भोपाळच्या बेगम, नवाबाकडे केवळ एक बटलर म्हणून नोकरीस आलेला चार्ल्स अलगार्नान बॅडकॉक हा ब्रिटिश तरुण पुढे भोपाळमध्येच स्थायिक झाला. हरहुन्नरी बॅडकॉक पुढे भोपाळच्या बेगम व नवाबजाद्यांना कौटुंबिक समस्यांपासून गुंतागुंतीच्या राजकारणापर्यंत कसा मार्गदर्शक, सल्लागार झाला, फोटोग्राफी, स्वयंपाक वा शिकारीत कसा मदतगार झाला हे मनोवेधक आहे!

चार्ल्स बॅडकॉकचा जन्म पोर्टस्माऊथचा. वाडवडील सर्व, जहाजांवर नोकरी करणारे. चार्ल्स प्रथम पहिल्या महायुद्धकाळात ब्रिटिश नौदलात जहाजावरच्या भटारखान्याचा व्यवस्थापक म्हणून नोकरीस लागला. महायुद्ध समाप्तीनंतर, १९२५ साली भोपाळ संस्थानाची बेगम नवाब तिच्या गादीच्या वारसहक्काच्या कामासाठी लंडनला आली होती. ‘सरकार अम्मा’ म्हणजे बेगमच्या लंडनमध्ये राहण्याची व्यवस्था, इंग्रज राजशिष्टाचार शिकवणे, बडय़ा लोकांच्या अपॉइंटमेंट मिळविणे, प्रवासाची सोय वगरे सर्व जबाबदाऱ्या थॉमस कूक अ‍ॅण्ड कंपनीकडे होती. या कंपनीने बेगमच्या लंडनमधल्या मुक्कामात एक हरकाम्या म्हणून बॅडकॉकची नियुक्ती केली. थोडय़ाच दिवसात त्याचे बेगम, तिच्या नाती, मुलगा यांच्याशी इतके चांगले जमले की, बेगमचे लंडनमधले काम संपल्यावर ती भोपाळकडे परत जायला निघाली तेव्हा बॅडकॉकला मोठय़ा आकर्षक पगारावर भोपाळमध्ये आपल्याकडे नोकरीला येण्याचे आमिष दाखवले. बॅडकॉकने ते स्वीकारून त्यांच्याबरोबर भोपाळला प्रयाण केले.

बेगमने आपल्या महालाजवळच्या छोटय़ा बंगल्यात बॅडकॉकच्या निवासाची सोय केली. शाही स्वयंपाकगृहाच्या प्रमुखाचे काम करण्यापासून नातवंडांची देखभाल करणे, बडय़ा युरोपियन पाहुण्यांची बडदास्त ठेवणे, भोपाळच्या जंगलात वाघाची शिकार करायला इंग्रज अधिकारी येत त्यांची व्यवस्था करणे वगरे कामे बॅडकॉक करी. लवकरच तो त्याच्या स्वभावामुळे शाही कुटुंबाचा  सदस्यच झाला!

१९३० साली सरकारअम्मा म्हणजे भोपाळच्या बेगमेचा मृत्यू झाला. हमीदुल्लाखान नवाब पदावर आला. शाही कुटुंबाशी कितीही जवळचे संबंध आले तरी बॅडकॉकने आपली मर्यादा ओलांडली नाही. भोपाळमध्ये अनेक ब्रिटिश अधिकारी राहात, पण बॅडकॉक या भोपाळच्या इंग्लिश समाजात कधी विशेष मिसळत नसे.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com