कार्ल विल्यम शील हे अठराव्या शतकातील आघाडीचे रसायन शास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म ९ डिसेंबर १७४२ रोजी जर्मनीतील स्ट्रालसंड येथे झाला. त्यांना औषधशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांत माध्यमिक विद्यालयापासून रुची होती. पदवीधर झाल्यावर त्यांनी १७५७ ते १७६५ या काळात स्वीडनमधील गोटेबर्ग येथे फार्मासिस्ट म्हणून काम केले. त्यानंतर स्वीडनमधील माल्मो, उप्पसाला व स्टॉकहोम येथे व १७७५ पासून कोपिंग येथील वास्तव्यात त्यांनी रसायनशास्त्रातील अनेक शोधांची नोंद केली. त्यापैकी महत्त्वाचा म्हणजे फॉस्फरसचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन करण्याचा.

कार्ल शील यांच्या सर्वात प्रसिद्ध शोधांपकी एक म्हणजे त्यांनी लावलेला ऑक्सिजनचा शोध. शील यांनी हवेचा अभ्यास केला, त्यातून त्यांनी असा निष्कर्ष काढला की हवा हे दोन वेगवेगळ्या घटकांनी बनलेले मिश्रण आहे. एका घटकाचे नामकरण त्यांनी अग्नितत्त्व (ऑक्सिजन) असे केले तर दुसऱ्या घटकाला त्यानी दूषित (फाऊल) असे संबोधले. त्यातील अग्नितत्त्व असलेली हवा श्वास घेण्यासाठी आवश्यक आहे आणि दूषित हवा त्यासाठी उपयुक्त नाही असे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोटॅशियम नायट्रेट, मँगॅनीज डायऑक्साइड,  सिल्व्हर काबरेनेट आणि पारद ऑक्साइड या पदार्थाच्या ज्वलनाचा अभ्यास केला. या सर्व अभ्यासातून आणि प्रयोगातून त्यांनी ऑक्सिजनचा शोध लावला होता. त्यांचे हे निष्कर्ष १७७७ मध्ये ‘हवा आणि अग्नितत्त्व यांवरील रासायनिक प्रबंध’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध  झाले. परंतु जोसेफ प्रिस्टले आणि अँटोनी लॅव्होझिए यांनी ऑक्सिजनवरच्या प्रयोगांचे निष्कर्ष त्यापूर्वीच जाहीर केले होते त्यामुळे या शोधाचे श्रेय त्यांच्याकडे गेले.

anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Peter Higgs predicted the existence of a new particle
‘गॉड पार्टिकल’चा शोध लावणारे नोबेल विजेते शास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचं निधन, वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ravi shastri
संवादातील स्पष्टता महत्त्वाची- शास्त्री

कार्ल शील यांनी १७७४ मध्ये क्लोरिन या मूलद्रव्याचा शोध लावला. त्यांनी शोधलेल्या मूलद्रव्यांमध्ये बेरियम, मँगेनीज, मॉलिब्डेनम व टंगस्टन यांचाही समावेश आहे. याशिवाय सायट्रिक आम्ल, ग्लिसरॉल, हायड्रोजन सायनाइड, हायड्रोजन फ्लोराइड आणि हायड्रोजन सल्फाइड यांसह अनेक रासायनिक संयुगांचीही ओळख त्यांनी पटविली. १७८० मध्ये त्यांनी दुधात जो आंबटपणा निर्माण होतो त्यासाठी जबाबदार असलेले संयुग हे लॅक्टिक आम्ल असते हे सिद्ध केले.

आगकाडय़ांच्या निर्मितीमध्ये वापरण्यात येणाऱ्या फॉस्फरस या मूलद्रव्याचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन करण्याची पद्धत त्यांनी शोधून काढली. त्यामुळे स्वीडन हा देश आगपेटय़ांचे उत्पादन करणारा जगातील आघाडीचा देश बनला. अशा या अत्यंत थोर शास्त्रज्ञाचे वयाच्या अवघ्या ४४व्या वर्षी अकाली निधन झाले.

– प्रकाश मोडक, मुंबई</strong>

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org