16 February 2019

News Flash

‘अजब रसायन!’

माणूस हे एक अजब ‘रसायन’ आहे, हा वाक्प्रचार आपण अनेक वेळा अनेक अर्थाने वापरतो

माणूस हे एक अजब ‘रसायन’ आहे, हा वाक्प्रचार आपण अनेक वेळा अनेक अर्थाने वापरतो. कधी अनेक गुण अंगी असणाऱ्या एखाद्या माणसाबद्दल तर कधी विचित्र वागणूक असणाऱ्या एखाद्या महाभागाबद्दल! कधी एखाद्या विषयात अतिशय कौशल्य प्राप्त केलेल्या कलाकाराबद्दल तर कधी काहीही न करतादेखील आपली दिनचर्या सुखात घालवणाऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल!! पण हे झाले सगळे स्वभाव किंवा गुणविशेष आणि आपण तर वाचतो आहोत ‘विज्ञानाचं’ सदर! तेव्हा, ‘माणूस हे एक अजब रसायन आहे’, हे विधान विज्ञानाच्या कसोटीवर उतरायला हवं, तपासायला हवं, नाही का?

माणसाच्या शरीराचा जवळजवळ ९९ टक्के भाग हा ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन, कॅल्शियम आणि फॉस्फरस या सहा मूलद्रव्यांच्या संयुगांपासून तयार झालेला आहे. आणि उरलेल्या भागात पोटॅशियम, सल्फर, सोडियम, क्लोरीन, मॅग्नेशियम, आयर्न, फ्लुओरिन, िझक, कॉपर (तांबे), आयोडीन, सेलेनियम, क्रोमियम, मँगेनीज, कोबाल्ट, मॉलिब्डेनम ही आणि अशी अनेक सूक्ष्म प्रमाणात असलेली मूलद्रव्यांची संयुगं आहेत. खरं पाहिलं तर माणसाचं शरीरच नव्हे पण या विश्वातली कुठलीही गोष्ट ही कुठल्या-न-कुठल्या ‘मूलद्रव्यां’च्या रसायनांनीच तयार झालेली आहे. म्हणून ज्ञात सृष्टीतली प्रत्येक गोष्ट, एक अजब ‘रसायन’च आहे.

‘रसायन’ हे अनेक गोष्टी एकत्र येऊन तयार झालेलं असतं. कुठलंही रसायन तयार होताना जे ‘मूलभूत पदार्थ’ एकत्र येतात त्यांना ‘मूलद्रव्य’ असं म्हणतात. इंग्रजीत याला एलिमेण्ट म्हणतात. त्यामुळे असं म्हणता येईल किमानवाला आजवर ज्ञात झालेली ११८ किमयागार ‘मूलद्रव्य’च अजब सृष्टीच्या अस्तित्वाला कारणीभूत आहेत. या प्रत्येक मुलद्रव्याच्या ‘असण्या’ची जाणीव माणसाला कधी आणि कशी झाली? त्यांचे स्वभावविशेष कसे असतात? त्यांचे स्वभाव कळल्यावर माणसाने आपल्या ‘किमयेने’ त्यांचा उपयोग कसा करून घेतला?

या सर्वाची माहिती अक्षरश: आपल्या सर्वाना अचंबित करणारी आहे, भारावून टाकणारी आहे. मूलद्रव्यांची दुनिया आणि दुनिया घडवणारी मूलद्रव्यं, असा दुहेरी पदर असलेला हा विषय आहे. त्यानिमित्त एक एक करत सर्व म्हणजे ११८ मूलद्रव्ये, आपापल्या गुण वैशिष्टय़ांसह वाचकांच्या, आपल्या सर्वाच्या भेटीसाठी येणार आहेत.

डॉ. मानसी राजाध्यक्ष           

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

सर्वसमावेशक भारतीय संस्कृती

भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळात, इ.स. १८५८ मध्ये सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब भागात रेल्वेमार्ग तयार करण्याचे काम सुरू झाले. १८५८ ते १८६१ या काळात लाहोर-मुलतान रेल्वेमार्ग तयार करताना हडप्पा येथील पक्क्या, भाजलेल्या विटा प्रथम नजरेसमोर आल्या. त्या विटांचे प्राचीनत्व लक्षात घेऊन हडप्पा येथे विशेष संशोधन करण्यात आले. इसवी सन १९२० ते १९३२ या काळात भारताच्या वायव्य भागातील उत्खननातून एका महान संस्कृतीचा शोध लागला. सध्या पाकिस्तानात असलेल्या हडप्पा आणि मोहेंजोदाडो या दोन शहरांच्या परिसरातील अनेक ठिकाणी या प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. हे अवशेष प्रामुख्याने सिंधू आणि तिच्या उपनद्यांच्या परिसरात सापडल्यामुळे या संस्कृतीला ‘सिंधू संस्कृती’ असेही म्हणण्यात येते.

अलीकडे गुजरातमध्ये झालेल्या संशोधनात या हडप्पा किंवा सिंधू संस्कृतीचा प्रसार इ.स. पूर्व २५०० ते इ.स. पूर्व १७०० या काळात झाला असं सिद्ध झालंय. हीच संस्कृती पुढे उत्तर भारतातून दक्षिणेकडेही पोहोचली. या प्रदेशातील सप्तसिंधूच्या प्रदेशात म्हणजे सिंधू खोऱ्यातच वैदिक संस्कृती रुजली आणि विकसित पावली असल्यामुळे, सिंधू संस्कृतीला भौगोलिकदृष्टय़ा भारतीय संस्कृती म्हटले जाते.

जगातल्या सर्वात जुन्या संस्कृतींमध्ये मेसोपोटेमिया म्हणजे सध्याच्या इराकचा परिसर, प्राचीन इजिप्तची संस्कृती यांसह हडप्पा म्हणजेच सिंधू संस्कृतीही असल्याचे दाखले आहेत.

प्राचीन भारतीय संस्कृती एखाद्या विशाल महानदीप्रमाणे आहे. हजारो वर्षांपासून जगातल्या विविध प्रदेशातून आलेले आक्रमक, व्यापारी, धर्मोपदेशक, धर्मप्रचारक, सामाजिक कार्यकत्रे, कलाकार, साहित्यिक, संत आणि नोकरदार या सर्वाना या भारतीय संस्कृतीने आपल्यात पूर्णपणे सामावून घेतले. स्वत: प्रवाही राहून आपल्या विशाल पात्रात विभिन्न प्रकृतीचे ओढे, झरे, ओहोळ, उपनद्यांना आपल्यात सामावून घेणाऱ्या विशाल नदीशी भारतीय संस्कृतीची तुलना करता येईल!

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

First Published on January 2, 2018 1:46 am

Web Title: chemistry science related article