जिवलग मैत्रिणींची गुफ्तगू ऐकतोय असं वाटलं. म्हणजे आपण श्रोते त्या गाण्याचा लुत्फ उठवतोय पण नायिकेला मात्र तिच्या हृदयाला छेडणाऱ्या कळा फक्त सखीला सांगाव्याशा वाटतात.
नायक नायिकांच्या मधुर मीलनाला अशा गुईयाँची साथ हवीच असते. अनेकदा ही सखीच आपल्या मैत्रिणीचा ‘संदेसवा’ सनमपर्यंत पोहोचवतात.
आपण ऐकणाऱ्याला ही त्या तारुण्यसुलभ हुरहुर आणि प्रणयमग्नतेच्या धुंदीच्या क्षणांची आठवण करून देतात. असं ही वाटतं की गुईयाँ खरीखुरी मैत्रीण असते की? नायिकेनं स्वत:शी साधलेला संवाद असतो? काही का असेना, गुईयाँशी केलेल्या हितगूज आणि कुजबुज यांमधून ‘इष्का’ची नशा चढत जाते.
गंमत म्हणजे नायिकेच्या मैत्रिणी ही काही हिन्दी-उर्दू काव्याची मिरासदारी नाही. ‘शाकुंतल’मध्येही ‘प्रियंवदा’ आणि ‘अनसूया’ या शकुंतलेच्या आश्रमसख्या आहेत. त्यांच्याकडेच शकुंतला आपलं मन मोकळं करते. प्रत्यक्ष आयुष्यात ‘प्रेम पडणं’ ही गोष्ट कोणाला तरी हळूच सांगितल्याशिवाय पूर्ण होत नाही.
गुईयाँच्या या गमती मनाला खूप भावल्या. खरं सांगू, माझी गुईयाँ म्हणजे मनमोराचा पिसारा इतकंच! होय की नाही?
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – ये रे माझ्या मागल्या आणि ताककण्या चांगल्या
‘‘गळ्यातील तुळशीच्या माळा तुम्हांस मारवाडय़ाच्या कैचीतून मुक्त करण्यास उपयोगी पडत नाहीत. तुम्ही रामनामाचा जप करता म्हणून घरवाला भाडय़ाची सूट देत नाही, अगर वाणी आपले पैसे कमी करीत नाही. तुम्ही पंढरीचे वारकरी आहात म्हणून तुमचा मालक तुम्हांस पगारात वाढ देत नाही. समाजाचा अत्यंत मोठा भाग ह्य़ा गूढ कल्पनांत गढून गेल्यामुळे काही आपमतलबी माणसांचा कावा साधतो. व ते नाडून आपला डाव साधतात. ये रे माझ्या मागल्या आणि ताककण्या चांगल्या ह्य़ाप्रमाणे जर तुम्ही वागाल तर तुम्हाला कधीच ऊर्जितावस्था येणार नाही. मला मोठी शंका येत ती हीच की आज आपल्यात जागृती होत आहे ती क्षणिक ठरेल काय? ज्या गुलामगिरीस नेस्तनाबूत करण्यास आज आपण सज्ज झालो आहो, तिचा पगडा तर तुमच्यावर पुन्हा बसणार नाही ना?’’
१९३२ साली मुंबईत झालेल्या जाहीर सभांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित वर्गास उपदेश करताना म्हणतात – ‘‘अस्पृश्यतानिवारणाच्या चळवळीत उदासीनता पसरली आहे. सहभोजनाच्या आणि मंदिरप्रवेशाच्या कार्यी आपली शक्ती खर्च न करिता अस्पृश्यता विध्वंसक मंडळाने आपली शक्ती पूर्णत: अस्पृश्यांच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीकडे लावावी.. संसारामध्ये मनुष्याला जी सुखदु:खे भोगावी लागतात, ती ईश्वरी इच्छेनेच येतात. दारिद्रय हे आपणासाठीच आहे असे लोक मानतात. आपणास असे नीच मानण्याची ही वृत्ती सोडा. सहभोजन व मंदिरप्रवेश ह्य़ांना माझा विरोध नाही, पण ह्य़ा प्रकाराने आपणास राजकीय हक्क मिळणार नाहीत. ह्य़ापुढे जे कायदे व्हायचे ते अस्पृश्य वर्गाच्या संमतीनेच होतील. ही एक समाजक्रांती आहे. आपणाला संसार चालविण्याची आवश्यकता आहे. भाकर, अंगावर कपडा, राहावयास चांगली जागा आपणास मिळाली पाहिजे. अस्पृश्य वर्गातील जातिभेद नष्ट करा.. मंदिरप्रवेशाची चळवळ अळवावरच्या पाण्यासारखी आहे. ते केव्हाच ओसरून जाईल. आपणाला सामाजिक दर्जा समानतेच्या पायावर मिळवावयाचा आहे. आपली आर्थिक गुलामगिरी नाहीशी केली पाहिजे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2014 12:29 pm

Web Title: carbon monoxide co
टॅग Navneet
Next Stories
1 कुतूहल – हायड्रोजन वायू (H2)
2 कुतूहल – नायट्रोजन वायू (N2)
3 कुतूहल – ऑक्सिजन वायू (O2)
Just Now!
X