ऱ्होडिअम हे मूलद्रव्य साधारणपणे दोन हजार अंश सेल्शियस तापमानाला वितळतं आणि द्रवरूपातलं ऱ्होडिअम आणखी तापवलं तर साधारणपणे चार हजार पाचशे अंश सेल्सिअसला उकळायला सुरुवात होते. पाण्याच्या बारा पट जास्त घनता असलेलं हे मूलद्रव्य अत्यंत उत्तम उष्णतावाहक आणि विद्युतवाहक आहे.

ऱ्होडिअम हे मूलद्रव्य जरी प्लॅटिनमच्या कुटुंबातलं असलं आणि म्हणून त्याचे गुणधर्म प्लॅटिनम किंवा पॅलॅडिअमसारखेच असले तरी बऱ्याच वेळा प्लॅटिनम किंवा पॅलॅडिअममध्ये थोडय़ा प्रमाणात ऱ्होडिअम मिसळून त्यांचं संमिश्र तयार केलं जातं. असं केल्याने प्लॅटिनम किंवा पॅलॅडिअमचा कठीणपणा वाढतो आणि एवढंच नव्हे तर असं संमिश्र लवकर गंजत नाही किंवा त्यावर आम्लांचा फारसा परिणाम होत नाही.

याच गुणधर्मामुळे, अनेक विद्युत उपकरणांमध्ये ऱ्होडिअमच्या समिश्रांचा उपयोग केला जातो. ऱ्होडिअमच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचं पूर्ण परावर्तन होत असल्यामुळे, या समिश्रांचा समावेश अनेक प्रकाशीय उपकरणांमध्ये केला जातो. त्याचबरोबर अनेक वैद्यकीय उपकरणांमध्येही ऱ्होडिअम संमिश्रे वापरली जातात.

दागिन्यांच्या दुनियेत तर ऱ्होडिअमला खूपच मोठा मान आहे. ऱ्होडिअम खूप लवचीक आहे आणि काही ठरावीक रासायनिक पद्धतीने दुसऱ्या धातूंवर ऱ्होडिअमचा पातळ मुलामा- पातळसा थर- चढवता येतो. अनेक नक्षीदार सोन्याच्या दागिन्यांवर ऱ्होडिअमचा थर चढवून ते अधिक देखणे आणि मौल्यवान केले जातात. हिऱ्यांच्या दागिन्यांची कोंदणं करताना ती जर ऱ्होडिअम प्लेटेड असतील म्हणजेच ऱ्होडिअमचा थर चढवून केलेली असतील तर ते दागिने अत्यंत आकर्षक दिसतात.

ऱ्होडिअम हा एक उत्कृष्ट ‘उत्प्रेरक’देखील आहे. म्हणजेच बऱ्याच रासायनिक अभिक्रिया कमी तापमानाला घडून येण्यासाठी उत्प्रेरकाची मदत होते. उत्प्रेरक फक्त रासायनिक अभिक्रिया घडायला मदत करतो, पण स्वत: मात्र अभिक्रियेत भाग घेत नाही. गाडय़ांच्या एग्झॉस्ट पाइपमधून (निष्कास नलिकेतून) नायट्रोजन ऑक्साइडसारखे प्रदूषण करणारे वायू बाहेर पडतात. या वायूंपासून वातावरणाला त्रासदायक न ठरणारे पदार्थ तयार करण्याच्या कामगिरीत ऱ्होडिअमचा उत्प्रेरक म्हणून मोठाच उपयोग होतो.

-डॉ. मानसी राजाध्यक्ष 

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org