देशात १९६०-७० या दोन दशकांत मोठय़ा प्रमाणावर जंगलांचा ऱ्हास झाला. हिमालयातील तराई भाग भूस्खलन व नद्यांना मोठे पूर अशा नसíगक आपत्तींनी त्रस्त झाला. वृक्षतोडीमुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता वेगाने वाहून जाऊ लागले. डोंगराळ असल्याकारणाने येथील जमिनीची धूप झाली. शेतीयोग्य जमिनी नापीक झाल्या. पात्रे गाळाने भरल्यामुळे नद्या उथळ झाल्या.
या सगळ्याची जाणीव निसर्गप्रेमी असलेल्या चंडिप्रसाद भट्ट यांना झाली. उत्तरखंडमधील जोशिमठ, फाटा, रेणा, चामोली, नीतीघाट, गोपेश्वर अशा अनेक ठिकाणी पायी फिरून त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जनजागृती केली. अशातच २० जुल १९७३ रोजी एका दिवसात २० इंच पावसाची नोंद झाली. अलकनंदा नदीला महापूर आला. या महापुरामुळे हाहाकार उडाला. ३०० किमी खाली दूर असलेल्या अप्पर गंगा धरणात सात किमी वाळू व गाळ जमा झाला. हा गाळ काढण्यासाठी तेव्हा एक कोटी रुपये खर्ची पडले.
या विनाशाची कारणमीमांसा व त्यावरील उपाययोजना याबाबतचा एक अहवाल चंडिप्रसाद भट्ट यांनी शासनाला सादर केला. शासनाने त्या अहवालाकडे दुर्लक्ष केले. उलट अलाहाबाद येथील लाकडी खेळणी तयार करणाऱ्या कारखान्याला वृक्षतोडीचा परवाना दिला. या परवान्याच्या आधारे रेणी येथील जंगलात ठेकेदाराचे मजूर पोहोचले. ही बातमी गावात ताबडतोब पसरली. गावात कोणी पुरुष नव्हता, म्हणून गावातल्या गौरादेवी या वृद्ध महिलेने आपल्या नेतृत्वाखाली २१ इतर महिलांना सोबत घेऊन जंगल गाठले. त्यांनी तिथे जाऊन झाडांना कवटाळले (िहदीत चिपको). ‘प्रथम आम्हाला कापा, मग झाडे कापा’ असा पवित्रा घेतला. इथेच ‘चिपको आंदोलना’चा जन्म झाला. पाहता पाहता ही वार्ता इतरही राज्यांमध्ये पोहोचली. चिपको आंदोलनाने व्यापक रूप घेतले. सुंदरलाल बहुगुणांनी यासाठी खूप मेहनत घेतली. वेगवेगळ्या माध्यमांचा त्यांनी वापर केला. फ्रान्स, जर्मनी आदी देशांत दौरे करून वृक्षसंवर्धनाचे महत्त्व जगाला पटवून दिले. १९८२ साली चिपको आंदोलनाची दखल फिलिपाइन्स सरकारने घेतली. सामाजिक कार्यात प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’  देऊन त्यांनी चंडिप्रसाद भट्ट यांना गौरविले.
कालिदास देशमुख (बीड)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

आजचे महाराष्ट्रसारस्वत  : ५ मार्च
१८५६ > कवी, इतिहास संशोधक पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी यांचा जन्म. विल्सन कॉलेजात शिकून त्यांनी ‘मुंबई गॅझेटिअर’ साठी ब्रिटिशांना मदत केली, पण कवी म्हणून त्यांचा पिंड स्वराज्यवादी नवसुशिक्षिताचा होता. त्यांचे ७ काव्यसंग्रह निघाले होते.
१९१४ > ‘युरोपीय नीतिमीमांसेचा इतिहास’ त्यांनी विसाव्या शतकारंभीच मराठीत आणणारे अभ्यासू निबंधकार शांताराम अनंत देसाई यांचे निधन. ‘वैदिक तत्त्वमीमांसा (भाग १) या पुस्तकातून शंकराचार्य व रामानुजाचार्य यांच्या विचारांतील साम्य त्यांनी दाखवले, तर तुकाराम व आंग्लकवी ब्राउनिंग यांची तुलना ‘अभंगरत्नाचे घर’मधून केली. ‘विद्यार्थी’ हे त्रमासिकही त्यांनी चालविले.  
१९५४ > ‘मराठी नाटय़रचना: तंत्र आणि विकास’, ‘मराठी नाटय़कथा’ आदी पुस्तके लिहिणारे नाटय़वाङ्मयअभ्यासक-समीक्षक विष्णु दत्तात्रेय साठे यांचे निधन
१९६८ > लेखक आणि प्रवासवर्णनकार नारायण गोविंद चाफेकर यांचे निधन. नाना विषयांवरील भरपूर पुस्तके त्यांच्या नावावर असली, तरी ‘बदलापूर (आमचा गाव) हे १९३० च्या दशकातील बदलापूरचे दर्शन घडविणारे पुस्तक अधिक वाचनीय तसेच स्थानीय-सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
संजय वझरेकर

वॉर अँड पीस : ताप : भाग १
देह व मन दोन्हीचा संताप वाढविणारा ताप माणसाचा जन्मापासूनचा सोबती आहे. तापाला आयुर्वेदात औषध नाही, अशी सामान्य जनतेची चुकीची कल्पना आहे. आजपर्यंत शेकडो रुग्णांचा ताप  आयुर्वेदिय औषधांनीच आम्ही उतरवू शकलो आहोत.
मुदतीच्या तापाचा रुग्ण वैद्यांकडे कधी येतच नाही. दोन उदाहरणे वेगळ्या प्रकारची अभ्यासनीय आहेत. आमच्यावर नितांत प्रेम असणाऱ्या सप्रे कुटुंबीयांपैकी एका बाईंना मुदतीचा ताप आला. चौदा दिवस बाईंनी आमचे काढे घेतले. क्रमाक्रमाने ताप उतरला. चौदाव्या दिवशी ताप गेला. मात्र पंधराव्या दिवशी बाईचा धीर सुटून त्यांनी डॉक्टरांची औषधे सुरू केली. त्यामुळे त्या बाई ज्या अशक्त झाल्या त्या चार महिने घरातून बाहेर पडू शकत नव्हत्या.
दुसऱ्या घरी एका लहान मुलाला मुदतीचा ताप निश्चित झाला. रक्त तपासले. त्याच्या आईने आम्हाला उपचारांची संधी दिली. आठ लिटर पाणी उकळून, एक लिटर उरवून; त्या मुलाला दिवसभर थोडे-थोडे प्यावयास दिले. गुदमार्गे करंजेल तेलाची १५मिलिची पिचकारी  दिली. असे रोज केले. ८ दिवसात ताप उतरला.
एकदा एका बाईंना मुलांसकट प्रवासाला जावयाचे होते. आदल्या दिवशी मुलीला जोरदार ताप आला. ताप कफप्रधान दिसत होता. एका रात्रीत काही उतरेल असे वाटत नव्हते. बाईंचा आग्रह, आम्हाला प्रवासाला जायचे आहे. तुम्ही मुलीचा ताप उतरवाच. नाईलाजाने मी त्यांना नकार दिला. बाई डॉक्टरांकडे गेल्या. त्यांनी स्ट्राँग औषध दिले. ताप उतरला नाहीच पण कान मात्र फुटून वाहू लागला. नवीन दुखणे मुलीला त्रास देऊन गेले.याउलट एका बालकाला तीव्र तापाकरिता घरी जाऊन तपासले. सौम्य थोडेच औषध दिले. दोन तासाने पुन्हा घरी बघावयास गेलो तर मुलगा ताप उतरल्यामुळे मैदानावर खेळायला गेला होता. आयुर्वेदात तापावरची तत्काळ गुण देणारी औषधे आहेत हे पटवून देणाऱ्या लहान मुलाला, आईला धन्यवाद! आयुर्वेदावर, स्वत:वर व कॉमनसेन्सवर विश्वास ठेवून ताप हाताळावा. कोणालाच ताप होत नाही.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी.. : विज्ञान आणि व्यवहार
आपले शरीर साठ ते सत्तर टक्के पाणी असते. पाण्याचा निर्देश H2O  असा आहे. हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक प्रत्येक अणूमध्ये मूलकण असतात. उदा. हायड्रोजनमध्ये एक प्रोटॉन ( proton)  धनभार आणि एक इलेक्ट्रॉन (electron)  ऋणभार असतो. हा इलेक्ट्रॉन चंचल असतो यालाच x ray  मधून आपण मागच्या प्रकरणात बाणासारखा सोडला होता. प्रोटॉन भारदस्त असतो. जर शरीरात साठ सत्तर टक्के पाणी असेल तर मग H2O  मधल्या हायड्रोजनची आणि त्यातल्या प्रोटॉनची शरीरात जास्त हलचल असणे स्वाभाविक आहे.. प्रत्येक मूलकणाच्या भोवती विद्युत चुंबकीय क्षेत्र असते किंवा तयार होते. कारण हे मूलकण स्वत:भोवती भिरभिरत असतात. आता कल्पना करा, एका महामोठय़ा चुंबकात जर माणसाला ठेवला तर काय होईल ते. हे प्रोटोन बिथरतात कारण त्यांच्यातल्या चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होतो आणि ते दिशा बदलतात. या दिशाबदल झालेल्या प्रोटोन्सचे चित्र काढता येते. आणि हे चित्र बहुतांशी शरीरातल्या पाण्याचे असते. कारण शरीरात पाण्यामधले प्रोटोन्सच बहुसंख्य असतात. जर x ray मुख्यत: शरीरातल्या कडक गोष्टीचे चित्र दाखवत असेल तर MRI  (मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजिंग) द्रवाचा नकाशा चितारताना शरीरातल्या पाणीदार गोष्टींचे चित्र काढते.
असे तंत्रज्ञान शोधून काढायला अनेक वर्षे लागतात. आधी मूलभूत संशोधन असते. त्याला प्रयोगशाळा लागतात. त्यात काम करणाऱ्या माणसाचे पगार असतात. मग कल्पना जन्म घेते, मग त्याचा वापर कसा करता येईल याचे आराखडे तयार होतात. मग त्यात कोणीतरी पैसे गुंतवतात ते बँकेकडून कर्जाऊ असतात. मग एखादे औषध किंवा यंत्र बाहेर पडते ते खपवावे लागते, त्यासाठी जाहिराती असतात, त्याला माणसे लागतात, त्यांना पगार द्यावा लागतो. दहा वर्षे झालेला खर्च जर १००० रुपये असेल आणि अंताला एक यंत्र निघाले तर दहा वर्षांचे हजार आणि फायदा हजार असे म्हणून २०००० ला यंत्र विकता येते, पण एक लाख रुपयाला विकतात. कारण हे यंत्र थोडय़ाच काळात कालबाह्य होते आणि त्यापेक्षा सरस आणि कार्यक्षम यंत्र जन्माला येऊ घातलेले असते. त्यात गुंतवणूक करावी लागते. असला अवाढव्य खर्च करणे बहुतेक वेळा मोठय़ा उद्योगसमूहांना किंवा सरकारलाच शक्य असते. तुझे यंत्र मी घेतो, पण त्यात माझे किती असे प्रश्न मोक्याच्या जागेवरचे लोक विचारतात. देवाणघेवाण होते, त्यामुळे यंत्राची किंमत वाढते. आणि हे इथेच होते असे नाही, अमेरिकेत यासाठी हुशार माणसांचे कळप असतात. ते त्यांच्या लोकप्रतिनिधी सभेच्या भोवताली गराडा घालून असतात. हे जे सर्व होते तेही विज्ञानच असते, कारण ते मानवी प्रपंचात घडते आणि व्याख्येप्रमाणे प्रपंचाचे ज्ञान ते विज्ञान असते.
रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com