क्युरी दाम्पत्य आणि हेन्री बेक्वेरेल यांनी किरणोत्सर्गाचा शोध लावल्यानंतर तो गुणधर्म बाळगणाऱ्या मूलद्रव्यांचा वेध घेणं सुरू झालं; तशी अनेक सापडली. जवळजवळ प्रत्येक मूलद्रव्याचं कमीअधिक किरणोत्सर्ग करणारं एक तरी अस्थिर रूप असल्याचं दिसून आलं. पण एकदा ते किरण बाहेर टाकले की ते रूप स्थिर होत असे. त्या अभिक्रियेतून तयार होणारं नवीन मूलद्रव्यही स्थिरच असे. मात्र युरेनिअम, अ‍ॅक्टिनिअम, थोरिअम यांसारख्या भारी अणुक्रमांकाच्या मूलद्रव्यातून होणाऱ्या किरणोत्सर्गापायी तयार होणारी नवीन मूलद्रव्यंही अस्थिर आणि म्हणून किरणोत्सर्गी असल्याचं दिसलं. त्यांच्या ऱ्हासामधून परत नवीन किरणोत्सर्गी मूलद्रव्यं, अशी एक शृंखलाच तयार होऊ लागली. अशा तीन शृंखलांचा शोध लागला. त्यातील ज्या मूलद्रव्यातून अल्फा किरणांचं उत्सर्जन होत असे त्यापायी कमी अणुक्रमांकाची म्हणजे खालची तर बीटा किरणांच्या बाहेर पडण्यातून अधिक अणुक्रमांकाची म्हणजेच वरची मूलद्रव्यं तयार होत होती. परंतु अशी प्रत्येक शृंखला शिशापर्यंत आली की तिला विराम मिळत असे. उगम कुठूनही असो अंत मात्र शिशातच होत असे. शिशातून किरणोत्सर्ग होत नसे.

कोणत्याही मूलद्रव्याची कमी-अधिक अणुभार असलेली अनेक रूपं असतात. त्यांना समस्थानिक किंवा आयसोटोप म्हणतात. याला कोणीही अपवाद नाही. अगदी सर्वात हलका असा हैड्रोजनही. पण त्याचेही जड हैड्रोजन किंवा डय़ुटेरिअम आणि ट्रिटिअम असे समस्थानिक आहेत. त्यातला फक्त ट्रिटिअम हा एकच किरणोत्सर्गी आहे. पण शिशापेक्षा अधिक अणुक्रमांकाच्या मूलद्रव्यांचे यच्चयावत समस्थानिक किरणोत्सर्गीच असतात; अस्थिर असतात. शिशाचा मात्र किमान एक समस्थानिक स्थिर आहे. त्यामुळं त्याच्यापर्यंत किरणोत्सर्गी शृंखला पोहोचली की तिचा प्रवास समाप्त होतो. तिची मंझिल गाठली जाते.

त्यामुळेच शिसं हे सर्वात भारी पण स्थिर असलेलं मूलद्रव्य आहे. अणूंच्या स्थर्याचा तो मेरूमणी आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. म्हणूनच तर किरणोत्सर्गीय शृंखलेची परिणती शिशात झाली की तिला चिरविश्रांती मिळते. अस्थिरतेचा अंत होतो.

माणसाच्या जीवनाची अशी अखेर झाली की ‘त्याचं सोनं झालं’ असं म्हटलं जातं. किरणोत्सर्गीय शृंखलांच्या बाबतीत मग तसंच ‘तिचं शिसं झालं’ असं म्हणायला काय हरकत आहे?

– डॉ. बाळ फोंडके

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org