08 March 2021

News Flash

हिंदू धर्मग्रंथांचे अभ्यासक चार्ल्स विल्किन्स (२)

बंगाली लिपी आत्मसात करून मुद्रणासाठी तिचा टाइपही बनवला

चार्ल्स विल्किन्स हे ईस्ट इंडिया कंपनीचे कर्मचारी १७७० मध्ये कलकत्त्यात नोकरीत रुजू झाले ते एक मुद्रणतज्ज्ञ म्हणून. इथे येण्यापूर्वी ते पíशयन भाषेचे उत्तम जाणकार होतेच, पण कलकत्त्यात अल्पकाळातच त्यांनी बंगाली भाषा, बंगाली लिपी आत्मसात करून मुद्रणासाठी तिचा टाइपही बनवला आणि त्यावरून बंगाली भाषेत पुस्तकछपाई केली.

चार्ल्सना भारतातील विविध भाषा, विशेषत: संस्कृतबद्दल कुतूहल असल्याने पुढे ते बनारसला जाऊन काही वष्रे राहिले आणि कालिनाथ या संस्कृत पंडितांकडून त्यांनी धडे घेतले. त्यांनी संस्कृत भाषा आत्मसात केल्यावर हिंदू धर्मग्रंथ, पोथ्या, पुराणे यांचा सखोल अभ्यास केला आणि त्यांचा अनुवाद इंग्रजीमध्ये करून युरोपीय लोकांपर्यंत हिंदू तत्त्वज्ञान पोहोचवले. त्यांनी १७८५ साली भगवद्गीतेचा इंग्रजीमध्ये केलेला अनुवाद हा गीतेचा युरोपीय भाषेत झालेला पहिला अनुवाद होय. ‘भगवद्गीता, अ‍ॅज अ डायलॉग बिटविन कृष्णा अँड अर्जुना’ असे शीर्षक असलेल्या या ग्रंथात चार्ल्सनी भगवद्गीतेबद्दल त्यांची मतेही मांडली आहेत. बहुसंख्य हिंदूंमधील बहुईश्वरवादाकडून त्यांना एकेश्वरवादाकडे, अद्वैतवादाकडे वळवण्यासाठी भगवद्गीता सांगितली, लिहिली गेली, असे मत चार्ल्सनी त्यांच्या भगवद्गीतेच्या अनुवाद ग्रंथाच्या प्रस्तावनेत लिहिलंय.

हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास आणि अनुवाद करण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांनी चार्ल्सना दिलेले प्रोत्साहन आणि मदत महत्त्वाची ठरली. चार्ल्सच्या भगवद्गीतेचे पुढे फ्रेंच आणि जर्मन भाषेतले अनुवादही मोठय़ा संख्येने वाचले गेले. त्याचप्रमाणे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांपकी ‘ग्रामर ऑफ संस्कृत’, विष्णू शर्मा यांनी लिहिलेल्या ‘हितोपदेश’मधील नीतिबोध कथांचे अनुवाद वाचनीय आहेत. विल्यम जोन्सनी संग्रहित केलेल्या हस्तलिखितांचा संग्रहही त्यांनी प्रकाशित केला. चार्ल्स विल्किन्सनी भारतीय धर्मसंस्कृतीविषयीचा सखोल अभ्यास, संवर्धन या क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल राजे चवथे जॉर्जनी सत्कार करून त्यांना इंडिया हाऊस लायब्ररी म्हणजे सध्याच्या ब्रिटिश लायब्ररीचे संचालक पद दिले. वयाच्या ८७ व्या वर्षी १८३६ साली लंडनमध्ये चार्ल्स विल्किन्स यांचे निधन झाले.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 1:58 am

Web Title: charles wilkins 2
Next Stories
1 रेडॉन खरंच निष्क्रिय आहे का?
2 चार्ल्स विल्किन्स (१)
3 शेवटचं निष्क्रिय मूलद्रव्य
Just Now!
X