अटलांटिक महासागराच्या पश्चिम—मध्य भागाला जोडून पश्चिमेला मेक्सिकोपर्यंत पसरलेल्या उपसागराला कॅरिबियन समुद्र म्हणतात. या समुद्राच्या दक्षिणेस कोलंबिया, व्हेनेझुएला हे दक्षिण अमेरिकी देश आहेत; तर उत्तरेला क्युबा, हैती ही बेटे आणि पूर्वेस वेस्ट इंडियन बेटे अशा कॅरिबियन समुद्राच्या सीमा आहेत. कॅरिबियन समुद्रात लहान-मोठी बेटे एकूण सात हजार आहेत, त्यापैकी २६ द्वीपराष्ट्रे आहेत आणि बाकीची अत्यंत लहान बेटे आहेत. प्राचीन काळात या बेटांवर राहणाऱ्या मूळच्या अमेरिकन आदिवासींच्या जमातीचे नाव कॅरीब होते. या जमातीवरून समुद्राचे नावही कॅरिबियन झाले. १४९२ साली युरोपातून भारतात जाण्याचा सागरी मार्ग शोधणारा कोलंबस भरकटत पोहोचला तो या कॅरिबियन समुद्रातल्या बेटावर! त्यानंतर पुढच्या काळात या प्रदेशात पोर्तुगाल, स्पेन, ब्रिटन, फ्रान्स आणि नेदरलँड सारख्या युरोपीय सत्तांनी आपापल्या वसाहती वसविल्या. या वसाहतींमुळे सागरी व्यापार जसा वाढला त्याच बरोबर समुद्री लुटालूट म्हणजे चाचेगिरीलाही उधाण आले. समुद्रातली मालाने लादलेली जहाजे लुटून हे लुटारू कॅरिबियन समुद्रातील असंख्य लहान बेटांवर लपून बसत. ही लहान निर्जन बेटे, या चाचांचे मोठे अड्डे झाले होते. कॅरिबियन समुद्रातील पूर्व आणि उत्तर भागात ३२०० कि.मी. लांबीत पसरलेल्या अनेक लहान मोठय़ा बेटांचा समूह आहे. या द्वीप समूहाला वेस्ट इंडीज बेटे म्हणतात. यापैकी बहुतेक बेटांवर युरोपीय साम्राज्यांच्या वसाहती होत्या, त्यातील बहुतेकांनी गेल्या शतकात स्वातंत्र्य मिळवून स्वयंशासन स्थापले आहे. या वेस्ट इंडिज बेटांपैकी कॅरिबियन समुद्राच्या आग्नेय भागात असलेले बार्बाडोस हे एक छोटे द्वीपराष्ट्र! साधारणत: त्रिकोणाकृती असलेल्या या बेटाची लांबी ३२ कि.मी. तर रुंदी २५ कि.मी. आहे. ब्रिजटाऊन हे बार्बाडोसच्या राजधानीचे शहर आणि येथील प्रमुख बंदर आहे. इतर वेस्ट इंडियन बेटांपैकी सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनाडिन ही बेटे बार्बाडोसच्या पश्चिमेस १६० कि.मी.वर आहेत. बार्बाडोसची खरी ओळख तिथले सुंदर समुद्रकिनारे आणि तेथील लोकांचे क्रिकेट वेड हीच आहे. क्रिकेट हा तिथला राष्ट्रीय खेळ आणि तिथल्या नामवंत क्रिकेट खेळाडूंनी त्यांच्या देशाचे नाव क्रिकेटच्या विश्वात नेहमीच प्रकाशात ठेवले आहे.

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com