कितीही शिस्तबद्ध नियमानुसार काम झालं, तरी काही उणिवा राहतात. आपल्या देशाचा अभिमान शास्त्रज्ञांना असतो आणि काही वेळा तो प्रकटही होतो. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि रशियामध्ये वाद निर्माण झाला. १०४, १०५, १०६ या अनुक्रमांकाची मूलद्रव्ये प्रथम कोणी शोधली या विषयावर हा वाद होता. रसायनशास्त्राच्या विश्वात  अत्यंत सुस्पष्ट, एकसमान आणि सुसंगत नामकरण, चिन्ह आणि परिभाषा निर्माण करण्यासाठी शिफारशी करणे, हे परमकर्तव्य असलेल्या आयुपॅकने यासंबंधी मध्यस्थाचे काम केले. सामंजस्य निर्माण होण्यासाठी तो काळ सुयोग्य होता. कारण शीतयुद्ध संपले होते. १९७० सालापासून निर्माण झालेल्या या वादावर १९९६ साली अंतिम निर्णय झाला. अणुक्रमांक १०५ असलेल्या मूलद्रव्याचे नाव डुबनिअम आणि अणुक्रमांक १०६ असलेल्या मूलद्रव्याचे नाव सीबोर्गिअम असे ठरविण्यात आले.

या दरम्यान अणुक्रमांक १०० पेक्षा जास्त असलेल्या मूलद्रव्यांच्या नावाच्या शिफारशी करण्यासाठी एक आयोग नेमण्यात आला. अज्ञात असणाऱ्या मूलद्रव्यांचे पद्धतशीर आणि सुसंगत असे चिन्ह आणि नामकरण ठरविण्यासाठी प्राथमिक पाया म्हणून पुढील तत्त्वे ठरविण्यात आली.

१. नाव छोटेखानी, अणुक्रमांकाशी संबंधित असावे, २. मूलद्रव्य धातू अथवा अन्य स्वरूपात अपेक्षित असला तरीही नावाचा शेवट ium (इअम) या अक्षराने असावा, ३. पद्धतशीर नामकरण केलेल्या मूलद्रव्याचे चिन्ह तीन अक्षरी असावे, ४. चिन्ह हे मूलद्रव्याच्या अणुक्रमांकावर आधारित असावे आणि शक्यतो त्याच्या प्रमाणित नावसदृश असावे. मूलद्रव्याचे पद्धतशीर वा प्रमाणित नाव हे त्याच्या अणुक्रमांकाच्या मूळ संख्यांवर आधारित असे ठरविण्यात आले.

– डॉ. द. व्यं. जहागीरदार

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org