संशोधन करण्याबरोबरच त्याचा वापर औद्योगिकीकरणासाठी करणारे शास्त्रज्ञ म्हणजे कार्ल वेल्सबॅक. प्रेसोडायमिअम आणि निओडायमिअम मूलद्रव्यांच्या या संशोधकाचा जन्म १ सप्टेंबर १८५८ रोजी व्हिएन्ना येथे झाला. ‘जास्त प्रकाश’ हे या ऑस्ट्रियन रसायनशास्त्रज्ञाचे ब्रीदवाक्य! व्हिएन्ना येथे प्रोफेसर रॉबर्ट बनसेन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रसायनशास्त्रातील संशोधनाला सुरुवात केली. रेअर अथ्र्स (दुर्मीळ मृदा) या मूलद्रव्यांवर संशोधन तर त्यांनी केलेच; पण त्यांचा औद्योगिक वापरही केला.

थोडासा हिरवट पांढरा प्रकाश देणारा ‘अ‍ॅक्टिनोफोर’ या कंदिलाचा त्यांनी कारखाना सुरू केला होता. कंदिलाच्या जाळ्यांमध्ये सुधारणा करून १८९० मध्ये त्यांनी ९९ टक्के थोरिअम ऑक्साइड आणि एक टक्का सिरिअम ऑक्साइड या मिश्रणाच्या जाळ्या बनविल्या. या जाळ्या वापरून बनविलेल्या  कंदिलातून जास्त प्रखर आणि पांढरा प्रकाश मिळत असे. ४ नोव्हेंबर १८९१ ला व्हिएन्ना शहरात  लोकांसमोर या कंदिलाचे प्रात्यक्षिक झाले आणि जणू रेअर अर्थसच्या औद्योगिक उपयोगांना सुरुवात झाली.

अशा दिव्यांचा उपयोग करणारे मुंबई हे पहिले शहर! या दिव्यात सुधारणांच्या दरम्यान कार्ल वेल्सबॅक यांनी प्लॅटिनम आणि ऑस्मिअमचा वापर केला. हे करत असता ठिसूळ धातूंपासून तारा बनविण्याची पद्धत शोधली. याच सुमारास कार्बन आर्कच्या दिव्यांचा शोध लागला होता. कार्ल वेल्सबॅक यांनी आपले धातूचे तंतू (फिलॅमेंट) त्या दिव्यांत वापरले. हे दिवे कार्बन आर्कच्या दिव्यांपेक्षा जास्त दिवस चालायचे आणि तुलनेत वीजही निम्मीच लागायची.

मिशमेटल आणि पायरोफोरिक संमिश्रांच्या शोधाचे श्रेयही वेल्सबॅक यांच्याकडेच जाते. १९०३ साली त्यांनी चकमकीचे (लायटरचे) पेटंट घेतले. हे संमिश्र वापरून त्यांनी न गंजणारे लायटर बनविले. आजही लायटर्समध्ये याचा उपयोग होतो.

आपल्या कारखान्यात वेल्सबॅक यांनी रेडिअम क्लोराइडही बनविले. आपल्या संशोधनातून त्यांनी रेडिओकेमिस्ट्री आणि आण्विक भौतिकीतील अनेक महत्त्वाच्या शोधांचा पाया घातला.

वेल्सबॅक यांना अनेक बहुमान मिळाले. १९०१मध्ये ऑस्ट्रियन राजाने जहागिरी देऊन त्यांना गौरविले, १९२०मध्ये ‘सीमेन्स रिंग’ हा तंत्रज्ञानाचा सर्वोच्च बहुमान त्यांना मिळाला. त्यांचा फोटो असलेला स्टॅम्प टपाल खात्याने काढला आणि ऑस्ट्रियन सरकारने त्यांचे छायाचित्र नोटेवर छापले.

– डॉ. सुभगा कार्लेकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org