27 September 2020

News Flash

कुतूहल – पीक संरक्षण व रासायनिक औषधे

पिकांचे तण, किडी, रोगराईपासून संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारची रासायनिक औषधे शेतकरी वापरतात. त्यांचा मानवी शरीरावर विपरीत परिणाम होतो.

| November 23, 2013 12:01 pm

पिकांचे तण, किडी, रोगराईपासून संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारची रासायनिक औषधे शेतकरी वापरतात. त्यांचा मानवी शरीरावर विपरीत परिणाम होतो. असे काही घडल्यास, पीडित व्यक्तीला ताबडतोब जवळच्या दवाखान्यात नेऊन औषधोपचार सुरू करावा. तो बेशुद्धावस्थेत असेल तर त्याला स्वच्छ हवेच्या ठिकाणी हलवावे. त्याला श्वासोच्छ्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यास त्याच्या तोंडातील पदार्थ, कृत्रिम दातांची कवळी आदी बाहेर काढावेत. रुग्णाचे डोके खालच्या बाजूला व जीभ थोडी बाहेर काढावी, जेणे करून ओकारीची दरुगधी बाहेर जाणार नाही. जवळपास एक दिवस सतत पाहणी करून रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा होत आहे किंवा नाही याकडे लक्ष पुरवावे.
कीडनाशकाचा वास नाकातोंडात गेल्यास व्यक्तीला स्वच्छ मोकळ्या हवेत न्यावे. त्याचे कपडे सल करावेत. पायातील जोडे काढून ठेवावेत. त्याच्या अंगाभोवती ब्लँकेट गुंडाळावे. श्वास बंद पडल्यास किंवा अनियमित असल्यास कृत्रिम पद्धतीने श्वासोच्छ्वास द्यावा.
कीडनाशक कातडीवर पडल्यास, विषबाधा झाली तो भाग प्रथम साबणाचे पाणी आणि नंतर गरम पाणी टाकून स्वच्छ धुवावा. कीडनाशक कपडय़ावर पडले असेल तर कपडे काढून धुण्यासाठी ठेवावेत.
कीडनाशक पोटात गेल्यास मीठ टाकलेले कोमट पाणी रुग्णाला पाजावे. वाटलेली मोहरी आणि पाणी यांचे मिश्रण दिल्यास किंवा तोंडात स्वच्छ चमचा किंवा बोट घातल्यास ओकारी येते. ओकारी सुरू झाल्यावर गरम पाणी पाजावे. पारायुक्त विष पोटात गेल्यास अंडय़ाचा पांढरा भाग दुधातून किंवा गरम पाण्यातून रुग्णास पाजावा. नंतर मिठाचे पाणी पाजावे. त्यामुळे ओकारी येते. अगदी स्वच्छ पाणी पोटातून बाहेर येईपर्यंत हा उपचार चालू ठेवावा. िझक फॉस्फाइडसारख्या रसायनासाठी ओकारी झाल्यावर एका पेल्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यात पाच ग्रॅम पोटॅशियम परमँगनेट मिसळून पिण्यास द्यावे.
डोळ्यांना कीडनाशकाचा संसर्ग झाल्यास पापण्या उघडय़ा ठेवून स्वच्छ पाण्याची बारीक धार करून डोळे हळुवारपणे धुवावेत. धुण्याची क्रिया पाच-दहा मिनिटे न थांबता चालू ठेवावी.
– डॉ. रूपराव गहूकर (नागपूर), मराठी विज्ञान परिषद,  वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..  – लग्न आणि आई आणि कुटुंब
एखाद्या स्त्रीने लग्नानंतरच आई व्हावयास हवे हा रिवाज काही लाख वर्षे अमलात नव्हता आणि त्यानंतर याचा अंमल काही हजार वर्षेच चालू आहे हे आधी लक्षात घ्यायला हवे. हा अंमल आणखी शंभर वर्षे टिकेल की नाही. याबद्दल शंका आहे. कुटुंब हा शब्द संस्कृतातून आलेला नाही हा अ२३१ अ२्रंल्ल किंवा एतद्देशीय आहे असा एक कयास आहे.
पुरुषप्रधान कुटुंबपद्धती नवीन आहे. त्या आधी आई आणि तिचे मूल हेच कुटुंब होते. पुरुष परका, उपरा, तात्पुरता होता आणि संगोपन ही क्रिया पहिल्यांदा स्वत:च्या दुधाने आणि नंतर निसर्गातल्या अन्नावर स्त्रीने स्वत:च सांभाळली. माता या शब्दातला मा चे मूळ रूप वाटणे, वेचणे, मोजणे, मोजून बाजूला करणे, आत येणे, जागा नक्की करणे, समेट सलोखा करणे अशा अनेक अर्थाचे आहे. पारंपरिक बायको, माता जेव्हा शिधा आणते, भरते, काढते, शिजवते आणि पद्धतशीरपणे कुटुंबाला वाढते ते सारे आणि तिचे माजघर आणि स्वयंपाकघर यातील वास्तव्य हे त्या ‘मा’ अक्षराचे आजचे प्रातिनिधिक स्वरूप असले तरी या साऱ्या गोष्टीत पुरुषाचा झालेला प्रवेश संचार अधिकार आणि सत्ता ही गोष्ट त्यामानाने नवीन आहे. ती कृत्रिम आहे आणि सत्तेशी संबंधित आहे ती सत्ता आर्थिक आहे. परंतु हे सगळे नैसर्गिक नाही आणि निसर्ग शेवटी जिंकतोच म्हणूनच हल्लीची स्त्री-पुरुष व्यवस्था आता डळमळीत होऊ लागली आहे.
मातामधली मा समेट आणि सलोखा या अर्थाला जागत नवीन व्यवस्थेत दडपशाही करेल असे दिसत नाही, परंतु आपली स्वायत्तता परत मिळवण्याच्या मार्गावर आहे आणि गंमत म्हणजे ही स्वायत्तता त्यांना मिळावी यासाठी पुरुषांनीच प्रयत्न केले. पुरुष सुधारणा करतात, परंतु स्वत: सुधारत नाहीत हे बायकांना पक्के ठाऊक असते.
हल्लीच लोकसत्तात आलेल्या एका लेखात पांडवांमध्ये मातृसत्ताक आणि कौरवांमध्ये पितृसत्ताक कुटुंब पद्धती होती असे एक खळबळजनक विधान होते. नवरा आंधळा म्हणून डोळ्याला पट्टी बांधणारी गांधारी एकीकडे आणि नवरा शापग्रस्त म्हणून नियोगाने देवादिकांकडून अपत्यप्राप्ती करून घेणारी कुंती अगदीच निराळी. जेव्हा आणखी एक अपत्य आण असे पांडू म्हणतो तेव्हा गरजेपेक्षा जास्त अपत्ये हे पापासमान आहे असे तिने म्हटल्याचा दाखला महादेवशास्त्री जोशींच्या संस्कृतिकोशात सापडतो.
द्रौपदीला पाच नवरे आहेत, पण तिची प्रतिमा स्वैरिणीची दाखवलेली नाही. स्वत:च्या अपत्यांच्या हत्येने ती विव्हल होते. त्याची वर्णनही हृदयद्रावक आहेत. ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेल्या स्त्रियांबद्दल सोमवारी-
रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस – हृद्रोग, निद्रानाश: डबल धमाका
आपल्या घरात कोणालाही हृदयासंबंधी त्रास सुरू झाला की सगळ्यांनाच धास्ती पडते. ‘यांना केव्हा बरे वाटणार!’ अशी शंका संबंधित नातेवाईक करतात. रुग्ण चिंतेत असतोच, त्याचीही झोप उडालेली असते. त्याच्या हृद्रोगामुळे इतरांचीही झोप उडणे हे योग्य नव्हे. हार्ट अ‍ॅटॅकचा पहिला फटका जेव्हा रुग्णाला बसतो तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर आपल्या ओळखीतल्या, आसपासच्या हृदयग्रस्त पेशंटचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. त्यातल्या काहींना हार्ट अ‍ॅटॅकनंतर अर्धागवाताचा झटका आलेला असतो; काहींना कंपवात सुरू झालेला असतो; काही घाबरट मंडळी स्क्रिझोफेनियासारख्या विकाराने ग्रस्त होतात. हार्ट अ‍ॅटॅकच्या पहिल्या फटक्यात मेंदूचे हृदयावरच्या नियंत्रणावर, कामात उणीव झालेली असते. त्यामुळे घबराट सुरू होते. साहजिकच त्या दिवसापासून झोपेवर परिणाम होतो.ज्या व्यक्तीला रात्रौ पुरेशी व शांत झोप मिळते, तो दुसऱ्या दिवशी उल्हसित मनाने उत्तम काम करू शकतो.
हृद्रोगी माणसाला काही काळ घरी सक्तीची विश्रांती घ्यावयाचा आग्रह; तज्ज्ञ डॉक्टर व घरातील प्रेमळ मंडळी करत असतात. ‘एम्टी माईंड, डेव्हिल्स वर्कशॉप’ म्हणजे रिकामटेकडे मन सैरावैरा, नको ते विचार करत असते. परिणाम, झोप उडते. ब्रह्मदेवाने सर्वच प्राणीमात्रांना पुरेशा झोपेची देणगी दिलेली आहे. गरीब-श्रीमंत, कामकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, शेतकरी, हातावर पोट असणारा किंवा प्रचंड श्रीमंत, भांडवलदार या सगळ्यांनाच पुरेशी झोप व त्यामुळे मेंदू व हृदयाला विश्रांती आवश्यक असते. हृद्रोगी व्यक्ती कृश असेल तर हृदयाच्या अन्य औषधांबरोबर त्याने जेवणानंतर आस्कंद चूर्ण व जटामांसी, ब्राह्मी, सुवर्णमाक्षिकयुक्त निद्राकरवटी झोपेपूर्वी घ्यावी. स्थूल, खूप मोठे पोट असणाऱ्या रुग्णांनी सायंकाळी लवकर व कमी जेऊन आम्लपित्तवटी, पिप्पलादिकाढा व गरज पडली तर गंधर्वहरितकी चूर्ण घ्यावे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत    – २३ नोव्हेंबर१८७२>
नाटककार, वृत्तपत्रकार, राजकीय विचारवंत कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म. ‘राष्ट्रीय महोत्सवाची आवश्यकता’ हा त्यांचा केसरीतील अग्रलेख गाजला. कालांतराने स्वत:चे ‘नवाकाळ’ हे वृत्तपत्र सुरू. तथापि, महाराष्ट्राला ते परिचित आहेत नाटककार म्हणून. सवाई माधवराव यांचा मृत्यू,  कीचकवध, भाऊबंदकी, संगीत मानापमान, संगीत स्वयंवर, सत्त्वपरीक्षा’ ही त्यांची गाजलेली नाटके.
१९८३>  शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षणविषयक ग्रंथाचे  लेखक गणेश विनायक अकोलकर यांचे निधन. माध्यमिक शिक्षण, शैक्षणिक तत्त्वज्ञानाची रूपरेषा, शैक्षणिक समाजशास्त्राची रूपरेषा हे त्यांचे शिक्षणशास्त्राचे सैद्धांतिक स्वरूप स्पष्ट करणारे ग्रंथ, तसेच माध्यमिक शिक्षणाची पुनर्घटना, शैक्षणिक मूलतत्त्वे, शैक्षणिक मनोविज्ञान, व्यक्तिमत्त्व विकास या ग्रंथासह लोकशाही व शिक्षण आणि शिक्षणाची आधुनिक तत्त्वज्ञाने हे अनुवादित ग्रंथही त्यांच्या नावावर आहेत.
२०००>  चित्रकार, कलासमीक्षक आणि या विषयावरील एक सिद्धहस्त लेखक बाबुराव सडवेलकर यांचे निधन. ‘वर्तमान चित्रसूत्र’ आणि ‘महाराष्ट्रातील कलावंत’ हे त्यांचे लेखसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.
– संजय वझरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2013 12:01 pm

Web Title: chemical drugs and crop protection
टॅग Navneet,Navnit
Next Stories
1 कुतूहल – दुसऱ्या हरितक्रांतीची गरज
2 कुतूहल- जैविक कीडनियंत्रण
3 कुतूहल – पीक संरक्षणाचे उपाय
Just Now!
X