News Flash

भूशास्त्रज्ञ चार्ल्स रिश्टर

चार्ल्स लहान असतानाच त्याचे आई-वडील एकमेकांपासून विभक्त झाले.

भूकंपाची तीव्रता ज्या रिश्टर मापनश्रेणीवर मोजली जाते ती मापनश्रेणी मांडणारे भौतिक आणि भूशास्त्रज्ञ चार्ल्स रिश्टर! त्यांचा जन्म अमेरिकेमध्ये हॅमिल्टनजवळ ओहियो प्रांतामध्ये २६ एप्रिल १९०० या दिवशी झाला. चार्ल्स रिश्टर हे वंशाने खरं म्हणजे जर्मन होते. त्यांचे आजोबा जर्मनीतल्या राजकीय अस्थर्यामुळे १८४८ साली अमेरिकेत स्थायिक झाले; त्यामुळे चार्ल्स रिश्टर हे अमेरिकन शास्त्रज्ञ म्हणूनच गणले जातात.

चार्ल्स लहान असतानाच त्याचे आई-वडील एकमेकांपासून विभक्त झाले. त्यामुळे चार्ल्सचं सगळं बालपण आपल्या आईच्या वडिलांकडे गेलं. चार्ल्सच्या आजोबांनी आपलं कुटुंब १९०९ साली लॉस एंजेलिस इथे हलवलं आणि तिथेच चार्ल्सचं शालेय शिक्षण झालं. लॉस एंजेलिस हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण करून चार्ल्सने पुढील शिक्षण स्टॅनफोर्ड विद्यापीठात घेतलं. त्यानंतर १९२७ साली पीएच. डी. घेण्यासाठी त्याने कॅलिफोíनया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये प्रवेश घेतला. पण दरम्यान सुप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ रॉबर्ट मिलिकन यांनी वॉिशग्टनच्या कॅन्रेगी इन्स्टिटय़ूटमध्ये संशोधन साहाय्यक म्हणून काम करण्यासाठी रिश्टर यांच्याकडे विचारणा केली. रिश्टर यांनी ही नोकरी स्वीकारली. इथेच त्यांना भूशास्त्राची आवड निर्माण झाली आणि त्यामुळे त्यांनी बेनो गुटेनबर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली भूशास्त्रावर संशोधनकार्याला सुरुवात केली. रिश्टर आणि गुटेनबर्ग यांचं संशोधन कार्य पॅसाडेना इथल्या भूशास्त्रीय प्रयोगशाळेतसुद्धा चालत असे.

१९३०च्या सुमारास दक्षिण कॅलिफोíनयात सातत्याने जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांवर शास्त्रीय अहवाल सादर करण्याची मागणी कॅलिफोíनया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजीकडून होऊ लागली. रिश्टर आणि गुटेनबर्ग यांनी त्यादृष्टीने काम करायला सुरुवात केली आणि १९३२ साली भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी मापनश्रेणी तयार केली. हीच ‘रिश्टर मापनश्रेणी’ होय.

१९३७ सालापर्यंत रिश्टर कॅन्रेगी इन्स्टिटय़ूटमध्ये कार्यरत होते. त्यानंतर मात्र शेवटपर्यंत म्हणजे १९५२ सालापर्यंत त्यांनी कॅलिफोíनया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये भूशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलं. दरम्यान १९४१ साली रिश्टर आणि गुटेनबर्ग यांनी ‘सिस्मिसिटी ऑफ दि अर्थ’ नावाचा ग्रंथ प्रसिद्ध केला. १९५८ साली ‘एलिमेंटरी सिस्मोलॉजी’ हा ग्रंथ रिश्टर यांनी लिहिला. भूशास्त्रामध्ये भरीव संशोधन कार्य करणाऱ्या या शास्त्रज्ञाचे ३० सप्टेंबर १९८५ रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी पॅसाडेना, कॅलिफोíनया इथे निधन झाले.

हेमंत लागवणकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org

 

 

गाजलेला काव्यसंग्रह- पल्लव

सुमित्रानंदन पंत यांचे संपूर्ण व्यक्तित्व गीतात्मक आहे. ते मूलत: गीतकारच आहेत. पण कवितेशिवाय त्यांनी इतरही साहित्यप्रकारात लेखन केलं आहे. ‘ज्योत्स्ना’ (१९३४)- हा गीतिनाटिका त्यांनी लिहिली आहे. ‘पाँच कहानियाँ’ हा त्यांचा कथासंग्रह असून, ‘गद्यपद्य’ हा समीक्षाग्रंथ आहे. १९६० मध्ये त्यांनी ‘साठ वर्षे एक रेखांकन’ हा आत्मचरित्रात्मक ग्रंथ लिहिला आहे. १९२८ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘पल्लव’ या छायावादी कवितांच्या संग्रहाचे अमाप कौतुक झाले. या छायावादी काव्यात त्यांच्या प्रतिभेचे सामथ्र्य जाणवते.

सौंदर्याचे वेड, स्त्रीकडे बघण्याची उदात्त दृष्टी, करुणा व अश्रू यांच्याकडे असलेली स्वाभाविक ओढ, सूक्ष्मतेचा हव्यास, नवी प्रतीके, प्रतिमा यांचा चपखल वापर इ. पाश्चात्त्य प्रभावातून, विशेषत: इंग्रजी काव्याच्या सखोल अध्ययनामुळे आलेले काव्यविशेष यात जाणवतात. तसंच स्वर, नाद आणि रंग यात तल्लीन होण्याची तरल संवेदनशीलता, निसर्गाची ओढ, आनंद, कुतूहल ही वैशिष्टय़ेही ‘पल्लव’मध्ये आढळतात. या काव्यसंग्रहाची प्रस्तावना, त्यातील आक्रमक विधानांमुळे फार गाजली होती. ब्रज भाषेविरुद्ध खडी बोलीचा पक्ष त्यांनी हिरिरीने मांडला व उज्ज्वल भविष्याची खात्री त्यांनी आपल्या काव्यलेखनाद्वारे पटवून दिली.

‘पल्लव’, ‘ज्योत्स्ना’, ‘गुंजन’ या काव्यसंग्रहातील कवितांचा रचनाकाळ हा त्यांच्या सौंदर्य तसेच कलाभावनेचा कालखंड समजला जातो. निसर्गसौंदर्य असलेल्या गावी जन्मल्यामुळे त्या काळातील कवितांमध्ये स्वभावत:च निसर्गप्रेम आणि सौंदर्यभावना यांना प्राधान्य मिळालेले आहे. १९३४-१९३५च्या दरम्यान हिंदी साहित्यावर मार्क्‍सवादाचा पगडा दिसू लागला होता. पण म. गांधीचे तत्त्वज्ञान पंतांच्या प्रकृतीशी जुळणारे होते. ‘पल्लव’मधील ‘परिवर्तन’ या दीर्घकवितेत वास्तवभिमुखता दिसूही लागली. परिवर्तनाची अपरिहार्यता त्यांना कळू लागली. आदर्शवाद गळून पडू लागला.१९३० ते ४० या काळात त्यांना कलाकांकर या गावी राहत असताना तेथील ग्रामीण जीवनाचा अनुभव घेता आला. या वातावरणाच्या प्रभावातून त्यांचे ‘युगवाणी’ (१९३८) व ‘ग्राम्या’ (१९४०) हे काव्यसंग्रह जन्माला आले. त्यामध्ये ग्रामीण जीवनाचे चित्रण रेखाटले आहे. ‘युगवाणी’ ही पण ग्रामगीताच आहे. त्यातून त्यांनी नवीन जीवनाच्या वास्तविक विकासाची दिशा दाखवून दिली आहे.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 2:47 am

Web Title: charles francis richter
Next Stories
1 भूकंपदर्शक यंत्र
2 नियतकालिकाचे दर्जामापन
3 प्राचीन काव्याचा प्रभाव
Just Now!
X