27 February 2021

News Flash

इसवीसनपूर्व काळातली मूलद्रव्यं

आणखी काही आश्चर्याच्या गोष्टी म्हणजे याच काळात क्वार्ट्झपासून तयार केलेल्या काही वस्तू आढळतात

पृथ्वीची अनेक नावं आहेत. धरणी, वसुधा, वसुंधरा.. पण या अनेक नावांपैकी एक नाव आहे ‘रसा’! आपल्या पोटात असंख्य रसायनं सामावणारी ती ‘रसा’! आणि या रसायनांची माहिती देणारं ते रसायनशास्त्र!! रसायनांची महती सांगणारे रसरत्नाकर, रसेन्द्र चूडामणी, रसचिंतामणी, रसकल्प, धातुरत्नमाला असे अनेक संस्कृत ग्रंथ, प्राचीन भारतात रसायनांचा आणि पर्यायाने ‘मूलद्रव्यां’चा प्रचंड अभ्यास झाला असल्याचं दर्शवतात.

ताम्रयुग.. तांबं या धातू-मूलद्रव्याचा विपुल प्रमाणात उपयोग केला गेला असल्याचा कालावधी.. इसवीसनपूर्व ३३०० वर्षांपूर्वीचा काळ! त्या काळातील तांब्याची हत्यारं भारतीय उपखंडांमध्ये आजही सापडतात. तांबं तापवून, वितळवून, साच्यामध्ये त्याला हवा तसा आकार देण्याची प्रक्रिया त्या काळी अवगत झाली नसली; तरी ‘तांबं’ हे मूलद्रव्य आणि त्याचे काही गुणधर्म; यांचा शोध मात्र माणसाला लागला होता, असा निष्कर्ष उत्खननात सापडलेल्या अवशेषांवरून काढला गेलाय.

त्यानंतर हळूहळू सिंधू नदीच्या खोऱ्यातली वसाहत प्रगत होत गेली. साधारणपणे इसवीसनपूर्व २५०० काळातले लोक अभ्रक (मायका) आणि चुना (लाइम) यांपासून तयार केलेले जार वापरत. त्यातच त्यावर फेरिक ऑक्साइड हा लोखंड आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांच्या रसायनापासून बनवलेला लाल रंग किंवा मँगेनीज ऑक्साइड हा मँगेनीज आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांच्या रसायनापासून तयार केलेला काळा  रंग, अशी रसायनं वापरून नक्षीकामही केलेलं आढळतं. कधी कधी तर तांबं या मूलद्रव्यापासून बनवलेलं क्युप्रिक ऑक्साइड वापरून निळ्या रंगाची छटाही तयार केली गेली होती.

आणखी काही आश्चर्याच्या गोष्टी म्हणजे याच काळात क्वार्ट्झपासून तयार केलेल्या काही वस्तू आढळतात; एवढेच नाही तर वस्तूंचं जोडकाम करताना पारदर्शक सिमेंटचा म्हणजेच काचेसारख्या पदार्थाचा वापर केलेला आढळतो. तसंच त्या काळात सील्स अर्थात मुद्रांचाही वापर केला जात होता. याचाच अर्थ सिलिकॉन, अ‍ॅल्युमिनियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम अशा काही मूलद्रव्यांच्या गुणधर्माविषयी आणि त्यांपासून तयार होणाऱ्या रसायनांच्या गुणधर्माविषयीचं ज्ञानही त्या काळातल्या मानवाला होतं.

साधारणपणे इसवीसनपूर्व १७००चा काळ म्हणजे आर्य वसाहतींचा काळ! या काळातल्या लोकांना तर सोनं, चांदी, तांबं या मूलद्रव्यांच्या वेगवेगळ्या संयुगांची माहिती असावी, असं उत्खननात सापडलेल्या दागदागिन्यांवरून समजतं.

डॉ. मानसी राजाध्यक्ष            

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

प्राचीन भारतीयांचे परकीयांशी व्यापारी संबंध

इसवीसनपूर्व सहाव्या शतकापर्यंत उत्तर भारतात अनेक छोटी छोटी राज्ये उदयाला आली. त्यापैकी काही गणराज्ये होती तर काही राजेशाही शासन व्यवस्थेखाली होती. प्रत्येक राज्य युद्ध करून आपले प्रभावक्षेत्र वाढविण्याच्या प्रयत्नात असे. बऱ्याच राज्यांनी आपापसांत राजकीय मत्री करून सामथ्र्यशाली गट तयार केले होते. बौद्ध वाङ्मयात उल्लेखिलेल्या सोळा महाजनपदांपैकी काशी, कोसल, मगध आणि वृन्जी या राज्यांनी चार प्रभावशाली गट तयार केले होते. जवळजवळ एक शतकभर या सत्तांमध्ये तीव्र संघर्ष चालू होता. वर उल्लेख केलेल्या चार राज्यांपैकी मगध राज्य सर्वात प्रबळ ठरले. मगधचे साम्राज्य प्रबळ आणि संपन्न बनण्यात तिथली भौगोलिक अनुकूलता हे प्रमुख कारण होते. मगध प्रदेशात असणाऱ्या गंगेच्या सुपीक खोऱ्यात पिकणाऱ्या मुबलक धान्यामुळे वैयक्तिक गरजा भागल्यावर उरलेले धान्य व्यापारासाठी वापरता येई. धान्याशिवाय खनिजे, विशेषत: लोखंड हा मगधच्या अर्थव्यवस्थेचा मोठा आधार होता. लोखंडापासून उत्तम प्रतीची शस्त्रे आणि शेतीची अवजारे बनवण्यात मगधच्या कारागिरांचा हातखंडा होता. अशा शस्त्रांचा व्यापार प्रथम शेजारी राज्यांशी चालत असे आणि पुढे तो मध्यपूर्वेतल्या देशांशी सुरू झाला.

हिमालयाच्या पायथ्याजवळच्या मगधच्या जंगलातून उत्तम प्रतीचे इमारती लाकडू आणि हत्ती मिळत असत. लोखंडी शस्त्रे आणि शेतीची अवजारे यांच्या जोडीला लाकूड आणि हत्ती यांच्या, इतर राज्यांशी असलेल्या व्यापारातून मगधचे व्यापारी संपन्न झाले. मगधच्या काही संपन्न व्यापाऱ्यांनी मग दूर देशांमधील व्यापाऱ्यांशी संधान साधून आपला माल निर्यात करायला सुरुवात केली. बॅबिलोन, रोम यांसारख्या दूरवरच्या देशांशी मगधचा व्यापार समुद्रमाग्रे आणि खुष्कीने मोठय़ा प्रमाणात सुरू झाला. हा व्यापार प्रामुख्याने चंदन, हस्तिदंत, कापड आणि मौल्यवान वस्तूंचा होत असे. मगधच्या मध्यपूर्व आणि युरोपशी वाढत चाललेल्या व्यापारामुळे मगध आणि भारतीय प्रदेशाच्या संपन्नतेची माहिती त्यांना मिळत गेली आणि पाश्चिमात्य व्यापाऱ्यांची भारतीय प्रदेशात ये-जा सुरू झाली.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2018 1:59 am

Web Title: chemical elements
Next Stories
1 ‘अजब रसायन!’
2 मूलद्रव्ये ऊर्फ मौले
3 ‘मोजमापन’ आढावा – ३
Just Now!
X